You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कादर खान : कब्रस्तानातून फिल्मी करीअर सुरू करणाऱ्या कलाकाराची गोष्ट
- Author, वंदना
- Role, बीबीसी टीव्ही एडिटर, भारतीय भाषा
ती रात्रीची वेळ होती, मुंबईत घराजवळ असलेल्या एका दफनभूमीजवळ अंधारात आणि निरव शांततेत एक मुलगा तिथं बसून संवाद फेकण्याचा सराव करत होता.
एका रात्री तो सराव करत असताना टॉर्चचा प्रकाश पडला आणि त्याला कुणी तरी विचारलं दफनभूमीत काय करत आहेस?
तो मुलगा म्हणाला, "मी दिवसा जे काही चांगलं वाचतो, ते बोलण्याचा सराव इथं रात्री करतो." अशरफ खान नावाची ती व्यक्ती चित्रपटांशी संबंधित होती.
त्यांनी त्या मुलाला विचारलं, "नाटकांत काम करशील?"
तो मुलगा होता कादर खान.
तिथून त्यांच्या फिल्मी जीवनाला सुरुवात झाली आणि हा प्रवास नंतर काही दशकं सुरू राहिला.
कबरस्तानमधील तो सीन
कादर खान यांनी 1977मध्ये 'मुक्कदर का सिंकदर'चं लेखन केलं. त्यात एक महत्त्वाचा सीन आहे, ज्यात अमिताभ बच्चन कबरस्तानमध्ये आईच्या निधनावर रडत असतो. तिथून जाणारा एक फकीर (कादर खान) त्या मुलाला म्हणतो,
"इस फ़कीर की एक बात याद रखना.
ज़िंदगी का सही लुत्फ उठाना है तो मौत से खेलो,
सुख तो बेवफ़ा है चंद दिनों के लिए आता है और चला जाता है
दुख तो अपना साथी है, अपने साथ रहता है
पोंछ दे आँसू. दुख को अपना ले. तक़दीर तेरे कदमों में होगी और तू मुक्क़दर का बादशाह होगा..."
कादर खान यांनी हा संवाद त्यांच्या घराजवळील कबरस्तानमध्ये लिहिला होता.
'डायलॉग किंग' कादर खान
70च्या दशकात संवाद लेखन आणि अभिनय यामध्ये कादर खान यांनी मोठं नाव कमावलं होतं.
खून पसीना, लवारिस, परवरिश, अमर अकबर अँथनी, नसीब, कुली अशा सिनेमांची पटकथा किंवा संवाद लिहिणारे कादर खान यांचा अमिताभ बच्चन यांची कारकिर्द सावरण्यात मोठा वाटा होता.
पण त्यांचं सुरुवातीचं आयुष्य संघर्षपूर्ण होतं.
त्यांनीच एकदा सांगतिलं होतं की अफगाणिस्तानात त्यांच्या जन्म होण्यापूर्वी त्यांच्या 3 भावांचं निधन झालं होतं. त्यानंतर त्यांच्या आईवडिलांनी अफगाणिस्तान सोडून भारतात येण्याचा निर्णय घेतला.
पण लवकरच त्यांच्या आईवडिलांचा घटस्फोट झाला. सावत्र वडिलांसोबत त्याचं लहानपण गरिबीत गेलं. असं असतानाही त्यांनी सिव्हील इंजिनीअरिंगमध्ये डिप्लोमा केला आणि कॉलेजमध्ये मुलांना शिकवू लागले.
कॉलेजमध्ये एका स्पर्धेत नरेंद्र बेदी आणि कामिनी कौशल परीक्षक होते. कादर खान यांना या स्पर्धेत अभिनय आणि लेखनासाठी पहिला क्रमांक मिळाला होता. बरोबरीने त्यांना एका सिनेमाचे संवाद लिहिण्याची जबाबदारी मिळाली. पगार होता 1500 रुपये.
1972ला त्यांना जवानी दिवानी आणि नंतर रफ़ू चक्कर हे सिनेमे मिळाले.
मनमोहन देसाईंनी जेव्हा दिलं होतं सोन्याचं ब्रेसलेट...
