मोदी मुलाखत: राम मंदिर ते नोटाबंदी, 10 मुद्द्यांमध्ये काय म्हणाले पंतप्रधान

2019 हे लोकसभा निवडणुकांचं वर्ष आहे, म्हणजे पुन्हा देशाला कौल देण्याची संधी. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2019च्या पहिल्याच दिवशी ANI या वृत्तसंस्थेला मुलाखत दिली आहे.

या मुलाखतीत त्यांना भ्रष्टाचार, काळा पैसा आणि नोटाबंदीसह अनेक मुद्द्यांवर बोलत विरोधकांवर कडाडून हल्ला केला आहे.

काँग्रेसनेही या मुलाखतीला 'खोदा पहाड, निकला चूहा' म्हटलं आहे.

त्यांच्या मुलाखतीमधील प्रमुख मुद्दे:

1. राम मंदिरावर

राम मंदिरासंबंधीची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आम्ही त्यासंबंधीच्या अध्यादेशाबाबत विचार करू, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.

दरम्यान, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने मोदींच्या या वक्तव्याला मंदिर निर्माण होण्याच्या दिशेने 'सकारात्मक पाऊल' म्हटलं आहे. "हे भाजपच्या 1989च्या पालमपूर अधिवेशनात संमत झालेल्या प्रस्तावाला अनुकूल आहे. या प्रस्तावात भाजपने म्हटलं होतं की राम जन्मभूमीवर भव्य राम मंदिर बनवण्यासाठी संवादाद्वारे किंवा योग्य तो कायदा बनवण्याचा प्रयत्न केला जावा."

"2014मध्ये भाजपच्या आश्वासनांपैकी एक राम मंदिर होतं. त्यामुळे जनतेने त्यांच्यावर विश्वास दाखवला होता. त्यामुळे या सरकारने याच कार्यकाळात हे आश्वासन पूर्ण करावं, ही सरकारकडून जनतेला अपेक्षा आहे," असं संघाचे सहसरकार्यवाह दत्तात्रेय होसाबळे म्हणाले.

2. लोकसभा निवडणुकांवर

2019ची निवडणूक सामान्य जनता विरुद्ध महाआघाडी अशी असेल. सामान्य जनतेचं प्रेम आणि आशीर्वाद यांचं फक्त प्रकटीकरण म्हणजे नरेंद्र मोदी होय.

लाट जनतेच्या अपेक्षेची असते. आज देशातील लोकांमध्ये विश्वास निर्माण झाला आहे.

महाआघाडीत लोकांना सामील करून घेण्यासाठी विरोधक अफवा पसरवत आहेत. 2014मध्ये यांनीच आम्हाला 200हून कमी जागा मिळतील, अशी चर्चा केली होती.

3. 'नोटाबंदी झटका नव्हता'

नोटाबंदी हा झटका नव्हता. वर्षभरापूर्वी आम्ही लोकांना त्याबाबत सूचित केलं होतं. 

तुमच्याकडे काळा पैसा असेल तर तुम्ही तो बँकेत जमा करू शकता, त्यासंबंधीचा दंड भरू शकता आणि नंतर तुम्हाला मदत होईल, असं आम्ही सूचित केलं होतं. पण लोकांना वाटलं ही मोदी काही नाही करणार.

हे तथ्य आहे की ज्या एका कुटुंबाच्या 4 पिढ्यांनी देशातली सत्ता गाजवली, ते एवढी आर्थिक अनियमितता झाल्यावरही बाहेर आहेत, यातील माणसं जामिनावर बाहेर आहेत. त्यांच्याच सेवेत असणारी माणसं नोटाबंदीबाबतची अशी चुकीची माहिती देण्याचा प्रयत्न करत आहेत.

मोदींच्या या वक्तव्याविषयी तुम्हाला काय वाटतं? तुम्ही आपली प्रतिक्रिया या पोस्टवर नोंदवू शकता.

4. सर्जिकल स्ट्राइक्सवर

एका लढाईमुळे पाकिस्तान सुधारेल, हा चुकीचा समज आहे. पाकिस्तानला सुधारण्यासाठी आणखी वेळ लागणार आहे.

5. RBI वादावर

ऊर्जित पटेल यांनी वैयक्तिक कारणासाठी राजीनामा देण्याचा विचार माझ्यापुढे मांडला होता. त्यांनी 6 ते 7 महिन्यांपूर्वीच मला ही बाब सांगितली होती. त्यांनी ते लेखीसुद्धा दिलं होतं.

राजकीय दबावाचा विषयच येत नाही. RBIचे गव्हर्नर म्हणून त्यांनी चांगलं काम केलं आहे.

6. 100% घरांमध्ये वीज?

ज्या 18,000 गावांत वीज नव्हती, तिथपर्यंत आम्ही वीज पोहोवचली.

