अॅपलला झटका, एका दिवसात 75 अब्ज डॉलर्सचा चुराडा

एकाच दिवसात अॅपल कंपनीला 75अब्ज डॉलर्स म्हणजे जवळजवळ 5,25,800 कोटी रुपयांचं नुकसान झालं आहे.

जगातल्या सर्वांत मोठ्या कंपनींपैकी अॅपल कंपनीचे शेअर्स गुरुवारी अचानक कोसळले. 2018च्या तिमाहित कंपनीचं उत्पन्न अपेक्षेपेक्षा कमी होण्याची शक्यता कंपनीच्या प्रवक्त्यानं एक दिवस आधीच वर्तवली होती. त्याचाच हा परिणाम आहे, असं सांगितलं जात आहे.

काही दिवसांपर्यंत कंपनीचं उत्पन्न 89 अब्ज डॉलर्स होईल असा अनुमान लावला जात होता. पण बुधवारी 84 अब्ज डॉलर्स उत्पन्न होईल असं सांगण्यात आलं.

गेल्या 16 वर्षांत पहिल्यांदाच अॅपलने उत्पन्न कमी होण्याची शक्यता जाहीर केली आहे. या इशाऱ्यानंतर कंपनीच्या शेअर्समध्ये 10 टक्क्यांनी घसरण झाली आहे.

उत्पन्न का घटलं?

गेल्या तिमाहीत चीनी बाजारतील आयफोनं खरेदीचं प्रमाण घटल्याने कंपनीचं उत्पन्न घटलं आहे. कंपनीच्या या इशाऱ्यानंतर अमेरिकेचा मुख्य शेअर बाजार Nasdaq चा निर्देशांक 3.1 टक्क्यांनी खाली पडला.

ऑगस्ट 2018 मध्ये अॅपल कंपनी ही पहिली 1 ट्रिलियन डॉलर कंपनी झाली होती. अॅपलने अॅमेझॉन, मायक्रोसॉफ्ट आणि फेसबूक सारख्या मोठ्या कंपन्यांना मागे टाकत 1 ट्रिलियन डॉलरच्या कंपनीचा मान मिळवला होता.

असं का झालं?

याआधीच्या म्हणजे 2018च्या दुसऱ्या तिमाहित कंपनीच्या उत्पन्नात वाढ होईल असं कंपनीच्या अहवालात म्हटलं होतं. त्यानंतर कंपनीचे शेअर्स वधारले होते.

पण सद्यस्थितीत आयफोन मोबाईल खरेदीत मोठी घट हे यामागचं मुख्य कारण सांगितलं जात आहे. आतापर्यंत आयफोन ग्राहक हे नवीन मोबाईल बाजारात यायच्याआधी उत्सूक असायचे.

आयफोनचं नवीन मॉडेल बाजारात आलं की आयफोन स्टोअर्सच्यासमोर लोकांच्या रांगा लागायच्या. पण आता तसं होत नाही.

"आजकाल लोकांचं फोनच्या गुणवत्तेवरून नवीन फोन खरेदी करणं कमी झालं आहे. त्यात आयफोनची किंमत एक हजार डॉलर्स (एक लाख रुपये) इतकी झाली आहे," असं बीबीसीचे तंत्रज्ञान प्रतिनिधी डेव्ह ली यांनी सांगितलं.

कंपनीचं उत्पन्न घटण्याबाबत कंपनीला माहिती नव्हतं असं नाही. त्यामुळेच कंपनी नवीन क्षेत्रात आगेकूच करण्याचा प्रयत्न करत आहे. सध्या आरोग्य आणि फिटनेस क्षेत्रात चांगलीच प्रगती केली आहे. अॅपलची सेवा क्षेत्रातली कमाई ही फेसबूकच्या एकूण कमाई इतकी आहे.

"या नुकसानामुळे कंपनीचं भविष्य धोक्यात आहे, असं म्हणणं चुकीच ठरेल," असं डेव्ह ली सांगतात.

चीनची अर्थव्यवस्था मंदावली आहे. त्याचा थेट परिणाम तिथल्या आयफोन खरेदीवर झाला आहे. दुसरीकडे अमेरिका आणि चीनमधलं व्यापारी युद्ध हेही यामागचं कारण सांगितलं जात आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्या धोरणांमुळे अॅपलचं नुकसान झालं, असं अॅपलचे CEO टीम कूक यांनी म्हटलं आहे.

"व्यापारी युद्धाचे परिणाम आता दिसून येत आहे आणि त्याचा ग्राहकांचा विश्वास डगमगू लागला आहे," असं कूक म्हणाले.

अॅपलचं भलंही मोठं नुकसान झालं असेल, पण कंपनीच्या तिजोरीत सध्या अमाप पैसा पडलेला आहे. कंपनी एखाद्या नवीन क्षेत्रात पैसा गुंतवून परत भरारी घेऊ शकते.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)