You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
मृणाल सेन यांचं निधन: 'मानवकेंद्रित सिनेमे बनवणारा दिग्दर्शक गेला'
प्रसिद्ध दिग्दर्शक मृणाल सेन (95) यांचे कोलकाता येथे निधन झालं.
त्यांचा जन्म 14 मे 1923 रोजी फरिदपूर (आजच्या बांगलादेशमध्ये) मध्ये जन्मलेले सेन यांची बंगाली आणि हिंदी भाषेतील विविध चित्रपटांमुळे देश-विदेशात मोठी ख्याती होती.
1955 साली 'रातभोर' हा त्यांचा पहिला सिनेमा प्रसिद्ध झाला होता. त्यांच्या प्रसिद्ध चित्रपटांमध्ये 'नील आकाशेर निचे', 'पदातिक', 'इंटरव्ह्यू', 'कोलकाता इकेतोर', 'ओका उडी कथा', 'जेनेसिस', 'महापृथ्वी', 'खारिज', 'एक दिन प्रोतिदिन', 'भुवन शोम', 'अकालेर संधान', 'खंडहर', 'एक दिन अचानक', 'मृगया' और 'अंतरिन' यांचा समावेश आहे.
1969मध्ये प्रसिद्ध झालेल्या 'भुवन शोम' चित्रपटाचे दिग्दर्शक म्हणून मृणाल सेन यांना आंतरराष्ट्रीय ख्याती प्राप्त झाली. 1983 साली त्यांच्या 'खारिज' चित्रपटाला कान, व्हेनिस, बर्लिन, कार्लोवी चित्रपट महोत्सवात ज्यूरी पुरस्कार मिळाला.
1976 साली त्यांनी दिग्दर्शित केलेल्या 'मृगया' चित्रपटासाठी मिथुन चक्रवर्तीला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. 'मृगया' हा मिथुन चक्रवर्ती यांचा पहिला चित्रपट होता.
मृणाल सेन यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. 1998 ते 2003 या कालावधीत ते राज्यसभेचे सदस्य होते. ते राष्ट्रीय फिल्म विकास निगमचेही सदस्य होते तसेच FTIIचेही अध्यक्ष होते.
मृणाल सेन यांना 2003 या वर्षासाठी दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
सोशल मीडियावर शोककळा
सेन यांच्या निधनांने शोशल मीडियावर सर्वत्र शोक व्यक्त केला जात आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका ट्वीटद्वारे त्यांना श्रद्धांजली वाहिली. ते म्हणाले, "मृणाल सेन यांनी काही संस्मरणीय चित्रपट आम्हाला दिले, त्याबद्दली आम्ही त्यांचे ऋणी आहोत. अतिशय कलात्मकरीत्या आणि संवेदनशीलतेने ते सिनेमा बनवायचे. त्यांचं काम अनेक पिढ्यांना आवडणारं होतं. त्यांच्या निधनाचं दुःख आहे."
बंगालच्या मुख्यंत्री यांनी ट्विटरवर त्यांना शोकसंदेश दिला आहे. "त्यांच्या जाण्याने सिनेउद्योगाचं मोठं नुकसान झालं आहे. त्यांच्या परिवाराचं सांत्वन," असं त्या म्हणाल्या.
माकप नेते सीताराम येचुरी म्हणाले की, "एक मानवकेंद्रित सिनेमे बनवणारा दिग्दर्शक गेला. त्यांच्या जाण्याने फक्त सिने जगताचंच नाही तर भारतीय संस्कृती आणि कला जगताचं मोठं नुकसान झालं आहे."
बंगाली अभिनेत्री पाओली दामनेही ट्विटर शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)