You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
अॅपलने आणला नवा आयफोन 11 प्रो, स्मार्ट चष्मे कधी आणणार?
अॅपलने आता त्यांचा नवा फोन, आयफोन 11 प्रो बाजारात आणला आहे. कंपनीचा दावा आहे की या फोनमध्ये आधीच्या मॉडल्सपेक्षा जास्त कॅमेरे आहेत, त्याचा प्रोसेसर आधीपेक्षा जास्त शक्तीशाली आहे आणि हा फोन आधीच्या मॉडेल्सपेक्षा कमी बॅटरी खातो.
भारतीय बाजारपेठेत आयफोन 11 आणि आयफोन 11 प्रोची किंमत अनुक्रमे 64 हजार आणि 99 हजारापासून सुरू होईल.
या नव्या फोनचं प्रो मॉडेलची बॅटरी आधीच्या अॅपल XS पेक्षा चार ते पाच तास जास्त चालेल असं कंपनीने म्हटलं आहे.
पण यो फोनमध्ये 5G सुविधा नाही.
याबरोबरच अॅपलने त्यांचं स्मार्टवॉचही लॉन्च केलं आहे, ज्याचा डिस्प्ले, सदैव सुरू (ऑलवेज ऑन) असेल.
या मालिकेतले स्मार्टवॉचेस कितीवेळा स्क्रीन रिफ्रेश करायचा हे ठरवतात, बॅटरी वाचवण्यासाठी बॅकलाईट कमी करतात आणि या घड्याळांची बॅटरी 18 तास चालेल असं कंपनीचं म्हणणं आहे.
या घड्याळाला टायटॅनियम कव्हरचाही पर्याय आहे तसंच त्यात होकायंत्रही दिलं आहे. या घड्याळाची आणखी काही वैशिष्ट्यं म्हणजे वापरकर्त्याच्या आसपास आवाजाने धोक्याची पातळी ओलांडली की हे घड्याळ वापरकर्त्याला इशारा देतं. तसंच या घड्याळाने मासिक पाळीचीही नोंद ठेवता येते.
"अॅपलने आरोग्य आणि सुरक्षेसंदर्भात जे फिचर्स आणले आहेत ते मला फारच आवडले. पण झोपेचा अभ्यास करणारं फिचर याच्यात नाही हे कळल्यावर माझी थोडी निराशा झाली," तंत्रज्ञानाचे अभ्यासकर्ते पॅट्रीक मोरहेड यांनी बीबीसीला सांगितलं.
यूकेमधली रिसर्च फर्म IDCनुसार जागतिक स्मार्टवॉचच्या बाजारपेठेत अॅपलचा हिस्सा 49 टक्के इतका आहे. यूकेमधलं सर्वाधिक विकलं जाणारं हे स्मार्टवॉच आहे.
नव्या फोनमधल्या कॅमेऱ्याचे फिचर्स
नव्या आयफोनच्या कॅमेऱ्याचं खास वैशिष्ट्य म्हणजे त्यात असलेला 'अल्ट्रावाईड' कॅमेरा. यात 2x ऑप्टिकल झूम-आऊटचाही पर्याय आहे.
11 प्रो मॉडेलमधे आधीच्या मॉडेल्ससारख्याचं टेलिफोटो आणि नॉर्मल लेन्स आहेत तर बेसिक आयफोन 11 मध्ये फक्त अल्ट्रावाईड आणि स्टॅडर्ड लेन्स आहेत. फ्रंट कॅमेरा वापरून स्लो-मोशन व्हीडिओ शुट करण्याची सुविधाही यात आहे.
या फोनमध्ये नाईटमोडचंही फिचर आहे. यामुळे अंधाऱ्या ठिकाणी फोटो काढणं सोपं होतं आणि फोटो चांगले येतात. गुगल, सॅमसंग आणि हुवेई यांच्या फोन ही सुविधा आधीपासूनच आहे.
अॅपलचा दावा आहे की त्यांचं सेंट्रल प्रोसेसिंग युनिट (CPU) आणि ग्राफिक प्रोसेसिंग युनिट (GPU) इतर कोणत्याही अँड्रॉईड फोनपेक्षा जास्त शक्तीशाली आहेत.
याव्यतिरिक्त यामध्ये असलेल्या चीपमध्ये न्युरल इंजिन आहे, ज्यामुळे अवघडतले अवघड गणित पटकन होतात त्यामुळे फोनचा परफॉर्मन्स A12 (आर्टिफिशिअल इंटेलिजन्सपेक्षा) 20 टक्क्यांनी वेगवान होतो.
अर्थात हे नवे फोन अॅपलच्याच पेन्सिल स्टायलसशी (इलेक्ट्रॉनिक पेन्सिल ज्यामुळे आयपॅडवर डिजिटली लिहिता येतं) जुळवून घेणारे नाहीत. अनेकांची इच्छा होती की ते तसे असावेत, कारण हे फिचर कमी किंमतीच्या आयपॅडमध्यही दिलेले आहेत.
