मोदींच्या सभेत काळे कपडे, टोपी, शूज, बॅगवर बंदी - #5मोठ्याबातम्या

आजची वृत्तपत्रं आणि वेबसाईटवरील 5 महत्त्वाच्या बातम्या:

1) मोदींच्या सभेत काळ्या कपड्यांवर बंदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शनिवारी झारखंडमधील पलामू जिल्ह्य़ात सभा होत असून त्यांना काळे झेंडे दाखवले जाऊ नयेत, यासाठी सभास्थानी कोणत्याही प्रकारचे काळे कपडे घालून जाण्यास मनाई करण्यात आली आहे. लोकसत्तानं ही बातमी दिली आहे.

हा नियम सरकारी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनाही लागू आहे. पलामू पोलीस अधीक्षकांनी ही माहिती दिली.

राज्यात गेले तीन महिने कंत्राटी शिक्षकांचे आंदोलन सुरू आहे. त्यांच्याकडून मोदी यांना विरोध होण्याची शक्यता लक्षात घेऊन हे आदेश जारी करण्यात आले आहेत, असं या बातमीत म्हटलं आहे.

"पंतप्रधानांच्या सभेसाठी येणारे सरकारी कर्मचारी आणि सर्वसामान्य यांना काळा शर्ट, कोट, स्वेटर, मफलर, टाय, शूज किंवा काळे मोजे, काळी शाल, टोपी, बॅग, काळं कापडं या वस्तू घालता किंवा बाळगता येणार नाही. तसंच प्रत्येकाने ओळखपत्र सोबत ठेवावे, " पोलीस प्रशासनानं प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकात नमूद केलं आहे, असं हिंदूस्तान टाइम्सच्या बातमीत म्हटलं आहे.

"हे प्रतिबंधात्मक उपाय आहेत," असं पलामूचे पोलीस अधीक्षक इंद्रजीत महाथा यांनी सांगितलं.

2) अभिनेता प्रकाश राज लोकसभा निवडणूक लढवणार

नवीन वर्षाच्या शुभच्छा देत अभिनेता प्रकाश राज यांनी आगामी लोकसभा निवडणूक लढवणार असं जाहीर केलं आहे. त्यांच्या ट्वीटर अकाऊंटवरून अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार असं सांगितलं आहे. द वायर हिंदीने ही बातमी दिली आहे.

प्रकाश राज यांनी आजवर मोदी सरकारवर सातत्याने टीका केली आहे.

2017मध्ये पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येनंतर पंतप्रधान मोदी यांच्या मौनावर त्यांनी टीका केली होती. सोशल मीडियावर गौरी लंकेशविषयी असभ्य लिहीणाऱ्या व्यक्तींना पंतप्रधान फॉलो करतात यावरून राज यांनी नाराजी व्यक्त केली होती.

त्यांच्या सतत टीकेनंतर त्यांच्यावर हिंदू विरोधी असल्याचाय आरोप ही झाला होता, असं या बातमीत म्हटलं आहे. "मी मोदी विरोधी, शहा विरोधी आहे" असं त्यांनी जाहीरपणे म्हटलं होतं.

3) मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्या : शरद पवार

मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनावेळी कळंबोली आणि कामोठ्यातील मराठा समाजाच्या नागरिकांवर गंभीर गुन्हे दाखल झाले आहेत ते मागे घ्यावेत, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी केली आहे.

गुन्हे दाखल झालेल्यांमध्ये डॉक्टर, वकील, नोकरदार महिला यांचा समावेश आहे. या वर्गाकडून अशा प्रकारचे गंभीरकृत्य होणे ही बाब पटण्यासारखी नाही, असं ते म्हणाले. महाराष्ट्र टाइम्सनं ही बातमी दिली आहे. या व्यक्तींची योग्य चौकशी होऊन गुन्हे मागे घ्यावेत, असं पत्र त्यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलं आहे, असं बातमीत म्हटलं आहे.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी कळंबोली आणि कामोठे इथं मोठी निदर्शनं झाली होती. यात दगडफेक, वाहनं पेटवने असे प्रकार घडले होते, असं या बातमीत म्हटलं आहे. पोलिसांवर हल्ल्यांचे प्रकार घडले होते. या प्रकरणांत आंदोलकांवर पोलिसांनी जीवे ठार मारण्याचा प्रयत्न, सरकारी कामात अडथळा आदी गुन्हे नोदं झाले असल्याचं या बातमीत म्हटलं आहे.

4) निवडणूक रोखे (Electoral Bonds) विक्रीप्रक्रिया सुरू

निवडणूक रोख्यांच्या विक्रीचा सातवा टप्पा 1 जानेवरीपासून ते 10 जानेवारीपर्यंत असेल असं अर्थमंत्रालयानं सांगितलं आहे. राजकीय पक्षांना दिल्या जाणाऱ्या निधीत पारदर्शकता आणण्यासाठी रोख रकमेऐवजी निवडणूक रोखे किंवा electoral bondsची योजना आणल्याचं अर्थमंत्री अरुण जेटली यांनी यापूर्वी म्हटलं आहे. इकॉनॉमिक टाइम्सनं ही बातमी दिली आहे.

सहाव्या टप्प्यात एकूण 1,056.73 कोटी रुपयांचे रोखे भारतीय नागरिकांनी आणि संस्थांनी विकत घेतल्याची माहिती अर्थमंत्रालयाच्या परिपत्रकात दिली आहे.

5) मध्य प्रदेशात 1जानेवारीपासून वंदे मातरम् बंद

मध्य प्रदेशात राज्य सचिवालयाच्या बाहेर वंद मातरम वाजवणे बंद करण्यात आलं आहे. मुख्यमंत्री कमलनाथ यांनी हे आदेश दिले आहेत. राज्य सचिवालयाच्या बाहेर प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला वंदे मातरम् हे गीत वाजवले जात असे. ही बातमी सकाळनं दिली आहे.

देशभक्ती ही गायन करून दाखवायची गोष्ट नसून ती कर्मचाऱ्यांनी आपल्या कामातून दाखवावी अशी प्रतिक्रिया कमलनाथ यांनी दिली आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)