भविष्यातले रोबो हुबेहूब माणसांसारखे असतील का?

गेल्या ही दिवसांपासून माणसांसारख्या दिसणाऱ्या रोबोंचा ट्रेंड वाढला आहे. पण एखादं मशीन अगदी हुबेहूब माणसासारखं दिसणं भीतीदायक नाही का? माणसाच्या भविष्याला याने काही धोका उत्पन्न होणार नाही?

हुबेहूब माणसांसारखे दिसणारे, वागणारे, त्यांच्यासारख्या भावना असणारे रोबो अनेकदा सिनेमात दाखवले आहेत. 1980 साली आलेल्या जॉनी 5 पासून ते आताच्या अव्हेंजर्स: द एज ऑफ अल्ट्रॉन पर्यंत अनेक रोबो माणसांसारखेच होते.

पण खरंच असं होऊ शकतं का? आणि अशा रोबोंची आपल्याला किती गरज आहे?

डॉ. बेन गोअर्टजेल यांनी एक आर्टिफिशिअल इंटेलिजन्स सॉफ्टवेअर तयार केलं होतं. याच सॉफ्टवेअरवर आधारित सोफिया नावाचा एक रोबो तयार केला गेला. ती अगदी खऱ्याखुऱ्या बाईसारखी दिसते. हाँगकाँगच्या हॅन्सन रोबोटिक्स या कंपनीने ही रोबो तयार केली आहे.

गोअर्टजेल यांना वाटतं की रोबोट माणसांसारखे दिसायला हवेत. म्हणजे माणसांच्या मनात रोबोटविषयी जो संशय आहे तो दूर होईल. बीबीसीशी बोलताना त्यांनी सांगितलं की, "येणाऱ्या काळात बनणारे रोबोट हे माणसांसारखेच असतील. कारण लोकांना असे रोबोट आवडतात."

त्यांना वाटतं की माणसांसारख्या दिसणाऱ्या रोबोटला लोक चांगल्या प्रकारे आदेश देऊ शकतील, इतकंच नाही त्यांच्याबद्दल आपल्या गर्लफ्रेंडशी गप्पाही मारू शकतील.

"मला वाटतं की सॉफ्टबॅक प्रकारचे पेपर रोबो दिसायला अगदीच वाईट असतात. पण सोफिया तुमच्या डोळ्यात डोळे घालून पाहील आणि तुमच्या चेहऱ्यावर असणारे हावभाव प्रतिबिंबित करू शकेल. एखाद्या रोबोच्या छातीवर असणाऱ्या मॉनिटरकडे बघण्यापेक्षा तिच्या डोळ्यात बघणं हा एकदम वेगळा अनुभव असेल."

आतापर्यंत 20 नवीन सोफिया रोबो बनवण्यात आले असून यापैकी 6 रोबोचा जगभरात वापर होत आहे. या रोबोचा वापर भाषणं द्यायला आणि तांत्रिक प्रशिक्षण देण्यासाठी करण्यात येत आहे.

अनेक कंपन्यांनी ग्राहकांना आकर्षित करण्याच्या उद्देश्याने सोफियाचा वापर करण्यासाठी हॅन्सन रोबॉटिक्सशी संपर्क साधलेला आहे. पण एक गोष्ट मात्र स्पष्ट आहे की सोफिया असो वा पेपररोबोसारखा मानवसदृश्य रोबो असो. पण असे रोबो तयार करणं अजूनही खूप खर्चिक आहे. खुद्द डॉ. गोअर्टजेल देखील ही गोष्ट नाकारत नाहीत.

पण अनेक रोबोटिस्ट (रोबॉटिक सायंटिस्ट) याच्याशी सहमत नाहीत.

रोबोट विद्रोह करू शकतात का?

इंट्यूशन रोबोटिक्सचे सहसंस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. स्क्युलर हे रोबो माणसाप्रमाणे दिसण्याच्या किंवा बोलण्याच्या विरोधात आहेत.

