पंतप्रधान मोदींची मुलाखत : 'पत्रकारानं प्रतिप्रश्न विचारायचे असतात, हे शिकवणं गरजेचं' - सोशल

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 1 जानेवारीला ANI या वृत्तसंस्थेला मुलाखत दिली. पत्रकार स्मिता प्रकाश यांनी ही मुलाखत घेतली आहे. या मुलाखतीची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा सुरू आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यंगचित्राच्या माध्यमातून मोदींच्या मुलाखतीवर टीका केली आहे.

"मोदी स्वत:च स्वत:ला प्रश्न विचारत आहेत की, बोला... काय विचारू? अशा पद्धतीची ही एक मनमोकळी मुलाखत आहे," असं या व्यंगचित्रात म्हटलं आहे.

राज ठाकरे यांच्या या व्यंगचित्राला महाराष्ट्र भाजपानं ट्वीट करत उत्तर दिलं आहे.

"बुलेट ट्रेनमध्ये गरीब प्रवास करतील काय? असा प्रश्न नको विचारू राज! मग ते मला विचारतील लवासा गरिबांसाठी होतं काय? त्यापेक्षा आपलं ठरलेलं चालू दे! एक सेटिंगवाली मुलाखत!" असं महाराष्ट्र भाजपानं म्हटलं आहे.

काँग्रेसचे खासदार राजीव सातव यांनी या मुलाखतीवर टीका करत म्हटलं आहे की, "गेल्या 4 वर्षांत कोणतीही पत्रकार परिषद न घेणाऱ्या मोदींनी आता स्क्रिप्टेड मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत त्यांनी मन की बातच केली आहे आणि पसंतीनुरुप प्रश्नांची उत्तरं दिली आहे. शेतीवरील संकट, बेरोजगारी, सीबीआयमधील वाद, डोकलाम आदी विषयांवर या मुलाखतीत चर्चा झाली नाही."

"देशातील कळीच्या मुद्द्यांवर प्रश्न विचारल्याबद्दल मी स्मिता प्रकाश यांचं अभिनंदन करतो. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या प्रश्नांची नेहमीप्रमाणेच सरळ, खरी आणि टू द पॉईंट उत्तरं दिली आहे," असं भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते शाहनवाज हुसेन यांनी म्हटलं आहे.

यूट्यूबर ध्रुव राठी यांनी मात्र मुलाखतकार स्मिता प्रकाश यांच्यावर टीका केली आहे.

"प्रश्न अजून चांगले विचारता आले असते आणि उत्तरंही 'मन की बात'च्या पलीकडे देता आली असती. पटकथा लेखकानं चांगली कथा लिहिण्याची गरज आहे. तसंच पत्रकारालाही प्रतिप्रश्न विचारायचे असतात, हे शिकवणं गरजेचं आहे," असं ध्रुव राठीनं म्हटलं आहे.

कुशल शर्मा यांनी मोदींच्या मुलाखतीची प्रशंसा केली आहे.

"रफाल प्रकरणाशी संबंधित काँग्रेसनं तयार केलेला संभ्रम मोदींनी दूर केला आहे. लष्कराला सक्षम बनवण्याचा मोदींचा संकल्प मला आवडतो," असं त्यांनी ट्वीट करत म्हटलं आहे.

मृणाल पांडे यांनी ट्वीट करून विचारलं आहे की, "या मुलाखतीत किती वेळेस 'मैं' शब्द उच्चारला गेला आहे, हे तुम्ही मोजलं का?"

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)