You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कादर खान यांचे निधन : 'माझी ही इच्छा अपूर्ण राहिली'
- Author, प्रभात पांडे
- Role, बीबीसी प्रतिनिधी
ज्येष्ठ अभिनेते कादर खान यांचं निधन झालं. ते 81 वर्षांचे होते. गेले काही दिवस ते रुग्णालयात होते. त्यांच्या निधनाने हिंदी चित्रपटसृष्टीतील अष्टपैलू अभिनेता काळाच्या पडद्याआड गेला आहे. त्यांचा मुलगा सर्फराज यांनी ही माहिती दिली. खलनायक, चरित्र आणि विनोदी भूमिका, संवाद लेखन अशा जबाबदाऱ्या त्यांनी समर्थपणे पेलल्या होत्या.
अभिनेते कादर खान आणि अमिताभ बच्चन या दोघांचे एकत्र अनेक सिनेमे आहेत. अदालत, सुहाग, मुकद्दर का सिकंदर, नसीब आणि कुलीसारख्या प्रसिद्ध चित्रपटांमध्ये या दोघांनी एकत्र काम केले होते.
याशिवाय कादर खान यांनी अमर अकबर अँथनी, सत्ते पे सत्ता आणि शराबी यासारख्या चित्रपटांचे संवादही लिहिले होते. मात्र अमिताभ बच्चन यांना घेऊन सिनेमा काढण्याची त्यांची इच्छा पूर्ण झाली नाही.
बीबीसीला त्यांनी पूर्वी दीर्घ मुलाखत दिली होती. ते म्हणाले होते, "मला अमिताभ बच्चन, जयाप्रदा, अमरिश पुरी यांना घेऊन सिनेमा करायचा होता. त्या चित्रपटाचं दिग्दर्शनही मला करायचं होतं. मात्र देवाच्या मनात काहीतरी वेगळंच असावं."
हे सांगताना त्यांनी कुली सिनेमाची आठवणही सांगितली होती. कुलीच्या वेळेस अमिताभ बच्चन यांना अपघात झाल्यामुळे ते अनेक महिने हॉस्पिटलमध्ये होते. उपचार संपल्यावर अमिताभ परतले पण तोपर्यंत कादर खान त्यांच्या दुसऱ्या चित्रपटात व्यग्र होते. तर तिकडे अमिताभ राजकारणात गेले होते. या दोघांमध्ये काही कारणाने वितुष्टही आले होते असे कादर खान यांनी सांगितले होते. मात्र नंतर सारंकाही सुरळीत झालं.
अमिताभ बच्चन यांचं कौतुक करताना कादर खान म्हणाले होते, "ते परिपूर्ण कलाकार होते. अल्लाने त्यांना चांगला आवाज, चांगली भाषा, चांगली उंची आणि बोलके डोळे दिले आहेत."
कादर खान गेली काही वर्षे चित्रपटांपासून दूर गेले होते. "काळानुसार चित्रपट बदलत गेले. त्यामुळे त्या नव्या संचात मी बसू शकत नसल्याचे मला दिसून आलं. बदलत्या काळानुसार माझ्यामध्ये बदल होणं मला असंभव वाटलं. मग मीच सिनेमापासून दूर राहाण्याचा निर्णय घेतला असं त्यांनी सांगितलं होतं." नव्या कलाकारांची भाषा आपल्याला येत नसल्याबद्दल त्यांनी खंतही व्यक्त केली होती.
मुंबईय्या भाषेबद्दलची खंत
नव्या चित्रपटांबद्दल बोलताना कादर खान म्हणायचे, "चित्रपटात मुंबईय्या भाषेचा वापर केला गेल्यामुळे तिच चित्रपटांची मुख्य भाषा झाली. त्यानंतर या भाषेआड चित्रपटांची भाषा खराब होत गेली."
याचा थोडा दोष ते स्वतःलाही द्यायचे. ते म्हणाले होते, "आम्हीच सिनेमाची भाषा बिघडवली. आता ती आम्हालाच सुधारायला हवी. चित्रपटांमध्ये पुन्हा यावे लागेल."
80च्या दशकामध्ये जितेंद्र, मिथुन यांच्याबरोबर 90च्या दशकात गोविंदाबरोबर कादर खान यांनी अनेक सिनेमे केले होते.
सिनेमासृष्टीतला आपली कारकीर्द आठवताना ते गहिवरून यायचे. असरानी, शक्ती कपूर, गोविंदा, जितेंद्र, अरुणा इराणी यांच्याबरोबर केलेले अनेक सिनेमे आणि या सगळ्या कलाकारांसह घालवलेल्या काळाची फार आठवण येते असे ते सांगायचे. असरानी यांचं त्यांना विशेष कौतुक होतं.
"नंतरच्या काळामध्ये चित्रपट निर्मात्यांचं लक्ष फक्त आणि फक्त पैसे कमावण्यातचं राहिलं त्याचा परिणाम गुणवत्तेवर होत गेला" असं ते सांगायचे.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)