त्यांची कंपनी एलिक्यू नावाचा लहानसा सोशल रोबो बनवते. या रोबोचं उद्दिष्टं आहे ज्येष्ठांचं एकटेपण दूर करणं. हा रोबोट बोलू शकतो आणि प्रश्नांची उत्तरंही देऊ शकतो.

त्यांचं असं म्हणणं आहे की एलिक्यू वापरणाऱ्यांना याची आठवण करून द्यावी लागते की हे एक यंत्र आहे, खरी व्यक्ती नाही. आणि असं करणं त्रासदायक असल्याचं ते सांगतात.

रोबोटिस्ट मसाहिरो मोरी यांचं असं म्हणणं आहे की रोबो जितके जास्त मनुष्यसदृश होतील तितकं जास्त आपल्याला त्यांच्यापासून घाबरून रहावं लागेल आणि तितके ते अधिक विद्रोही होतील.

रोबोंनी नैतिकदृष्ट्या माणसासारखं वागण्याची अपेक्षा करणं चूक असल्याचं ते म्हणतात.

रोबोंना असतील कायदेशीर अधिकार?

एका टप्प्यावर आल्यावर माणसाच्या हे लक्षात येईल की हे रोबो आहेत आणि यातलं काहीच खरं नाही, त्यावेळी स्वतःला फसवल्यासारखं त्यांना वाटेल.

ते म्हणतात, "तुम्हाला फसवणं आणि तुम्हाला जे हवंय ते देणं यामध्ये काही संबंध असल्याचं मला वाटत नाही."

"एलिक्यू हा एक प्रेमळ मित्र आहे. आमच्या संशोधनावरून आम्ही हे नक्कीच सांगू शकतो की तो एक सकारात्मक आपुलकीची भावना देऊ शकतो आणि एकटेपणा घालवू शकतो ते ही माणूस असल्याचं ढोंग न करता."

कार्नेगी मेलन विद्यापीठाच्या रोबोटिक्स इन्स्टिट्यूटचे एक संशोधन प्रोफेसर डॉ. रीड सिमन्स याला दुजोरा देतात.

"अगदी मानवी व्यवहार करण्यापेक्षा फक्त डोळे मिचकवता येणं आणि इतर काही गोष्टी करता येणं हेच रोबोसाठी भरपूर असल्याचं आमच्यापैकी अनेकांचं मत आहे."

अनकॅनी व्हॅली म्हणजे काय?

जेव्हा आपण रोबो पाहतो आणि त्यात आपल्याला सजीव व्यक्तीप्रमाणे साधर्म्य दिसत नाही तेव्हा आपल्यात मनात एक वेगळीच भावना निर्माण होते त्या भावनेला अनकॅली व्हॅली म्हणतात.

"अनकॅनी व्हॅली सारखी परिस्थिती निर्माण होणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायला हवी कारण यामुळे अनेक गोष्टींची शक्यता निर्माण होते ज्या गोष्टींची पूर्तता तंत्रज्ञान करू शकणार नाही," सिमन्स सांगतात.

सिंग्युलॅरिटी हा असा एक प्लॅटफॉर्म आहे जिथे डेव्हलपर्स आर्टिफिशियल इंटेलिजन्स अॅप्स तयार करू शकतात. याचा वापर सोफियासारख्या रोबोंमध्ये केला जातो.

या अॅपचे निर्माते डॉ. गोअर्टजेल यांचं असं म्हणणं आहे की काळासोबत रोबो स्मार्ट होतील. अगदी माणासांपेक्षा स्मार्ट झाले नाहीत तरी माणसाएवढे स्मार्ट तर नक्कीच होतील.

आणि यानंतर "माणसासारखे दिसणारे रोबोस आपल्याला चहूबाजूंना दिसायला लागतील आणि आपल्याला त्याची सवय होईल."

ते म्हणतात की अनेकदा असंही होतं की लोकांना माणसांपेक्षा मशीन्सची सवय पटकन होते.

