अरविंद केजरीवाल यांचं कथित पॉर्न व्हीडिओ पाहण्यामागचं सत्य काय?

    • Author, फॅक्ट चेक टीम
    • Role, बीबीसी न्यूज

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ट्विटरवर ट्रोल केलं जातंय, आणि त्याचं कारण आहे, त्यांनी एक कथित अश्लील व्हीडिओ लाईक केल्याचं.

आम आदमी पक्षाचे बंडखोर आमदार कपिल मिश्रांनी सकाळी एक ट्वीट केला. "दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल ट्विटरवर पॉर्न व्हीडिओ पाहताना सापडले. काल रात्री ते ट्वीटरवर पॉर्न व्हीडिओ लाईक करत होते"

केजरीवाल यांच्यावर निशाणा साधताना कपिल मिश्रांनी म्हटलं की "आणायचं होतं पूर्ण स्वराज्य, पण हे घेऊन बसलेत पॉर्न स्वराज्य"

मिश्रा यांनी पुरावा म्हणून जो व्हीडिओ शेअर केला आहे, को 60 हजाराहून अधिक वेळा पाहिला गेलाय. हजारो लोकांनी हा व्हीडिओ शेअर केला आहे.

कपिल मिश्रा यांच्याशिवाय दिल्ली भाजपचे प्रवक्ते तेजिंदर सिंग बग्गा, आयटी सेलचे पुनित अग्रवाल आणि अकाली दलाचे राष्ट्रीय प्रवक्ते मनजिंदर सिंह सिरसा यांनीही असाच एक व्हीडिओ शेअर केला आहे. याच नेत्यांच्या माध्यमातून हा व्हीडिओ शेकडो लोकांपर्यंत पोहोचला आहे.

यातील बहुतेक नेत्यांनी हाच दावा केला आहे, की अरविंद केजरीवाल पॉर्न व्हीडिओ पाहात होते.

बीबीसीनं या व्हीडिओची तपासणी केली. यात हा व्हीडिओ एका निर्वस्त्र माणसाचा असल्याचं समोर आलं. पण तो 'पॉर्न' व्हीडिओ असल्याचा दावा खोटा आहे.

'खतरनाक स्टंट'

हे सत्य आहे, की बुधवारी रात्री अरविंद केजरीवाल यांनी हा व्हीडिओ लाईक केला होता. ज्यावरुन त्यांना ट्रोल करणारे हा व्हीडिओ पॉर्न व्हीडिओ असल्याचं सांगतायत.

हा व्हीडिओ मूळच्या ऑस्ट्रेलियाच्या असलेल्या लेखिका आणि इंग्लंडमध्ये वकिली करणाऱ्या हेलेन डेल यांनी ट्वीट केला आहे.

बुधवारी सकाळी ट्वीट करण्यात आलेला हा व्हीडिओ जवळपास 70 लाख वेळा पाहिला गेलाय. आणि 32 हजार लोकांनी हा व्हीडिओ लाईक केला आहे.

हेलेन यांनी ट्वीटरवर लिहिलंय की हा व्हीडिओ इंटरनेटवर खूपच लोकप्रिय आहे.

हा व्हीडिओ जपानचे कॉमेडियन कोजुहाए जुएकूसा यांचा आहे. ज्यांना डायनिंग टेबलवर वापरण्यात येणाऱ्या कपड्यांशी 'खतरनाक स्टंट' करण्यासाठीही ओळखलं जातं.

जुएकुसा गेल्या 10 वर्षांपासून स्टेज कॉमेडी करतात. बऱ्याच लोकप्रिय जपानी टीव्ही शोजमध्येही ते झळकले आहेत. याच कर्तबगारीमुळे त्यांना 'Britain's Got Talent' या रिअलिटी शोच्या सेमीफायनलपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली.

यू-ट्यूब वर त्यांचे 5 हजार सबस्क्राईबर्स आहेत. ट्वीटरवर त्यांना 34 हजार जण तर इन्स्टाग्रामवर सव्वा लाख लोक फॉलो करतात.

तो व्हीडिओ पॉर्न श्रेणीत मोडत नाही

यू-ट्यूब, ट्वीटर आणि इन्स्टाग्रामने आपल्या मापदंडानुसार कॉमेडियन कोजुहाए जुएकुसा यांचा व्हीडिओ एक कला आहे, त्यामुळे तो पॉर्न श्रेणीतून बाहेर ठेवला आहे.

उदाहरणदाखल पाहिलं तर यू-ट्यूबच्या 'Nudity and sexual content policy' नुसार त्यांच्या प्लॅटफॉर्मवर पॉर्नोग्राफी वर्ज्य आहे, त्यामुळे पॉर्न व्हीडिओ लगेच हटवले जातात.

मात्र निर्वस्त्र होऊन कुणी शैक्षणिक, वैज्ञानिक, कला किंवा डॉक्युमेंटरीच्या उद्देशाने व्हीडिओ पोस्ट करत असेल तर तो स्वीकारार्ह मानला जातो.

मात्र सोशल मीडियावर बरेच लोक कॉमेडियन कोजुहाए जुएकूसा यांनी निर्वस्त्र होऊन केलेला स्टंट हा अश्लीलता मानून त्यावर टीका करत आहेत.

ट्वीटरवर ट्रोल झाल्याने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही लाईक केलेला ट्वीट अखेर अनलाईक केला आहे. त्यामुळे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल 'पॉर्न व्हीडिओ' पाहताना सापडले, हा आरोप खोटा आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)