गुरूपौर्णिमा : तेंडुलकर, कांबळी, आगरकर सारख्या खेळाडूंना घडवणारे रमाकांत आचरेकर

    • Author, ऋजुता लुकतुके
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

गुरुपौर्णिमा हा दिवस गुरू शिष्याचं नातं साजरं करण्यासाठी आहे. क्रिकेट विश्वात अनेक दिग्गजांना घडवणारे गुरू म्हणून रमाकांत आचरेकर यांची ख्याती आहे. गुरुपौर्णिमेनिमित्त हा लेख पुन्हा प्रसिद्ध करत आहोत.

क्रिकेटपटूंना घडवत असतानाच प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांनी अनेक गुणी प्रशिक्षकांची फौज उभी केली. त्यांचे शिष्य असलेले अनेकजण आज राष्ट्रीय तसंच आंतरराष्ट्रीय संघांचे प्रशिक्षक म्हणून काम करत आहेत.

भारतीय क्रिकेटवेड्यांना जितकं सचिन तेंडुलकरचं नाव ठाऊक आहे तितकंच रमाकांत आचरेकर यांचंही...कारण, सचिन तेंडुलकरला घडवण्यात आचरेकर सरांचं क्रिकेटचं तंत्र आणि कडवी शिस्त यांचंही योगदान आहे. शिवाय सचिनच नाही तर विनोद कांबळी, प्रवीण अमरे, अमोल मुझुमदार, लालचंद राजपूत असे कितीतरी आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेटपटू त्यांनी घडवले. सरांची करडी नजर आणि तंत्र घोटवून घेण्याची पद्धत याबद्दल स्वत: क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर अनेकदा बोलला आहे. आयुष्य क्रिकेटला वाहिलेल्या रमाकांत आचरेकर सरांनी मुंबई क्रिकेटच्या किमान तीन पिढ्या घडवल्या. आणि त्याचबरोबर क्रिकेटला दिले त्यांचे उत्तराधिकारी म्हणजेच कोचेसही.

आचरेकर सर क्रिकेटचं विद्यापीठ

कारण, त्यांच्या मार्गदर्शनाखाली घडलेले लालचंद राजपूत, प्रवीण अमरे, चंद्रकांत पंडित, बलविंदर सिंग संधू, पारस म्हांब्रे, समीर दिघे आणि विनायक सामंत यांनी मुंबईच्या रणजी संघाचं प्रशिक्षक पद भूषवलं आहे. यापैकी लालचंद राजपूत सध्या झिंबाब्वेच्या राष्ट्रीय संघाचे प्रशिक्षक आहेत. त्यांच्या राष्ट्रीय संघाला गाळातून बाहेर काढण्याची कठीण जबाबदारी झिंबाब्वे क्रिकेट असोसिएशनने त्यांच्यावर सोपवलीय. पूर्वी सचिन तेंडुलकर आणि पाठोपाठ सौरव गांगुली कर्णधार असताना राजपूत यांनी भारतीय राष्ट्रीय संघाचीही धुरा सांभाळलीय.

तर प्रवीण अमरेंनी आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाची जबाबदारी सांभाळतानाच अजिंक्य रहाणे आणि सुरेश रैना यांना वैयक्तिक मार्गदर्शन केलं आहे. सरांचाच एक शिष्य अमोल मुझुमदार राजस्थान रॉयल्स या आयपीएल संघाचा प्रशिक्षक म्हणून नवीन हंगामात रुजू होणार आहे.

चंदू पंडित यांनी मुंबई रणजी संघाचे प्रशिक्षक म्हणून आपली छाप पाडलीच. शिवाय आता विदर्भ संघाची धुरा सांभाळताना संघाला बाद फेरीत नेण्याची किमया पहिल्याच प्रयत्नात केली आहे. भारतीय महिला क्रिकेट संघाला टी-20 विश्वचषकाच्या उपान्त्य फेरीपर्यंत घेऊन जाणारे रमेश पोवारही सरांचेच शिष्य.

