You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
अॅपल: नवीन आयफोन्स भारतीय मार्केट काबीज करणार का?
अॅपल कंपनीने 11 रेंजमधील आयफोन्स बुधवारी लाँच केले. या फोन्सची बॅटरी चांगली आहे, कॅमेऱ्याची क्षमता उत्तम आहे असा दावा अॅपलने केला आहे. हे सगळं आर्थिक मंदीसदृश परिस्थिती निर्माण झालेलं भारतीय मार्केट काबीज करण्यासाठी पुरेसं आहे का?
सॅमसंगने भारतीय मोबाईल मार्केटमध्ये वर्चस्व राखलं आहे. प्रीमियम स्मार्टफोन म्हणजेच 40,000 रुपये किमतीच्या स्मार्टफोन विक्रीत सॅमसंग अग्रणी राहिलं आहे.
मात्र यंदाच्या वर्षी पहिल्यांदाच सॅमसंग या कोरियन कंपनीला मागे टाकलं आहे. प्रीमियम स्मार्टफोन मार्केटमध्ये यावर्षी दुसऱ्या तिमाहीत अॅपलने 41.2 टक्के हिस्सा व्यापला. इंटरनॅशनल डेटा कॉर्पोरेशन या संशोधन करणाऱ्या संस्थेने ही आकडेवारी दिली आहे.
'भारतीय स्मार्टफोन मार्केट सातत्याने बदलत आहे. इथं कोणत्याही एका कंपनीचं प्रभुत्व राहील अशी परिस्थिती नाही. कंपनी कितीही वर्चस्ववादी असली तरी त्यांचं अढळस्थान धोक्यात येऊ शकतं,' असं तंत्रज्ञानविषयक पत्रकार माला भार्गव यांनी सांगितलं.
अॅपलचे आयफोन 11, 11प्रो, 11प्रो मॅक्स- हे स्मार्टफोन्स भारतीय मार्केटमध्ये 27 सप्टेंबरपासून उपलब्ध होतील.
आयफोन 11 हा स्मार्टफोन भारतीय मार्केटमध्ये यशस्वी होऊ शकेल असं भार्गव यांना वाटतं.
किमतीतली घट ठरू शकते निर्णायक
गेल्या काही महिन्यात, अॅपलने आयफोन XR या फोनची किंमत 73,900 रुपयांवरून 53,900 रुपये केली. मार्केटमध्ये परिणाम साधण्याच्या दृष्टीने किंमतीत झालेली 20,000 रुपयांची घट निर्णायक ठरेल असं भार्गव यांनी सांगितलं.
'भारतातील ग्राहकांना डिस्काऊंट मिळालेला आवडतो आणि त्यांना डील मिळालेलं आवडतं असं भार्गव सांगतात. आयफोन खरेदी करण्याची महत्वाकांक्षा अनेक ग्राहकांमध्ये असते. आयफोनच्या किमती कमी झाल्याने आयफोन खरेदीत वाढ होऊ शकते', असं भार्गव यांनी सांगितलं.
यामुळे स्मार्टफोन मार्केटमध्ये अॅपलला आघाडी मिळू शकते. नव्या फोन्समध्ये कॅमेरे अधिक शक्तिशाली आहेत. प्रोसेसर अधिक वेगवान झाला आहे.
एंट्री लेव्हलचा आयफोन 11 हा आयफोन XRचा वारसा यशस्वीपणे पुढे चालवेल असं भार्गव यांना वाटतं.
आयफोन 11 ची किंमत 64,900 रुपये आहे. आयफोन XR च्या किंमतींपेक्षा ही किंमत खूप जास्त नाही.
भारतीय मार्केटमध्ये वर्चस्व मिळवण्यात आयफोन XR ची भूमिका निर्णायक ठरली होती. म्हणूनच आयफोन 11ची किंमत XRच्या आसपासच ठेवण्यात आली आहे. जेणेकरून अॅपलचा मार्केट शेअर विस्तारू शकेल असं त्यांना वाटतं.
अॅपलने आयफोन 11प्रो आणि आयफोन 11प्रो मॅक्स लाँच केला आहे. आयफोन11 प्रो या मॉडेलची किंमत 99,990 एवढी आहे तर 1,09,900 ही आयफोन 11प्रो मॅक्सची किंमत आहे. हे दोन फोन बहुतेकांना परवडणारा नाही. त्यामुळे हे दोन फोन मुख्य आकर्षण नाही.
मात्र आयफोन 11 आणि या दोन मॉडेल्समधील किंमतीचं अंतर अॅपलच्या फायद्याचं ठरू शकतं. जुने आयफोन सोडून देऊन नवे घेणाऱ्यांना संधी आहे. आयफोन 11 अॅपलचा भारतीय मार्केटमधला वाटा वाढेल असं भार्गव यांना वाटतं.
भारतीय बाजारपेठेचा लाभ घेण्याचा प्रयत्न
अॅपल कंपनी अजूनही आयफोन XR तसंच आयफोन 8ची विक्री करत आहे. यामुळे ग्राहकांना अधिकाअधिक पर्याय उपलब्ध होतील.
जगभरात स्मार्टफोन खरेदीत घट झाली आहे. त्याचवेळी अॅपलला भारतीय मार्केटमधलं अढळस्थान टिकवायचं आहे. दमदार वेगाने गतिमान असं एकमेव मार्केट भारताच्या रूपात आहे. अॅपलला त्याचा लाभ उठवायचा आहे.
2019 वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत देशभरात 36.9 हँडसेटची विक्री झाली. गेल्या वर्षीच्या तुलनेत हे प्रमाण 9.9 टक्क्यांनी वाढलं आहे.
तुलनेत, प्रीमियम ग्लोबल स्मार्टफोन मार्केटमधली हँडसेट विक्री यंदा 8 टक्क्यांनी घटली आहे. अॅपलच्या शिपमेंटमध्ये 20 टक्क्यांनी झालेली घट महत्वपूर्ण ठरली होती.
भारतात अजूनही नवीन लक्षावधी स्मार्टफोन धारक आहेत. त्यापैकी बजेट फोन म्हणजेच काटेकोर किमतीत मिळणारे फोन्स वापरणारेच अनेक जण आहेत. यापैकी बरेच जण थोडा अधिक पैसा खर्च करून चांगल्या दर्जाचा फोन घेण्यासाठी उत्सुक आहेत असं भार्गव यांनी सांहितलं.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)