राइमा इस्लाम : दोरीच्या तुकड्यावरून पोलिसांनी लावला अभिनेत्रीच्या हत्येचा छडा

सूचना : या बातमीतला काही भाग वाचकांना विचलित करू शकतो.

बांगलादेश पोलिसांनी सांगितलं की, चित्रपट अभिनेत्री राइमा इस्लाम शिमूच्या हत्येच्या रहस्याची उकल प्लॅस्टिकच्या दोरीवर सापडलेल्या पुराव्यावरून केली आहे.

काही दिवसांपासून बेपत्ता असलेल्या राइमा यांचा मृतदेह राजधानी ढाक्याच्या बाहेर सापडलं होता.

ढाका पोलिसांनी मंगळावार, 18 जानेवारीला पत्रकार परिषदेत सांगितलं की, राइमा इस्लाम यांचे पती आणि त्यांची मदत करणाऱ्या एका मित्राला अटक केली आहे.

ढाका जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मारुफ हुसेन सरदार यांनी हा खून कौटुंबिक कलहातून झाल्याचं सांगितलं.

त्यांनी म्हटलं, "मृतदेह सापडल्यानंतर 17 तारखेला आम्ही घटनास्थळी गेलो. आम्हाला संशय आला म्हमून आम्ही राइमाचा पती आणि त्याच्या मित्राची चौकशी केली. तिथे जे पुरावे सापडले त्यावरून आम्ही त्यांना अटक केली."

बाकी त्यांनी काहीही सांगायला नकार दिला. पण बांगलादेश पोलिसांच्या वेबसाईटवर 17 तारखेला रात्री याची सविस्तर माहिती दिली गेली

कसं पकडलं आरोपींना?

पोलीस न्यूज नावाच्या या वेबसाईटवर सांगितलं की, पोलिसांनी 24 तासात या हत्याकांडाचं रहस्य उकललं. याचा मुख्य पुरावा एक प्लास्टिकची दोरी होती.

प्रेत सापडल्यानंतर पोलिसांनी पंचनामा केला आणि राइमा यांच्या घरी गेले.

तपासाअंती त्यांच्या लक्षात आलं की, राइमा यांचं प्रेत फेकून देण्यासाठी वापरलेल्या दोन पोत्यांना ज्या प्लास्टिकच्या दोरीने बांधलं होतं त्यांचं एक बंडल राइमाच्या नवऱ्याच्या गाडीत सापडलं.

त्या गाडीला पाण्याने धुतलं होतं आणि आतली दुर्गंधी दूर करण्यासाठी ब्लीचिंग पावडर शिंपडली होती. यानंतर पोलिसांनी राइमाच्या नवऱ्याला चौकशीसाठी थांबवून घेतलं. चौकशीमध्ये त्यांच्या नवऱ्याने राइमाचा खून केल्याचं मान्य केलं. यानंतर त्यांच्या मित्रालाही अटक केली.

खून करून मृतदेह फेकून दिला

पोलीस न्यूज वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार ही घटना रविवारी, 16 जानेवारीला घडली. सकाळी 7-8 वाजता अभिनेत्रीचा गळा दाबून खून केला. यानंतर तिच्या नवऱ्याने आपल्या मित्राला फोन करून बोलावलं.

दोघांनी बाहेरून दोन पोती आणली. त्या पोत्यांमध्ये मृतदेह भरला आणि प्लास्टिकच्या दोरीने पोती शिवून टाकली. यानंतर त्यांनी वॉचमनला नाश्ता आणण्यासाठी बाहेर पाठवलं आणि प्रेत गाडीत ठेवलं. थोड्या वेळाने ते गाडी घेऊन बाहेर निघाले. आधी ते मीरपूरला गेले पण तिथे योग्य तशी जागा न सापडल्यामुळे पुन्हा घरी आले.

त्याच दिवशी संध्याकाळी हे लोक परत ढाक्याच्या मोहम्मदपूर भागात अलीपूर पुलापासून 300 मीटर अंतरावर झाडांमध्ये मृतदेह फेकून आले.

ते परत आले तेव्हा रात्रीचे साडेनऊ वाजले होते.

दोन्ही आरोपी दारूडे आणि बेरोजगार आहेत असं पोलिसांनी सांगितलं. अजून बीबीसी आरोपींच्या कुटुंबांशी स्वतंत्ररित्या संपर्क करू शकलेलं नाही.

बहिणीने पटवली ओळख

राइमा यांची बहीण फातिमा निशा यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं की, माझ्या बहिणीचा खून का झाला हे मला कळत नाहीये. माझी बहीण आणि तिच्या नवऱ्यात कोणताही वाद नव्हता. ते 16 वर्षांपासून विवाहित होते. त्यांनी प्रेमविवाह केला होता.

राइमा इस्लाम शिमू आपली दोन मुलं आणि पतीसोबत ढाक्यात राहात होत्या. फातिमांनी सांगितलं की रविवारी राइमांचा फोन बंद येत होता. त्या घरी परत आल्या नाही, मग फातिमांना संशय आला.

यानंतर त्यांनी हॉस्पिटल आणि पोलीस स्टेशन्समध्ये शोधाशोध सुरू केली.

18 तारखेला एका अज्ञात महिलेचा मृतदेह सापडल्यानंतर त्या हॉस्पिटलमध्ये गेल्या आणि त्यांनी आपल्या बहिणीची ओळख पटवली.

याआधी 17 जानेवारीला राइमाच्या नवऱ्याने पोलिसात तक्रार दिली होती की त्या आदल्या दिवशी कोणाला काहीही न सांगता घरातून निघून गेल्यात.

41 वर्षांच्या राइमा इस्लाम यांनी आपल्या करियरची सुरुवात 1998 साली केली होती. त्यांनी 25 पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये अभिनय केला होता.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)