You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कंदील बलोच हत्याकांड: भाऊ वसीमला जन्मठेप, मौलवी कवीची सुटका
पाकिस्तानची सोशल मीडिया स्टार कंदील बलोच हत्येप्रकरणी न्यायालयाने कंदीलचा भाऊ मोहम्मद वसीमला जन्मठेप सुनावली आहे. तर तिचा दुसरा भाऊ मोहम्मद आरिफला `वॉटेंड' म्हणून घोषित केले आहे. तसंच या प्रकरणातील मुफ्ती अब्दुल कवीबरोबर अन्य चार आरोपींची निर्दोष सुटका केली आहे.
मोहम्मद वसीमला 311 कलमाअंतर्गत जन्मठेप सुनावण्यात आली आहे, तर फिर्यादी पक्षाला इतर आरोपींवरील गुन्हे सिद्ध करता आले नाहीत. "न्यायप्रक्रियेवर आमचा विश्वास होता. त्यामुळेच या प्रकरणात प्रामाणिकपणे न्याय मिळेल अशी आशाही होती. माझे तर एफआयआरमध्ये नावसुद्धा नव्हते. त्यामुळे मी नक्की यातून बाहेर पडेन याची मला खात्री होती,'' असे मुफ्ती अब्दुल कवीने बीबीसी उर्दूला सांगितलं.
बिनधास्त वागण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या पाकिस्तानच्या सोशल मीडिया सेलिब्रिटी कंदील बलोचची जुलै 2016 मध्ये हत्या करण्यात आली होती.
गळा आवळून करण्यात आली होती हत्या
15 जुलै 2016 रोजी कंदील बलोचची तिच्या भावाने- वसीमने हत्या केल्याची बातमी प्रसिद्ध झाली होती. त्याच रात्री त्याला अटक केल्यानंतर, एका पत्रकार परिषदेत हत्येची कबुली दिली.
कंदीलमुळे कुटुंबाची नाचक्की होत होती. कंदीलचे सोशल मीडियावर जे व्हिडिओ यायचे त्यामुळे लोकं टोमणे मारायचे आणि ते सहन न झाल्यानंच हे कृत्य केल्याचं त्यानं सांगितलं होतं. परंतु त्यानं नंतर आपली साक्ष बदलली होती.
पोलीस तपासणीत तिची गळा आवळून हत्या केल्याचे समजले होते.
कंदील बलोच कोण होती?
कंदील बलोच पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील मुल्तान जिल्ह्यातल्या एका गरीब कुटुंबात जन्मलेली मुलगी होती. तिचं खरं नाव फवाजिया होतं, पण ती कंदील बलोच नावानं प्रसिद्ध होती.
तिला पाकिस्तानची किम कर्दाशियन म्हटलं जायचं.
तिच्या बिनधास्त वागण्यामुळे तिने पाकिस्तानच्या सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली होती. तिच्या फोटो आणि पोस्टमुळे तिला लाखो फॉलोअर्स होते. तसंच, तिचा अनेक द्वेष करणारेही लोक होते. कितीतरी लोकांनी ती इस्लाम धर्माचा अपमान करत असून, तिच्यावर बहिष्कार घालण्याची मागणीही केली होती.
"मला जीवे मारण्याच्या धमक्या मिळत आहेत. माझ्या मृत्यूची वेळ ठरलेली आहे, आणि ती आली की आपल्याला जावंच लागतं.'' कंदील बलोच यांनी त्यावेळी बीबीसी उर्दला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं होतं.
कंदील यांची हत्या होण्याआधी, पाकिस्तानात तिचे नाव सर्चच्या टॉप 10च्या यादीत होते.
मुफ्तीबरोबरच्या व्हिडिओमुळे निशाण्यावर
मुफ्ती अब्दुल कवी यांच्याबरोबर एका टीव्हीवरील कार्यक्रमात सहभागी झाल्यामुळे त्या कट्टरतावाद्यांच्या निशाण्यावर आल्या. टीव्हीवरच्या या कार्यक्रमात दोघांनी एकमेकांबरोबर जाहीर फ्लर्ट केले होते. यावेळी त्यांनी फोटोही काढले. तसंच त्यांनी मुफ्तीची टोपीही काढून घातली. यामुळे अनेक लोकांनी `इस्लाम आणि मुफ्तीचा अपमान' केल्याचं म्हटलं.
कंदील बलोच यांच्या हत्येप्रकरणी आपल्या मुलाला माफ करावे अशी शिफारस त्यांच्या आई-वडिलांनी न्यायालयाकडे केली होती, परंतु ती न्यायालयाने फेटाळली.
हा गुन्हा हॉनर किलिंग या प्रकरात नोंदवला जावा अशी आरोपीने मागणी केली होती.
कंदीलच्या हत्येपूर्वी ऑनर किलिंग प्रकरणात मुलीचे आई-वडिल तिच्या खुन्याला कायद्याने माफ करू शकायचे. परंतु सरकारने या कायद्यात बदल केला होता.
घराण्याच्या खोट्या अभिमानापोटी शेकडो महिलांच्या हत्या घडवून आणल्या जातात आणि अशी कितीतरी प्रकरणं समोर येतंच नाहीत, असंही पाकिस्तानातील मानवाधिकार कार्यकर्त्यांनी म्हटलं होतं.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)