कादर खान यांच्या आयुष्यात 1974 साली एक महत्त्वाचं वळण आलं. यावर्षी त्यांना मनमोहन देसाई आणि राजेश खन्ना सोबत रोटी सिमेना त्यांना मिळाला.
मात्र मनमोहन देसाईंना कादर खान यांच्यावर विश्वास नव्हता. देसाई कादर खान यांना नेहमी म्हणायचे, तुम्ही लोक शायरी खूप उत्तम करता. पण लोकांनी टाळ्या वाजवाव्यात असे संवाद मला माझ्या चित्रपटासाठी हवे आहेत.
मग काय? कादर खान संवाद लिहून मनमोहन देसाईंकडे आले. त्यांना कादर खान यांनी लिहिलेले संवाद इतके आवडले, त्यांनी आपल्या घरातला तोशिबा टीव्ही, 21 हजार रुपये आणि सोन्याचं ब्रेसलेट कादर खान यांना तिथल्या तिथे भेट दिलं.
कादर खान यांना पहिल्यांदा संवाद लेखनाचे एक लाखाहून अधिक मानधन मिळालं होतं. इथूनच त्यांचा मनमोहन देसाई, प्रकाश मेहरा आणि अमिताभ बच्चन यांच्यासोबतचा यशस्वी आणि अविस्मरणीय प्रवास सुरू झाला.
कादर खान यांनी लिहिलेले चित्रपट आणि संवाद एकापाठोपाठ एक हिट ठरत गेले. अमिताभ बच्चन यांच्या अग्निपथ, शराबी, सत्ते पे सत्ता अशा एकापेक्षा एक हिट चित्रपटांचे संवाद कादर खान यांनी लिहिले आहेत.
अभिनयातला हिरा
संवादलेखनासोबतच कादर खान यांचा अभिनय प्रवासही सुरू झाला होता.
1973 साली आलेल्या दाग चित्रपटात कादर खान वकिलाच्या एका लहानशा भूमिकेत दिसले होते. त्यानंतर 1977मध्ये एका चित्रपटात त्यांनी अमिताभ बच्चन यांच्यासोबत पोलीस इन्स्पेक्टरची भूमिका केली. यानंतर खून पसीना, शराबी, नसीब, कुर्बानी असा यशस्वी चित्रपटांची मालिका सुरू झाली. कादर खान चित्रपटसृष्टीत खलनायकाच्या भूमिकेत चांगलेच स्थिरावले.
अमिताभ बच्चन यांच्यासोबत मैत्री
कादर खान यांच्याकडं एक मजेदार कौशल्य होतं. त्यांना लिप-रिडिंग करायला जमायचं. म्हणजे लांबूनच एखाद्याच्या ओठांची हालचाल पाहून ते शब्द ओळखायचे.
आपल्या मुलाखतींमध्ये ते एक किस्सा आवर्जून सांगायचे, "सुरुवातीच्या दिवसांमध्ये मी मनमोहन देसाईंच्या घरी गेलो होतो. मला लांबून पाहून ते म्हणाले, की 'उल्लू के पठ्ठे को समझ में नहीं आया, फिर आ गया.' तुम्ही माझ्याबद्दल असं म्हणाला आहात, हे मी त्यांच्याजवळ जाऊन त्यांना सांगितलं. मी लिप-रिडिंग करू शकतो, हे मी त्यांना बोललो. नंतर नसीब चित्रपटाच्या दरम्यान त्यांनी असंच दृश्य वापरलं, ज्यामध्ये नायिका लिप रिडिंग करुन खलनायक काय बोलत आहे, हे ओळखते."
अमिताभ बच्चन यांच्या कारकिर्दीमध्ये कादर खान यांची भूमिका महत्त्वाची होती. त्याकाळात कादर खान आणि अमिताभ बच्चन यांची अगदी घट्ट मैत्री होती.
बीबीसीला दिलेल्या एका मुलाखतीत कादर खान यांनी सांगितलं होतं, "मला अमिताभला घेऊन चित्रपट बनवायचा होता. त्याचं नाव जाहिल असं ठरलं होतं. मात्र या चित्रपटाच्या आधीच बच्चन यांना कुलीच्या शूटिंगदरम्यान गंभीर दुखापत झाली. त्यानंतर ते राजकारणात गेले आणि माझा चित्रपट कधी बनलाच नाही. आमच्यामध्ये त्यानंतर दुरावा आला."
