You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
रमाकांत आचरेकर सरांवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार का नाही?
सचिन तेंडुलकरचे गुरू आणि ज्येष्ठ क्रिकेट प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांच्यावर गुरुवारी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
मुंबईतील दादरच्या शिवाजी पार्क स्मशानभूमीत आचरेकर सरांना अखेरचा निरोप देण्यासाठी आला. त्यावेळी सचिनसह विनोद कांबळी, चंद्रकांत पंडित, प्रवीण आमरे, बलविंदर सिंग संधू असे आचरेकरांचे शिष्यगण आणि अन्य आजी-माजी क्रिकेटर्स उपस्थित होते. सर्वांनाच अतीव दुःख झाल्याचं दिसून येत होतं.
सकाळी दहाच्या सुमारास आचरेकर सरांची अंत्ययात्रा सुरू झाली. आचरेकर सरांचे शेजारी आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरेही त्यावेळी घराबाहेर उभे होते.
ज्या शिवाजी पार्कच्या मैदानावर सरांनी मुंबईतल्या अनेक क्रिकेटपटूंकडून खेळाचे धडे गिरवून घेतले होते, त्याच मैदानात आचरेकर सरांचं पार्थिव काही काळासाठी आणण्यात आलं. मैदानातून निघताना युवा क्रिकेटपटूंनी बॅट उंचावून आचरेकर सरांना मानवंदना दिली. त्यावेळी सगळं वातावरण भावुक झालं होतं.
अंत्ययात्रा स्मशानभूमीपाशी पोहोचली तेव्हा सचिन, विनोद कांबळी आणि अन्य शिष्यगणांनी सरांच्या पार्थिवाला खांदा दिला.
आचरेकर सरांच्या आठवणीनं सर्वांचेच डोळे पाणावले. "आचरेकर सर म्हणजे अतिशय चांगल्या मनाची निर्मळ व्यक्ती. त्यांचं क्रिकेटवर आणि क्रिकेटपटूंवर प्रेम होतं. त्यांना प्रतिभावंत खेळाडूंना घडवण्यासाठी निस्वार्थपणे काम केलं.
आम्ही आचरेकरांच्या तालमीत तयार झालो आणि पुढे प्रशिक्षकही बनलो. प्रशिक्षण देताना आम्ही त्यांचीच तत्त्वं पाळली." अशी प्रतिक्रिया त्यांच्याच तालमीत तयार झालेले माजी कसोटीवीर बलविंदर सिंग संधू यांनी दिली आहे.
शासकीय इतमामात नाही, तर साधेपणानं अंत्यसंस्कार
दरम्यान, पद्म पुरस्कार प्राप्त आचरेकर सरांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार न झाल्यानं स्थानिक क्रिकेटरसिकांनी नाराजी व्यक्त केली. सरांच्या अंत्यसंस्काराच्या वेळेस सरकारचे प्रतिनिधी म्हणून केवळ गृहनिर्माण खात्याचे मंत्री प्रकाश मेहता उपस्थित होते. आचरेकर सरांवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार व्हायला हवे होते, पण ते का होऊ शकले नाहीत याची चौकशी व्हायला हवी असं मत त्यांनी मांडलं आहे. "क्रीडा खात्याचे मुख्यमंत्री विनोद तावडे मुंबईत नाहीत, प्रोटोकॉल मिनिस्टर नसल्यानं सरकारकडून प्रतिनिधी म्हणून मंत्रालयातून मला जाण्याची विनंती करण्यात आली" अशी माहिती त्यांनी दिली.
"आचरेकर सरांनी क्रिकेटला दिलेलं योगदान आणि त्यांचा पद्मश्रीनं झालेला सन्मान पाहता, त्यांना शासकीय इतमामात निरोप शासकीय सन्मान कुणाला मिळावा याविषयी नियम आहेत आणि पद्मश्री मिळालेल्या व्यक्तींचा त्यात समावेश आहे. आचरेकर सर हे तर या सर्वांपेक्षा वर असं व्यक्तिमत्व होतं. संबंधित विभागाचे मंत्री मुंबईत नसल्यामुळं म्हणा किंवा एक दोन दिवस असलेल्या सुटीमुळे म्हणा, कशामुळं हे राहिलं, यासंबंधी मी विभागीय मंत्री आणि माननीय मुख्यमंत्र्यांशी बोलेन. शासनाच्या वतीनं मी हे बोलतो, की अशा प्रकारचा जर नियम आहे तर अशा प्रकारची चूक होऊ नये."
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)