नरेंद्र मोदी यांच्यापुढे 2019 मध्ये काय उभं ठाकलंय?

    • Author, सुनील गाताडे
    • Role, राजकीय विश्लेषक

'पहिला घास घेत असतानाच पानात माशी पडावी,' असा विचित्र प्रकार पंतप्रधान नरेंद्र मोदींना गेल्या आठवड्यात अनुभवावा लागला.

'पुढचा पंतप्रधान कोण, हे सांगणं अवघड आहे,' असं म्हणत रामदेव बाबांनी लोकसभा निवडणुकांच्या तीन-चार महिन्यांआधी मोदींची सद्दी संपत चालली आहे, अशी जणू भविष्यवाणीच केली.

ज्या रामदेव बाबांच्या पतंजली उद्योगसमूहाचा कारभार मोदी आणि भाजपच्या विविध राज्य सरकारांच्या सक्रिय पाठिंब्यामुळे बहरला, अब्जो रुपयांचा टर्नओव्हर झाला, त्या योगगुरूंनीच अक्षरशः टोपी फिरवली. त्यामुळे नवीन वर्षात पुन्हा एकदा मैदान मारण्याचे मनोरथ बाळगणाऱ्या मोदींकरता जणू माशी शिंकली.

रामदेव यांचे संघ परिवारात देखील मोठे प्रस्थ असल्याने मोदी भक्तांकरिता हा 'तोंड दाबून बुक्क्याचा मार'च होता. 'स्वदेशी'ची चूल पेटत ठेवून या योगगुरूने आपल्या पोळीवर चांगलेच तूप वाढून घेतले ही बाब वेगळी.

राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने तीन राज्यं काय जिंकली, मोदींच्या दुसऱ्या टर्मच्या स्वप्नांना अक्षरशः सुरुंग लागला आहे, असं रामदेवसारखेच काल परवापर्यंतचे मोदी समर्थक आता म्हणू लागले आहेत. मोदी विरोधकांनी ईडा-पीडा टाळण्यासाठी देव अगोदरच पाण्यात सोडून ठेवले आहेत.

हा पराभव भाजपच्या जिव्हारी लागणं स्वाभाविक आहे. ही तिन्ही राज्यं हिंदी भाषिक. जसा ब्रिटिश साम्राज्यावर सूर्य मावळत नव्हता असे म्हणायचे, तद्वत या तीन प्रदेशात भाजपचा भगवा बलवत्तर होता, असं मानलं जायचं.

मोदींच्या आधिपत्याखाली बहुतांशी देश आला असताना हे तीनही खंदे बुरुज ढासळले. अब्रह्मण्यम. अब्रह्मण्यम.

या अगोदर गेल्या वर्षभरात झालेल्या लोकसभेच्या जवळजवळ डझनभर पोटनिवडणुकांपैकी बहुतांशी भाजप आणि त्याचे मित्रपक्ष हरले. गोरखपूर, फुलपूर आणि कैराना ही उत्तर प्रदेशमधील तीन मतदारसंघ देखील भाजपने गमावली.

दिल्लीत गोंधळ, नागपुरात हालचाली

अशावेळी भाजपमधील अस्वस्थता दिसली नसती तरच नवल. पक्षातले ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची एकामागून एक जी बेधडक विधानं आलेली आहेत, त्याबाबत त्यांनी जरी विश्वामित्री पवित्रा घेतला आहे, आणि आपल्या म्हणण्याचा विपर्यास करण्याचा कट सुरू आहे, असं त्यांचं म्हणणं असलं, तरी पण प्रत्यक्षात तसं काही वाटत नाही.

गडकरींसारखा कसलेला खेळाडू वारंवार सेल्फ-गोल करणं संभवत नाही. क्रिकेटच्या भाषेत बोलायचं झालं तर गडकरींची विधाने गुंडाप्पा विश्वनाथच्या लेटकटप्रमाणे आहेत. शिताफीने शेवटच्या क्षणी टच केलेला चेंडू सीमापार जाणारच.

आणि गडकरी म्हणजे ऐरागैरा नेता नव्हे. ते भाजपचे अध्यक्ष राहिलेले आहेत, तेसुद्धा कुणाच्या मेहेरबानीवर नव्हे तर संघाच्या आशीर्वादाने.

