गुगलबद्दलच्या या 21 गोष्टी तुम्हाला माहीत आहेत का?

लोकप्रिय सर्च इंजिन गुगल आज 21 वर्षांचं झालं. वाढदिवस साजरा करण्यासाठी आज गुगलने खास डूडलही तयार केलंय. यामध्ये दिसतो गुगलचं पेज सुरू असणारा एक डेस्कटॉप आणि त्यावर तारीख आहे सप्टेंबर 27, 1998.

आज जगभरात या सर्च इंजिनचा वापर केला जातो.

पण याच गुगलबद्दलच्या या 21 गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?

1. गुगल ही जगातली सर्वांत जास्त पाहिली जाणारी वेबसाईट आहे. खरंतर यात आश्चर्य वाटायला नको. पण गंमतीची गोष्ट म्हणजे 'बिंग' (Bing) या दुसऱ्या एका सर्च इंजिनवरून सगळ्यांत जास्त शोधला जाणारा शब्द आहे - गुगल!

2. लॅरी पेज आणि सर्गे ब्रिन या दोन कॉलेज तरुणांनी गुगलची सुरुवात केली. त्यांना अशी एक वेबसाईट तयार करायची होती जी त्यांच्याशी निगडित असलेल्या एकूण पेजेसच्या जाळ्यातून या वेबपेजेसची क्रमवारी तयार करेल.

3. गुगल - Google हा शब्द आला Googol वरून. Googol म्हणजे एकावर 100 शून्य असणारा आकडा. आपल्या वेबसाईटवरून किती मोठ्या प्रमाणात माहिती सर्च करता येईल हे या वेबसाईटच्या निर्मात्यांना सुचवायचं होतं.

4. एखादी महत्त्वाची घटना वा व्यक्ती यांच्या प्रित्यर्थ जेव्हा गुगलच्या पेजवर खास लोगो वा चित्रं झळकतं, त्याला म्हणतात - गुगल डूडल. 1998मध्ये पहिलं-वहिलं गुगल डुडल झळकलं ते बर्निंग मॅन फेस्टिव्हलच्या निमित्ताने. आपण ऑफिसमध्ये नसल्याचं या संस्थापकांना लोकांना सांगायचं होतं आणि त्यासाठी त्यांनी हे डूडल तयार केलं.

5. या डूडलच्या माध्यमातून आतापर्यंत अनेक गोष्टी साजऱ्या करण्यात आल्या आहेत. अगदी चंद्रावर पाण्याचे अंश आढळल्यानंतर त्याबद्दलच डूडलही झळकलं.

तर जॉन लेनन यांचा 70 वा वाढदिवस साजरा करण्यासाठी पहिल्यांदा व्हिडिओ डूडल करण्यात आलं.

6. लेगोज (Lego) पासून बनवण्यात आलेल्या केसमध्ये गुगलचा पहिला सर्व्हर ठेवण्यात आला होता.

7. गुगलच्या मुख्यालयाला गुगलप्लेक्स (गुगल + कॉम्प्लेक्स) म्हणतात. ते आहे कॅलिफोर्नियातल्या सिलिकॉन व्हॅलीमध्ये.

8. या गुगलप्लेक्समध्ये एका टी - रेक्स ( T-Rex) डायनॉसोरचा एक भलामोठा पुतळा आहे. कंपनीला कधीही या डायनॉसरप्रमाणे नामशेष होऊ देऊ नका, असा संदेश कर्मचाऱ्यांना यातून देण्याचा प्रयत्न असल्याचं बोललं जातं.

9. गुगलचं हे मुख्यालय अतिप्रचंड मोठं आणि हिरवंगार आहे. पण इथलं गवत कापण्यासाठी कंपनी 'लॉन मोअर्स' म्हणजेच गवत कापायची यंत्रं वापरत नाही. तर त्याऐवजी बकऱ्यांना या कामी लावलं जातं.

10. आपल्या कर्मचाऱ्यांना मोफत जेवणं देणारी गुगल ही पहिली मोठी टेक कंपनी होती. शिवाय इथल्या कर्मचाऱ्यांना आपले पाळीव कुत्रे सोबत ऑफिसमध्ये आणायचीही परवानगी आहे.

11. जुलै 2001मध्ये गुगल इमेज सर्चला सुरुवात झाली. 2000 साली ग्रॅमी पुरस्कार सोहळ्यासाठी जेनिफर लोपेझने घातलेल्या हिरव्या व्हर्साची ड्रेसवरून यासाठीची प्रेरणा घेण्यात आली. कारण त्यावेळी गुगलवर हा ड्रेस सर्वांत जास्त शोधला गेला होता, पण त्या ड्रेसचा फोटो बघणं तेव्हा शक्य नव्हतं.

12. 2004मध्ये एप्रिल फूलच्या दिवशी गुगलने त्यांची ईमेल सेवा - जीमेल जाहीर केली. 1 एप्रिलला घोषणा करण्यात आल्याने हा एक विनोद असल्याचं तेव्हा अनेकांना वाटलं होतं!

13. 2006मध्ये मेरियम - वेबस्टर डिक्शनरीमध्ये (Merriam - Webster Dictionary)मध्ये Google हा शब्द समाविष्ट करण्यात आला.

14. 2006मध्ये YouTube चा गुगल परिवार समावेश झाला. 1.5 अब्ज डॉर्लसपेक्षा जास्त किंमत मोजत गुगलने युट्यूबला विकत घेतलं. सध्याच्या घडीला 2 अब्ज लोक दरमहा युट्यूब वापरतात. तर दर मिनिटाला 400 तासांचे व्हिडिओज अपलोड केले जातात.

15. 2009 मध्ये गुगलच्या एका प्रोग्रॅमरच्या चुकीमुळे इंटरनेट कोलमडलं. '/' या खुणेचा समावेश गुगलच्या 'ब्लॉक्ड वेबसाईट्स'च्या यादीत चुकून करण्यात आला. पण बहुतेक सगळ्याच वेबसाईटच्या नावामध्ये '/' ही खूण असल्याने ऑनलाईन जग जवळपास बंद पडलं.

16. गुगलवर रोज शोधण्यात येणाऱ्या अनेक गोष्टींपैकी 15% गोष्टी अशा असतात ज्या यापूर्वी कधीही शोधण्यात आलेल्या नसतात.

17. एप्रिल 2018 मध्ये गुगलने एक नवा टप्पा गाठला. 100% अक्षय ऊर्जा (Renewable Engery) वापरणारी गुगल ही पहिली कंपनी ठरली.

18. तसं पहायला गेलं तर गुगलचे किमान 6 वाढदिवस आहे. पण ते 27 सप्टेंबरला वाढदिवस साजरा करतात.

19. गुगलवर अनेक लहान गंमतीजंमती करता येतात. उदाहरणार्थ जर तुम्ही 'askew' असं सर्च केलं, तर तुम्हाला मिळणारे सगळे रिझल्ट्स तिरके, काहीसे घसरलेले दिसतील.

20. अपोलो 11 च्या अंतराळवीरांना चंद्रावर पाठवण्यासाठी जेवढी 'कम्प्युटिंग पॉवर' लागली होती, तेवढीच पॉवर एका गुगल सर्चसाठी वापरली जाते.

21.आता गुगल सर्च इंजिन असण्यासोबतच इतरही अनेक गोष्टी करतं. यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स, स्ट्रिंमिंगवर आधारित गेमिंग प्लॅटफॉर्म आणि अगदी ड्रायव्हर नसणाऱ्या कार्सचाही यात समावेश आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)