पण असा टप्पा येईल का जिथे रोबोटसना संवेदना असतील, आवड-निवड ठेवण्याची मुभा असेल आणि कायदेशीर अधिकारही असतील?

डॉ. गोअर्टजेल म्हणतात, "मला वाटतं की जर रोबोही माणसांइतकेच हुशार झाले तर त्यांच्यात संवेदनाही येतील."

'दयाळू रोबोट पाहिजे'

आर्टिफिशियल इंटेलिजन्स क्षेत्रामध्ये यावर विश्वास असणाऱ्यांची संख्या भरपूर असली तरी अजूनही यावर मोठ्या प्रमाणात विचार करण्यात येत नाही.

ते म्हणतात की पाच वर्षांपूर्वीपर्यंत आर्टिफिशियल जनरल इंटेलिज्नसवर फार कमी संशोधन होत असे. पण आता याबाबतच गांभीर्य वाढलेलं असून गुगलसारख्या मोठ्या कंपन्यांनी यामध्ये लक्ष घातलेलं आहे.

"आपल्याला माणसांपेक्षा जास्त दयाळू रोबोजची गरज आहे."

पण बहुतेक रोबोटिक्स आणि कॉम्प्युटर सायंटिस्ट त्यांच्याशी सहमत नाहीत.

डॉ. स्क्युलर यांच्यामते हे शक्य नाही.

"भावना असणं हा विशिष्ट मानवी गुण आहे आणि हे पूर्णपणे जिवंतपणाचं लक्षण आहे."

ते म्हणतात, "नैतिकता आणि मूल्यं या गोष्टी आकडेवारीवरून 'सेट' करता येत नाहीत. हे त्या भावना आणि नैतिकतेशी संबंधित असतं ज्यांच्यासोबत आपण लहानाचे मोठे होतो."

पण आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीने हे रोबोटस माणसासारखं वागायला शिकू शकतात आणि कोणत्या परिस्थितीत काय प्रतिक्रिया द्यायची, हे त्यांना समजू शकतं.

टोयोटा रिसर्च इन्स्टिट्यूटच्या सोबत इंट्यूशन रोबोटिक्स एका अशा प्रकल्पावर काम करत आहे ज्यामध्ये कारसाठी एक डिजीटल सोबती बनवला जाईल. लोकांना कारमध्ये सुरक्षित ठेवणं, हे त्याचं उद्दिष्टं असेल.

मानवी मेंदूची नक्कल करणं कठीण

ब्लॅक मिररच्या नुकत्याच आलेल्या एका भागामध्ये मायले सायरस एका अशा पॉप सिंगरच्या भूमिकेत आहे जिने तिची सगळी ओळख एका आर्टिफिशियल इंटेलिजन्स सिस्टीममध्ये डाऊनलोड केलेली आहे. म्हणजे त्यानुसार 'अॅश्ली टू' नावाची एक लहान रोबोट बाहुली बनवता येईल.

तज्ज्ञांचं असं म्हणणं आहे की या गोष्टी फक्त कल्पनेतच होऊ शकतात.

डॉ. सिमन्स म्हणतात, "मी म्हणीन की आपला मेंदू आणि आपलं व्यक्तिमत्त्वं एखाद्या रोबोमध्ये डाऊनलोड करणं कोणाही माणसाला शक्य नाही. माणसाच्या मेंदूची नक्कल करण्यापासून आपण अजून खूप दूर आहोत."

पण डॉ. गोअर्टजेल एका गोष्टीवर भर देतात ते म्हणजे जेव्हा १९२०च्या दशकामध्ये निकोला टेस्लांनी रोबोटस विचार केला होता तेव्हा देखील त्यांच्यावर कोणीही विश्वास ठेवला नव्हता. पण आतामात्र तीच गोष्ट सर्वांसमोर आहे.

"अनेकदा गोष्टी माणसांच्या कल्पनांच्या पलिकडच्या असतात."

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)