विनोदी भूमिकांमध्येही ठसा
कादर खान यांनी 1983 साली हिम्मतवाला या चित्रपटाचं लेखन केलं. त्यामध्ये त्यांनी विनोदी भूमिकाही केली. त्यांना आपल्या खलनायकी प्रतिमेमधून बाहेर पडायचं होतं. तिथूनच त्यांच्या लिखाण आणि अभिनयातही बदल झाला.
संवादामध्ये संतापाऐवजी टपोरी भाषा आली. बीबीसीला दिलेल्या मुलाखतीमध्ये कादर खान यांनी हिंदी चित्रपटांतील भाषेचा दर्जा घसरण्याचा दोष स्वतःलाही दिला होता.
90च्या दशकापर्यंत कादर खान यांनी आपलं लिखाण कमी केलं होतं. मात्र डेव्हिड धवन आणि गोविंदासोबत त्यांची जोडी चांगलीच जमली होती. तेव्हाही आपले संवाद ते स्वतःच लिहायचे.
स्वतः अजिबात न हसता चित्र-विचित्र चेहरे करून प्रेक्षकांना कसं हसवायचं याची पक्की समज कादर खान यांना होती.
हरहुन्नरी कादर खान
कादर खान हे एक हरहुन्नरी व्यक्तिमत्त्व होतं. अभिनयासोबतच ते उस्मानिया विद्यापीठातून अरबी भाषेचे धडेही गिरवत राहिले.
गेल्या एक दशकापासून कादर खान चित्रपटाच्या दुनियेपासून दूर गेले होते. अरबी शिकल्यानंतर त्यांनी स्वतःला धार्मिक कामांमध्ये गुंतवून घेतलं. तब्येत खराब झाल्यानंतर ते अधिककाळ आपल्या मुलांसोबत कॅनडामध्येच राहू लागले.
कादर खान यांनी चित्रपट लेखन, संवाद आणि अभिनयाची स्वतःची एक वेगळी शैली निर्माण केली. ज्यांच्याकडे उत्तम संवादशैली, लेखनाचा गुण आणि अभिनयक्षमता आहे, असे कलाकार खरंच कमी असतात.
चित्रपट रसिक या नात्यानं मला नेहमी वाटत की कादर खान यांच्या क्षमतांचा योग्य वापर चित्रपटसृष्टीनं करून घेतला नाही.
कादर खान यांच्या अजरामर संवादांची एक झलक:
हम -मोहब्बत को समझना है तो प्यारे ख़ुद मोहब्बत कर, किनारे से कभी अंदाज़े तूफ़ान नहीं होता.
अग्निपथ-विजय दीनानाथ चौहान, पूरा नाम, बाप का नाम दीनानाथ चौहान, मां का नाम सुहासिनी चौहान, गांव मांडवा, उम्र 36 साल 9 महीना 8 दिन और ये सोलहवां घंटा चालू है'
कुली-हमारी तारीफ़ ज़रा लंबी है.बचपन से सर पर अल्लाह का हाथ और अल्लाहरख्खा है अपने साथ. बाजू पर 786 का है बिल्ला, 20 नंबर की बीड़ी पीता हूं, काम करता हूँ कुली का और नाम है इक़बाल
अंगार-ऐसे तोहफे (बंदूकें) देने वाला दोस्त नहीं होता है, तेरे बाप ने 40 साल मुंबई पर हुकूमत की है इन खिलौनों के बल पर नहीं, अपने दम पर'
सत्ते पे सत्ता- दारू-वारू पीता नहीं अपुन. मालूम क्यों ? क्योंकि दारू पीने से लिवर ख़राब हो जाता है. वो उस दिन क्या हुआ अपुन दोस्त का शादी में गया था. उस दिन ज़बरदस्ती चार बाटली पिलाई. वैसे मैं दारू नहीं पीता क्योंकि दारू पीने से लिवर ख़राब हो जाता है.
मुक़दर का सिकंदर- ज़िंदगी का सही लुत्फ़ उठाना है तो मौत से खेलो
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)