साक्षात सरसंघचालकांनी अयोध्येत मंदिर बांधण्यासाठी सत्वर कायदा करावा, असं सांगून महिना उलटून गेला. तरी देखील सरकार शांत आहे. नागपूर त्यामुळे खूश असणे, असे मानणं दूधखुळेपणा होईल.

संघाने मोदी-शहांना घडवलं आहे. मोदी-शहांनी संघाला नव्हे.

भाजपमध्ये नवं युग?

"अहो, बाहेर काय चाललंय, हे बघायला आम्हाला वेळ नाही. कारण आमच्या आतच महाभारत सुरू आहे," हे एका भाजप खासदाराचं सूचक विधान, म्हणजे मोदी-शहा यांचा अंमल आता पूर्वीसारखा एकछत्री राहिलेला नाही आणि पक्षातील असंतुष्ट वेगवेगळ्या प्रकारे सक्रिय झालेले आहेत, हे सांगतं.

नुकताच राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये आलेला पराभव म्हणजे एका दृष्टीने इष्टापत्तीच होय, असं मानणारे सुब्रमण्यम स्वामींसारखे नेते विरळ. स्वामी यांच्यानुसार यामुळे आता भाजप आपली मरगळ झटकेल आणि नव्या जोमाने कामाला लागेल.

भाजपमध्ये सारे काही आलबेल नाही, याची चिन्हं बराच काळ दिसत होती.

मध्य प्रदेश निवडणुकांच्या ऐन रणधुमाळीतच परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी प्रकृतीच्या कारणामुळे "मी येती लोकसभा निवडणूक लढवणार नाही," अशी जाहीर घोषणा करून मोदी-शहा तसंच साऱ्या पक्षाला चकित केलं होतं.

सुषमा गेला काही काळ नाराज आहेत, असं ऐकायला मिळत होत, त्याची ही साक्षात प्रचिती असल्याचं जाणकार सांगतात. भाजप नेतृत्वाने अजूनपर्यंत सुषमांच्या या घोषणेवर प्रतिक्रिया दिलेली नाही, हे विशेष.

पण विधानसभा निवडणुकांमधील पराभवांमुळे पक्षांतर्गत समीकरणं झपाट्याने बदलत आहेत. मध्य प्रदेश आणि राजस्थान हरल्यामुळे मोदी-शहा एकप्रकारे जरूर कमजोर झाले आहेत, पण माजी मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान आणि वसुंधरा राजे नव्हे.

चौहान आणि राजे यांनी त्यांच्या प्रदेशात भाजपचे तेच सर्वोच्च नेते आहेत हे पराभवात देखील दाखवून दिले आहे. मध्य प्रदेशात निकाल येत असताना चौहान यांना बाजूला सारून नवीन नेत्याला मुख्यमंत्री करण्याचा खेळ दिल्लीहून खेळला गेला. त्यामुळे ते नाराज आहेत, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

राजस्थानमध्ये ऐन निवडणुकीत केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंग शेखावत अथवा अर्जुन राम मेघवाल यांना पुढील मुखमंत्री बनवलं जाईल, असा संदेश वसुंधरा विरोधकांना दिल्लीने दिला होता. त्यामुळे मोदी-शहा यांच्याशी नेहमीच फटकून राहिलेल्या राजे क्रुद्ध झाल्या आहेत, असं कळतं.

मोदी-शहा यांनी विविध राज्यात आपल्या होयबांचंच फक्त भलं केल्याने नाराज झालेले निष्ठावंत नेते एका संधीची वाट पाहत आहेत. केंद्रात निराळी स्थिती आहे, असे नाही.

पराभवाचे धनी कोण?

पाच राज्यात भोपळा हाती लागल्यावर झालेल्या संसदीय पक्षाच्या बैठकीत राम मंदिराचं बांधकाम कधी सुरू होणार, अशा प्रकारच्या बऱ्याच प्रश्नांना गृहमंत्री राजनाथ सिंग याना सामोरं जावं लागलं होतं.

'धीर धरा' एवढेच राजनाथ यांचं पालुपद या बैठकीत राहिलं. मोदी आणि शहा या बैठकीला नव्हते.

