नरेंद्र मोदींचा मुलाखतीत नरमलेला सूर ‘राहुल गांधी इफेक्ट’? - विश्लेषण

    • Author, सागरिका घोष
    • Role, ज्येष्ठ पत्रकार, बीबीसी हिंदीसाठी

2019 हे लोकसभा निवडणुकांचं वर्ष आहे. आणि त्यामुळेच नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी 'इलेक्शन मोड'मध्ये आलेले दिसलेआणि त्यांनी राजकीय वक्तव्यांनीच वर्षारंभ केला.

मोदी उत्तम संभाषक आहेतच, पण त्याबरोबर माध्यमांचा वापर कधी आणि कसा करायचा, याचीही त्यांना चांगली जाण आहे. त्यामुळेच ANI वृत्तसंस्थेला मुलाखत देण्यासाठी 1 जानेवारीचा दिवस निवडणं, हा त्यांच्या व्यूहरचनेचा भाग आहे, असं मला तरी वाटतं.

मात्र या मुलाखतीदरम्यान मोदींची देहबोली, त्यांची भाषा बदललेली दिसली. एरवी भाषण करताना किंवा संभाषणादरम्यानही ते जी आक्रमकता दाखवतात, ती या मुलाखतीमध्ये दिसली नाही. त्यांची भाषा विनम्रतेची होती.

सभांमध्ये मोदी आवेशानं बोलतात. 56 इंची छातीचा उल्लेख ते करतात. अतिशय कठोर, जहरी टीका विरोधकांवर करतात. मात्र ANIला दिलेल्या मुलाखतीमध्ये मात्र ते मृदू भाषिक वाटत होते.

या मुलाखतीमधून ते मध्यमवर्गीय आणि शहरी मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत असल्याचं वाटत होतं. नुकत्याच झालेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये पत्कराव्या लागलेल्या पराभवानंतर हिंदुत्वाचा मुद्दा फार चालणार नाही, हे भाजपच्या लक्षात आलं असावं.

गोरक्षणाच्या मुद्द्यावर होणारा हिंसाचार, बुलंदशहरातील घटना, नसीरुद्दीन शाह यांनी व्यक्त केलेली भीती, या सगळ्या गोष्टींचा भाजपवर नाही म्हटलं तरी काही ना काही परिणाम झाला आहे.

मध्यमवर्गीय मतदारांच्या मनातही ही भीती निर्माण व्हायला लागली आहे. आपल्या मुलाखतीमधून पंतप्रधान मोदी हीच भीती कमी करायचा प्रयत्न करताना दिसले. आपला हिंदुत्वाचा अजेंडा बाजूला ठेवून ते या मुलाखतीमध्ये बोलत होते.

आता राहिला प्रश्न राम मंदिराचा. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर राम मंदिराच्या मुद्द्यावर वटहुकूम काढण्यापासून ते मागे हटणार नाहीत. ही त्यांची दुटप्पी भूमिकाही असू शकते. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी परिस्थितीनुसार वेगवेगळ्या गोष्टी करतात.

का नरमले मोदी?

नरेंद्र मोदींनी आपल्या मुलाखतीमध्ये तीन राज्यांमध्ये भाजपचा झालेला पराभव स्वीकारला. आक्रमक भूमिका आता उपयोगाची नाही, हे त्यांच्या लक्षात आलं असावं. कारण या निवडणुकांपूर्वी सभांमधला त्यांचा आवेश आणि इंटरव्ह्यूमधली त्यांची भाषा पूर्णपणे वेगळी होते. आपल्या बोलण्याच्या पद्धतीमुळेही मतदार दुरावत असल्याचं त्यांना जाणवलं असावं.

त्यांच्या 'काँग्रेस मुक्त भारत' या घोषणेचा अर्थ काय आहे, हेदेखील मोदींनी या मुलाखतीमध्ये स्पष्ट केलं.

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीतील विजयानंतर 'भाजपमुक्त भारत' हा आपला अजेंडा नसल्याचं स्पष्ट केलं होतं

पंतप्रधान द्वेषाची भाषा करतात, असा आरोप राहुल गांधी सुरुवातीपासूनच करत होते. याच गोष्टींमुळे मोदींना आपल्या भाषेबद्दल पुनर्विचार करणं भाग पडलं असावं.

तीन राज्यांमध्ये पार पडलेल्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्यालाही भाजप नेते उपस्थित होते. राहुल गांधीसोबतचे त्यांचे फोटोही सोशल मीडियावर शेअर करण्यात आले.

राहुल इफेक्ट

राहुल गांधींची प्रतिमा गेल्या काही दिवसांमध्ये प्रचंड बदलली आहे. एक परिपक्व नेता म्हणून ते स्वतःला सिद्ध करण्यात यशस्वी ठरत आहेत.

राहुल गांधी अजूनही शिकत आहेत, असं म्हणून भाजप नेते त्यांना कायमच हिणवायचे. "भाजपचे लोक मला 'पप्पू' म्हणतात, पण मला त्यामुळे काही फरक पडत नाही," असं राहुल गांधींनी संसदेत म्हणत, आपल्या जागेवरून पंतप्रधानांजवळ जात त्यांना मिठीही मारली होती.

माझ्या मते या सगळ्या गोष्टींनी नरेंद्र मोदींना आपली भूमिका बदलायला भाग पाडलं असावं. त्यांचा हा नरमलेला सूर किती दिवस कायम राहतो, याबद्दल मात्र काही सांगता येत नाही. कारण निवडणुकांचं वारं वहायला लागलं की सर्वच गोष्टी बदलतात.

(लेखातील मतं लेखिकेची वैयक्तिक मतं आहेत.)

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)