You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
शबरीमला मंदिर प्रवेशावरून केरळच्या महिलांची '620 किमीची मानवी साखळी'
"लिंग समभावाला पाठिंबा देण्यासाठी" केरळच्या महिलांनी '620 किलोमीटरची मानवी साखळी' बनवली आहे. याला शबरीमला वादाची पार्श्वभूमी आहे.
10 ते 50 या वयोगटाल्या मासिक पाळी येणाऱ्या महिलांना शबरीमला मंदिरात प्रवेश नाकारला जात होता. सप्टेंबर महिन्यात सर्वोच्च न्यायालयानं या प्रथेला रद्दबातल ठरवलं होतं, पण त्यानंतरही मंदिरात प्रवेश करू पाहणाऱ्या महिलांना लक्ष्य केला जात आहे.
राज्यातील डाव्या आघाडीच्या सरकारनं या 'वुमेन वॉल'चं आयोजन केलं होतं.
"ही साखळी बनवण्यासाठी राज्यातील सर्व राष्ट्रीय महामार्गावर जवळपास 50 लाख महिला जमा झाल्या होत्या," असं अधिकाऱ्यांनी बीबीसी प्रतिनिधी इम्रान कुरेशी यांना सांगितलं. राज्याच्या उत्तरेकडील कासारगोड ते दक्षिणेकडील थिरुवनंतपुरमपर्यंत ही साखळी विस्तारलेली होती.
30 लाख महिलांनी या यात भाग घेतील, असा आयोजकांचा आधी अंदाज होता.
लिंग समभावाला पाठिंबा देण्यासाठी तसंच महिलांना मंदिरात बंदी असावी, या उजव्या विचारांच्या गटांना प्रत्युत्तर म्हणून ही साखळी बनवली गेली होती, असं अधिकारी सांगतात.
"महिलांची ताकद दाखवून देण्याचा हा उत्तम मार्ग आहे. सर्व वयोगटातल्या मंदिरात प्रवेश द्यावा, याच विचारांची मी आहे. परंपरा महिलांना मंदिर प्रवेशापासून रोखू शकत नाही, असं मला वाटतं. ज्यांना प्रार्थना करायची आहे, त्यांना प्रार्थनेचा अधिकार मिळायलाच हवा," असं इथे या साखळी आंदोलनात सहभागी झालेल्या कविता दास सांगतात.
बंदीचं राजकारण?
शबरीमला मंदिरात प्रवेशासाठी महिलांना असणारी बंदी ही लिंग समभावाविरोधात आहे, अशी याचिका दाखल करण्यात आली होती. यानंतर सर्वोच्च न्यायालयानं शबरीमालात महिलांना प्रवेश द्यावा, असा आदेश दिला होता.
पण सर्वोच्च न्यायालयाचा हा आदेश म्हणजे हिंदू धर्मीयांच्या नीतीमूल्यांवर हल्ला आहे, असं भारतीय जनता पक्षानं म्हटलं आहे.
देशातील सार्वत्रिक निवडणुका बघता हा मुद्दा वादग्रस्त ठरत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी विद्वेषाचं राजकारण करत आहे, असा आरोप विरोधकांनी केला आहे.
अनेक ठिकाणी हिंदू परंपरेनुसार मासिक पाळीत महिलांना अपवित्र मानलं जातं आणि या काळात त्यांना धार्मिक विधींपासून दूर ठेवलं जातं. पण मासिक पाळी नसल्यास अनेक मंदिरांत महिलांना प्रवेश दिला जातो.
ब्रह्मचारी देवाचं मंदिर
देवळातील देवाच्या इच्छेविरुद्ध न्यायालयाचा निर्णय आहे, असं उजव्या विचारांच्या आंदोलकांनी म्हटलं आहे.
महिलांना मंदिरात करण्यात आलेला विरोध फक्त मासिक पाळीपुरता मर्यादित नाही. यात देवाच्या इच्छेचाही समावेश आहे. आशीर्वाद घेण्यासाठी येणाऱ्या भक्तांनी नियमांचं पालन करावं, अशीच देवाची इच्छा आहे, असं त्यांचं म्हणणं आहे.
मंदिराच्या पौराणिक कथेनुसार, भगवान अयप्पा यांनी ब्रह्मचर्यांची शपथ घेतली आहे आणि म्हणूनच त्यांच्या दर्शनासाठी महिलांना बंदी आहे.
राज्यातील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्न फार कमी महिलांनी केला आहे, आणि ज्यांनी प्रयत्न केलाय त्यांना सुरक्षेच्या कारणास्तव परतण्यास भाग पाडण्यात आलं आहे.
असं असलं तरी ऑक्टोबरमध्ये मुख्य दोन महिला मुख्य मंदिर परिसर गाठण्यात यशस्वी ठरल्या होत्या. या महिला मुख्य गाभाऱ्याकडे जात असताना त्यांच्यावर निदर्शकांनी दगडफेक केली होती. तेव्हा 100हून अधिक पोलिसांनी त्यांना संरक्षण दिलं होतं.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)