शहा यांनी आता राज्यवार खासदारांना भेटण्यासाठी बैठक सुरू केल्या आहेत. या बैठका दोन-तीन तास चालत असल्या तरी त्याचा गाजावाजा आजिबात होत नाहीये.

पराभव पोरका असतो, असं म्हणतात. म्हणूनच ना पंतप्रधान मोदी ना पक्षाध्यक्ष शहा यांनी यावर अजून काही भाष्य केलं आहे.

शत्रुघ्न सिंहांसारखे पक्षातील असंतुष्ट आत्मे मात्र जाहीरपणे विचारत आहेत. 'जर विजय कॅप्टनचा असतो, मग पराभवदेखील कॅप्टनचा असायला हवा? बरोबर ना?'

मित्रपक्षांत कुठे बळ, कुठे पळ

आणि या विधानसभा निवडणुकांमधील पराभवांमुळे भाजपचे मित्रपक्ष भेदरलेले दिसत आहेत. शिवसेना तर अतिआक्रमक झाली आहे. आतापर्यंतच्या साऱ्या अपमानांचा जणू बदला उद्धव ठाकरे घेत आहेत.

'रफाल'प्रश्नी तर त्यांनी राहुल गांधीची 'चौकीदार चोर है'ची भाषा उचलली आहे. 'मोदी-योगी सरकार में, भगवान राम तंबू में,' अशी फिरकी सेना घेत आहे.

भाजपतील निष्ठावंत प्रश्न विचारत आहेत - 'तिहेरी तलाकचं विधेयक मंजूर होऊ शकतं तर मग सत्वर मंदिर बनवण्याचं का नाही?'

याउलट नितीश कुमार यांचे संयुक्त जनता दल असो वा रामविलास पासवान यांची लोक जनशक्ती पार्टी, 'आघाडीच्या अजेंड्याबाहेर गेलात तर याद राखा,' अशी ते ताकीद देत आहेत.

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकारने ताबडतोब प्रभावी उपाययोजना केली नाही तर निवडणुकीत प्रलय ओढवेल, असा इशारा अकाली दल देत आहे.

एकीकडे संघ परिवार आणि शिवसेनेचा मंदिर निर्माणासाठी हट्ट तर दुसरीकडे पाच राज्यांच्या निवडणुकीत अयोध्येचा ना पडलेला प्रभाव अशी स्थिती आहे. राहुल गांधींनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा प्रश्न ऐरणीवर आणला आहे.

मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये अशी कर्जमाफी करून या प्रश्नांवर 'मी मोदींना शांत झोप घेऊ देणार नाही,' असं जाहीर केलं आहे.

मोदीच शेर

आता जनमताचे वारे परत आपल्याकडे फिरवण्यासाठी तीन लाख कोटी रुपयांची कर्जमाफी करण्याच्या योजनेवर पंतप्रधान मोदी विचार करत आहेत. पण अशा योजनेमुळे अर्थव्यवस्थेचे बारा वाजू शकतात, असाही इशारा मिळत आहे.

'मैं इधर जाऊ या उधर? बड़ी मुश्किल में हुँ, मै किधर जाऊ?' अशा भोवऱ्यात मोदी अडकले आहेत.

येत्या 10 आणि 11 जानेवारीला नवी दिल्लीत भाजपची राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक भरत आहे. त्यात भांड्याला भांडे लागणार की गहिरे विचार मंथन होणार, ते स्पष्ट होईल.

पाच वर्षापूर्वी अशा बैठकांपूर्वी "कौन आया? शेर आया" अशा आरोळ्यांमध्ये मोदींची नाट्यमय एन्ट्री कार्यकारिणीच्या मंचावर व्हायची. पूर्वीच्या त्या उत्साहाची जागा आता चिंतेने घेतली आहे. पक्ष अध्यक्षांवर शरसंधान करून मोदींना योग्य तो संदेश या बैठकीत दिला जाऊ शकतो. पण भाजपमध्ये अजूनही मोदीच शेर आहे, हे निर्विवाद.

(या लेखातील तंलेखकाची वैयक्तिक तं आहेत.)

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)