You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
सुपर अर्थ : पृथ्वीच्या 3.2पट मोठ्या ग्रहाचा शोध लागला
- Author, पॉल रिनकॉन
- Role, विज्ञान संपादक, बीबीसी न्यूज वेबसाईट
पृथ्वीच्या पलीकडे जीवसृष्टी आहे का? या प्रश्नाचं उत्तर अवकाश संशोधक अव्याहतपणे शोधत आहेत. याच प्रयत्नात अवकाश संशोधकांना एका ग्रहाचा शोध लागला आहे. या आणि अशा प्रकारच्या इतर ग्रहांवर जीवसृष्टीचं अस्तित्व शोधण्याचा प्रयत्न संशोधक करणार आहेत.
सूर्यापासून सर्वांत जवळचा तारा असलेल्या बर्नाडस स्टारच्या भोवती हा ग्रह फिरत आहे. हा ग्रह पृथ्वीपेक्षा 3.2 पट मोठा असून याला सुपर अर्थ म्हटलं जात आहे. बर्नाडस् स्टार हा तारा सूर्यापासून 6 प्रकाशवर्ष दूर आहे.
'नेचर' या मासिकात हे संशोधन प्रसिद्ध झालेलं आहे. क्विन मेरी युनिव्हर्सिटी ऑफ लंडनमधील संशोधक गुएम कुदे म्हणाले, "हा ग्रह बऱ्याच अंशी खडकाळ आहे. या ग्रहावरील वातावरण फारच दाट असावं. पाणी, हायड्रोजन, कार्बन डायऑक्साईड गोठलेल्या स्थितीत असावेत. शनी ग्रहाचा चंद्र टायटनशी याची तुलना होऊ शकते."
सूर्यापासून बुध ग्रह जितका दूर आहे तितकाच दूर हा ग्रह आहे. सूर्यमालेबाहेरील पृथ्वीचा दुसरा जवळचा ग्रह आहे. Proxima Centauri b हा सूर्यमालेबाहेरील पृथ्वीच्या सर्वांत जवळचा ग्रह आहे.
या ग्रहावरील तापमान -150 डिग्री इतकं कमी आहे. पण या ग्रहावरील वातावरण दाट असल्याने इथं उष्णता असू शकते. त्यामुळे हा ग्रह जीवसृष्टीसाठी पोषक असू शकेल, असं संशोधकांना वाटतं.
Radial Velocity तंत्राचा वापर करून हे संशोधन करण्यात आलं आहे. या तंत्रात भोवतीने फिरणाऱ्या ग्रहाच्या गुरुत्वाकर्षणामुळे ताऱ्यात होणाऱ्या हालचालींची नोंद घेतली जाते. या हालचालींचा परिणाम ताऱ्याच्या प्रकाशावरही होत असतो. आपल्या ताऱ्यापासून दूरवर असलेला ग्रह शोधण्यासाठी पहिल्यांदाच या तंत्राचा वापर झाला आहे.
ताऱ्याभोवती एक फेरी पूर्ण करण्यासाठी या ग्रहाला 233 दिवस लागतात.
या ग्रहाचा शोध लावण्यासाठी 20 मागील 20 वर्षांच्या डेटाचा अभ्यास करण्यात आला आहे. या ग्रहाचे अस्तित्व सिद्ध करण्यासाठी एकाच प्रयोगावर अवलंबून राहणं शक्य नव्हतं, असं ते म्हणाले.
भविष्यात या ग्रहावर अधिक अभ्यास होईल, असं ते म्हणाले. पुढच्या युगाच्या अत्याधुनिक टेलेस्कोप कार्यरत झाल्यानंतर या ग्रहावर अधिक संशोधन होऊ शकेल, असं ते म्हणाले.
बर्नाडस स्टारच्या भोवती ग्रह असल्याचा दावा 1960मध्ये डच संशोधक पीटर व्हॅन कँप यांनी केला होता. पण इतर संशोधक या दाव्याला बळकटी देऊ शकले नव्हते.
नव्याने शोधण्यात आलेला ग्रह आणि कँप यांनी दावा केलेला ग्रह एकच असू शकत नाही, असं ते म्हणाले. त्यावेळीचं तंत्रज्ञान लक्षात घेता, हे शक्य वाटत नाही, असं ते म्हणाले.
हे वाचलं का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)