7. विधानसभा निवडणुकांमधील पराभवाबद्दल

काँग्रेसमध्ये घराणेशाही आणि भ्रष्टाचार ही संस्कृती आहे. काँग्रेसनं स्वत: यापासून दूर जावं.

भारतीय जनता पक्ष जगातील सर्वांत मोठा राजकीय पक्ष आहे. पोलिंग बूथच्या बळावर भाजप चालतो. त्यामुळे एक-दोन लोक भाजप चालवतात, असं ते लोक म्हणतात जे भाजपला ओळखत नाहीत. 

8. काळा पैसा आणि भ्रष्टाचारावर

यापूर्वी देशात समांतर अर्थव्यवस्था चालू आहे, या बाबीला कुणीच नकार देत नव्हतं. नोटाबंदीनं खूप मोठं काम केलं आहे. पोतं भरभरून पैसा बँकिंग प्रणालीत आला आहे. पारदर्शकता वाढत चालली आहे.

देश सोडून पळून गेलेल्या लोकांसाठी आंतरराष्ट्रीय कायदा असतो. या लोकांसाठी सरकार शक्य तेवढे प्रयत्न करत आहेत. राजकीय आणि कायदेशीर प्रयत्न सुरू आहेत. देशातल्या लोकांचा पै न पै आम्ही परत आणण्यासाठी वचनबद्ध आहोत.

आर्थिक घोटाळ्यांतील आरोपी जामिनावर बाहेर आहेत. देशाच्या पहिल्या राजकीय कुटुंबातील लोक जामिनावर बाहेर आहेत.

देशाचे माजी पंतप्रधान आज न्यायालयाचे चक्कर मारत आहेत, हे काही कमी नव्हे.

9. मध्यम वर्गीयांवर

मध्यवर्गीय लोक स्वाभिमानानं जगतात. देशासाठी सर्वांत जास्त योगदान मध्यमवर्गीय देतात. त्यांची काळजी घेणं आमचं काम आहे. मुद्रा योजना, आयुष्मान भारत योजना, उडान योजना यांसारख्या योजनांमधून मध्यमवर्गीय लोकांना फायदाच होतो आहे.

10. शेतकऱ्यांवर

सर्वच सरकारं वेळोवेळी कर्ज माफ करत आली आहेत. पण यानंतरही शेतकरी कर्जबाजारी होत आहे. शेतकरी कर्जबाजारी होऊ नये, अशी स्थिती निर्माण करायला हवी. म्हणून याऐवजी शेतकऱ्यांना चांगलं बियाणं, पाणी मिळायला हवं.

आमच्या सरकारनं सिंचन योजनांवर काम केलं. आमच्या योजनांमुळे उत्त्पन्न वाढलं आहे. फूड प्रोसेसिंग, वेअर हाऊसिंग, ट्रान्सपोर्टेशनवर आम्ही मोठं काम करत आहोत.

SSP-22 पिकांना आम्ही किमान आधारभूत किंमत (MSP) देत आहोत. पूर्वीच्या सरकारनं हे केलं असतं तर शेतकरी कर्जबाजारी झाला नसता. 

बहुतांश शेतकरी सावकाराकडून कर्ज घेतात. मरणारा शेतकरी आजही व्यवस्थेच्या बाहेर आहे. शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी आम्ही बांधील आहोत.

काँग्रेसचा पलटवार

नरेंद्र मोदींची मुलाखत झाल्या झाल्या विरोधी पक्ष काँग्रेसने "'मेरा', 'मुझे' और 'मैंने', हे मोदींच्या मुलाखतीचं सार आहे," असं म्हटलं आहे.

मोदींनी ANIला दिलेल्या या मुलाखतीनंतर काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी एक पत्रकार परिषद घेत 10 प्रश्नांची उत्तर मोदींकडून मागितली आहेत.

1.देशात 15 लाख रुपये जनतेच्या खात्यात आले की नाही?

2.80 लाख कोटी रुपये इतका काळा पैसा देशात परत आला का?

3.दोन कोटी रोजगार दरवर्षी निर्माण झालेत का?

4.शेतकऱ्यांना उत्पादन उत्पादन खर्चावर आधारित दीडपट हमीभाव मिळाला का?

5.GSTमुळे धंदा मंद नाही झाला का?

6.नोटाबंदीदरम्यान साडे तीन लाख कोटींचं नुकसान, 120 लोकांचा मृत्यू झाला, याला जबाबदार कोण?

7.रफाल खरेदी प्रकरणावर संयुक्त संसदीय समिती का गठित केली नाही?

8.गंगा नदी स्वच्छ झाली का?

9.100 पैकी किती शहरं स्मार्ट सिटी झालीत?

10.'स्टार्ट अप इंडिया', 'मेक इन इंडिया'चं काय झालं?

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)