आणि या सगळ्यावर कडी म्हणजे प्रत्यक्ष सचिन तेंडुलकर मिडलसेक्स ग्लोबल अकादमीच्या माध्यमातून नवीन खेळाडू घडवण्यासाठी सिद्ध झाला आहे. या उपक्रमात त्याचा मित्र विनोद कांबळीही त्याच्याबरोबर आहे.

सरांच्या आठवणी जागवताना प्रवीण आमरे यांनी सांगितलेली एक गोष्ट महत्त्वाची आहे. 'आचरेकर सरांची नजर पक्की होती. खेळाडूचा दर्जा ते एका नजरेत ओळखायचे. आणि त्यातून आपली रणनीती ठरवायचे. कधी फारसं कौतुक त्यांनी केलं नाही. पण, आत्मीयतेनं वागायचे. त्यातून त्यांचं प्रेम कळायचं. प्रशिक्षक म्हणूनही मी त्यांच्यासारखं वागायचा प्रयत्न करतो.'

प्रवीण अमरे यांनी सांगितल्या नुसार, एका शालेय सामन्या दरम्यान आचरेकर सरांनीच आमरे यांना हेरलं. आणि तिथून पुढे अमरे यांचं क्रिकेट बदललं आणि कारकीर्दही...

आचरेकर सर म्हणजे शिस्त

शिवाजी पार्क मैदानात सरांची नेट्स लांबवर पसरलेली होती. पण, सरांची नजर चौफेर होती. बॅटिंगचं शास्त्रशुद्ध तंत्र शिष्यांकडून घोटवून घेण्याला त्यांनी महत्त्व दिलं. त्यामुळे एकही चूक त्यांच्या नजरेतून सुटायची नाही. सराव आणि स्पर्धा असा खेळाडूंचा दिनक्रम होता.

आणि महत्त्वाचं म्हणजे दिवस संपल्यावर सगळ्या खेळाडूंना एकत्र जमवून दिवभरातली सरांची निरीक्षणं त्यांना वाचून दाखवण्याचा त्यांचा शिरस्ता होता. म्हणजे खेळाडूंच्या नकळत ते त्यांच्या खेळण्यातल्या आणि वागणुकीतले बारकावे टिपत असत. आणि दिवसाच्या शेवटी सगळ्यांसमोर त्यावर चर्चा व्हायची. अशाच एका चर्चेच्या वेळी विनोद कांबळीच्या गालावर सरांची पाच बोटं उमटली होती, हा किस्सा सगळ्यांनाच ठाऊक असेल. कांबळी एका क्लब मॅच दरम्यान बॅटिंग सोडून मैदानात उडत आलेला पतंग कापण्यात मशगूल झाला होता. आणि त्याचा प्रसाद संध्याकाळी त्याला मिळाला.

जेव्हा रमाकांत आचरेकर गेले होते तेव्हा सचिन तेंडुलकरने आपल्या सोशल मीडिया हँडलवर वाहिलेली श्रद्धांजली खूप बोलकी होती. 'आज देवलोकातलं क्रिकेट सरांमुळे समृद्ध झालं. क्रिकेटचं ए,बी,सी,डी सरांनी आम्हाला शिकवलं. शिवाय मैदानावर आणि जीवनातही सरळ बॅटने खेळण्याचा मंत्र दिला.' आपल्या संदेशात सचिन यांनी सरांचा उल्लेख क्रिकेटचं मॅन्युअल असा केला आहे.

गंमत म्हणजे आचरेकर सरांचं अख्खं कुटुंबंच क्रिकेट प्रशिक्षणात दंग आहे. त्यांची कन्या कल्पना मूरकर यांनी बीसीसीआयचा प्रथमस्तरीय क्रिकेट प्रशिक्षण अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. आणि मागची 27 वर्ष त्या आचरेकर क्रिकेट अकादमी सांभाळत आहेत. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवड समितीच्या सदस्य म्हणूनही त्या काम पाहतात. शिवाय आचरेकर सरांचे दोन नातू प्रदोष मयेकर आणि सोहम दळवी हे सुद्धा रुपारेल आणि कीर्ती महाविद्यालयाच्या क्रिकेट संघाचे व्यवस्थापक आहेत.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)