आयफोन 11 आणि 11 प्रो हे दोन्ही फोन इतर डिव्हाईसेस वायरलेसी चार्ज करू शकत नाहीत, जे सॅमसंग आणि हुवेईच्या फोनमध्ये करू शकतात.
घटती मागणी
अॅपलने नवीन फोन लॉन्च केला असला तरी त्यांच्या फोनच्या मागणीत त्यांच्या स्पर्धकांच्या तुलनेत घट झाली आहे. गेल्या वर्षभरात त्यांची मागणी 14.4 टक्क्यांनी घटली आहे. जगभरातल्या बाजारपेठेत अॅपलचा 10.2 टक्के हिस्सा आहे.
पण कंपनीचं म्हणण आहे की त्यांचा अॅक्टिव्ह बेस - जगभरात वापरात असणाऱ्या आयफोनची संख्या - कधी नव्हे इतका वाढला आहे.
IDCच्या मार्ता पिंटो म्हणतात की, "अॅपलचे फोन अँड्रोईड फोनपेक्षा साधारणतः जास्त टिकतात. अॅपलच्या नवनवीन ऑपरेटिंग सिस्टिम्सही येत असतात. दुसरं म्हणजे अॅपलचा सेकंड हँड फोनच्या बाजारपेठेतही बराच खप आहे. आणि बघायला गेलं तर पूर्ण स्मार्टफोनचा बाजरपेठेत मंदी आल्यासारखं झालंय."
यामुळे अॅपलला फारसा फरक पडेल असं मार्ता यांना वाटत नाही. "सध्या त्यांचं लक्ष नवीन सेवा देण्याकडे आहे. त्यांचे स्मार्टवॉचेसचा खप पण चांगला आहे."
नव्या आयफोनमध्ये 5G फिचर नाही याचं एक कारण म्हणजे इंटेलला (सॉफ्टवेअर बनवणारी कंपनी) यासाठी आवश्यक असणारा मॉडेम बनवता आला नाही.
सध्याच्या काळात ग्राहक आहे तो हँडसेट जास्तीत जास्त वापरत आहेत, लवकर फोन बदलण्याचा विचार करत नाहीयेत, अशात अॅपलच्या फोनमध्ये 5G फिचर नसणं त्यांचा खप कमी करू शकतं.
पण CCS कन्सलटन्सीच्या बेन वुड यांना असं वाटत नाही. ते म्हणतात, "लोकांची आयफोनवर असलेली निष्ठा पाहता त्यांना जर खरंच 5G फिचर हवं असेल तर ते वाट पाहातील."
शुल्काधारित सेवा
अॅपलचे सीईओ टीम कुक यांनी कंपनीच्या दोन शुल्काधारित सेवांविषयी माहिती दिली. अॅपल आर्केड - व्हीडिओ गेमची सेवा जी फोनमधल्या इनअॅप परचेसमध्ये उपलब्ध नाही. यामध्ये अनेक व्हीडिओ गेम्सला खास अॅक्सेस मिळेल. ही सेवा 19 सप्टेंबरपासून उपलब्ध होईल.
दुसरी सेवा म्हणजे अॅपल टिव्ही प्लस. ही एक टीव्ही आणि फिल्म स्ट्रीमिंग सर्व्हिस आहे. यावर उपलब्ध असलेलं कंटेन्ट दुसरीकडे कुठे उपलब्ध असणार नाही. ही सेवा 1 नोव्हेंबरपासून सुरू होईल.
ही सेवा प्रतिस्पर्धी नेटफ्लिक्स आणि डिस्नेपेक्षा स्वस्त असेल, पण यामध्ये असलेल्या कंटेटमध्ये विविधता कमी असेल.
स्टीव्ह जॉब्स यांनी पहिला आयफोन लॉन्च केला त्या घटनेला आता 13 वर्ष उलटून गेलेत.
तेव्हापासून अॅपल जगातल्या सगळ्यात मोठ्या कंपन्यांपैकी एक कंपनी बनली आहे. स्टीव्ह जॉब्स यांनी जशी किमया केली तशी किमया अॅपल पुन्हा करेल अशी अनेकांना आशा आहे. विशेषतः कंपनीच्या गुंतवणूकदारांना.
"सगळ्यांनाच आपल्याकडे अॅपलचे प्रॉडक्ट असावेत असं वाटतं. सगळ्यांना त्याची भुरळ पडली आहे. कंपनीचं कामही चांगलं आहे," वुड सांगतात.
"पण पुढची मोठी गोष्ट काय असेल हे सांगणं अवघड आहे. मला वाटतं कदाचित स्मार्ट चष्मे, पण ते घडायला कित्येक वर्षांचा कालावधी जावा लागेल."
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)