You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
अमेरिका, अॅपल आणि अॅमेझॉनची गुपितं चीनच्या हातात?
चीनी गुप्तहेरांनी ज्या अमेरिकन कंपन्यांचा डेटा चोरला आहे त्यात अॅपल आणि अॅमेझॉनचाही समावेश आहे असं एजन्सी ब्लुमबर्गनं म्हटलं आहे.
सर्व्हर सर्किट बोर्डात अगदी छोट्या छोट्या चीप्स बसवून हा डेटा चोरण्यात आला आहे. या चीप्स सुपर मायक्रो कंप्युटर या कंपनीनं बनवला होता असं या एजन्सीनं म्हटलं आहे.
या चीप्स सर्व्हर बनवतानाच त्यात बसवल्या गेल्या. हे सर्व्हर्स वेगवेगळ्या ऑफिसच्या कंप्युटर्समध्ये काम करायला लागल्यानंतर या चीप्स अॅक्टिव्हेट केल्या गेल्या.
मात्र अॅपल, अॅमेझॉन आणि सुपर मायक्रो कंप्युटर या कंपन्यांनी ब्लुमबर्गचे दावे खोटे आहेत, असं म्हणत त्यांचे दावे खोडून काढले आहेत.
ब्लुमबर्गच्या दाव्यांना उत्तर देण्यासाठी अॅपलनं एक प्रसिद्धीपत्रक काढलं आहे ज्यात म्हटलं आहे की, 'आम्हाला अशा प्रकारच्या दाव्यांना खरं ठरवणारे कोणतेही पुरावे सापडलेले नाहीत.'
तर ब्लुमबर्गचं असं म्हणणं आहे की त्यांचे पत्रकार जॉर्डन रॉबर्टसन आणि मायकेल रायली यांनी वर्षभराच्या तपासानंतर या सायबर हल्ल्यांचे पुरावे शोधून काढले आहेत. या हल्ल्यामुळे चीनला 30 मोठ्या कंपन्यांचा तसंच अमेरिकेच्या सरकारी एजन्सीमधला डेटा मिळाला आहे.
त्यांच्या मते अशी सायबर हेरगिरी होते आहे याची माहिती सर्वप्रथम अमेझॉननं 2015 साली केलेल्या सुरक्षा चाचणी दरम्यान पुढे आली. यावेळेपर्यंत ते एलिमेंटल या अमेरिकन कंपनीचे सर्व्हर वापरत नव्हते. हे सर्व्हर्स सुपर मायक्रो कंप्युटर कंपनीनं चीनमध्ये बनवले होते.
ही माहिती समोर आल्यानंतर अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणांनी याविषयी तपास करायला सुरूवात केली. हा तपास बराच काळ चालला.
ब्लुमबर्गचं म्हणणं आहे की, अशाप्रकारचे सायबर हल्ले करणं चीनसाठी खूप सोपं आहे, कारण जगातले 90 टक्के कंप्युटर्स चीनमध्ये बनतात.
अशा प्रकारचा हल्ला करण्यासाठी कंप्युटरशी निगडीत प्रॉडक्टचं सखोल ज्ञान हवं, फॅक्टरीमध्ये बनणाऱ्या पार्टसमध्ये बदल करता यायला हवा, आणि सगळ्यांत महत्त्वाचं म्हणजे असे पार्ट्स जगभरात पोहोचवण्याची क्षमता हवी.
अॅपल आणि अॅमेझॉनसह अनेक अमेरिकन कंपन्या आणि मोठ्या बँकादेखील सुपर मायक्रो कंप्युटरने बनवलेले पार्ट त्यांच्या कंप्युटरमध्ये वापरत होते.
ब्लुमबर्गचा दावा आहे की, अमेरिकन गुप्तचर संस्थांनी केलेल्या चौकशीनंतर अनेक कंपन्यांनी सुपर मायक्रोचे सर्व्हर्स वापरणं बंद केलं आणि त्या कंपनीशी असलेले सगळे संबंध तोडून टाकले.
मात्र अॅपल आणि अॅमेझॉनने ब्लुमबर्गच्या दाव्यात काही तथ्य नाही असं सांगितलं आहे.
आपल्या दीर्घ प्रसिद्धीपत्रकात अॅमेझॉन म्हणतं की, "अशा प्रकारचा सायबर अॅटॅक करणाऱ्या कोणत्याही चीपचा कोणताही पुरावा आम्हाला आढळून आलेला नाही."
सुपर मायक्रो कंप्युटरने म्हटलं की त्यांना कोणत्याही प्रकारच्या सरकारी चौकशीची माहिती नाही. त्यांच्या कोणत्याही ग्राहकाने त्यांचे प्रॉडक्टस वापरणं बंद केलेलं नाही.
चीनच्या परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं आहे की, हे दावे म्हणजे 'गंभीर आरोप आहेत.' आपल्यापर्यंत येणारे कंप्युटर प्रोडक्ट्स सुरक्षित आहेत की नाही अशी काळजी वाटणं सामान्य आहे. त्यात वेगळं असं काही नाही.
ब्लुमबर्गनं मात्र म्हटलं आहे की त्यांच्याकडे 6 आजीमाजी सुरक्षा अधिकाऱ्यांच्या तसंच अॅपल आणि अॅमेझॉनमध्ये काम करणाऱ्या लोकांच्या साक्ष त्यांच्याकडे आहेत ज्यावरून हे सिद्ध होतं की त्याचे दावे खरे आहेत.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)