You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
मंगळावर सापडलं पाण्याचं सरोवर; जीवसृष्टी असण्याची किती शक्यता
- Author, मेरी हाल्टन
- Role, विज्ञान प्रतिनिधी
मंगळावर प्रथमच भूमिगत पाण्याचं सरोवर सापडलं आहे. त्यामुळे तिथं जीवसृष्टी असण्याची शक्यता वाढली आहे, असं आंतरराष्ट्रीय खगोल वैज्ञानिकांनी म्हटलं आहे.
मंगळावरील बर्फाच्या थराखाली 20 किमी व्यासाचं तळं असल्याचं इटलीच्या संशोधकांच्या नेतृत्त्वाखाली झालेल्या संशोधनात म्हटलं आहे. सायन्स या नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झालं आहे.
मंगळावर सापडलेला हा पाण्याचा सर्वांत मोठा साठा असून मंगळावर पाणी केवळ ठिबकत असून ते भरपूर प्रमाणात असावं असं ऑस्ट्रेलियातील स्विनबर्न विद्यापीठाचे सहाय्यक प्राध्यापक अलन डफी यांनी सांगितलं.
मंगळ आता थंड आहे. तो उजाड आणि कोरडा असून पूर्वी तो उबदार आणि ओलसर होता. तिथं मोठ्या प्रमाणात पाणी होतं. 3.6 अब्ज वर्षांपूर्वी तिथं पाण्याची सरोवरं होती. युरोपीय स्पेस एजन्सीच्या मार्स एक्स्प्रेस ऑर्बिटर यानावरील रडारच्या मदतीनं या सरोवराचा शोध लागला आहे.
यापूर्वीच्या संशोधनात मंगळाच्या पृष्ठभागावर पाणी असल्याच्या खुणा मिळाल्या होत्या, मात्र मंगळावर ठोस पाणी आढळण्याची ही पहिलीच वेळ आहे.
नासाच्या क्युरियॉसिटी रोव्हरनं ज्या जलाशयांचा तळांचा शोध लावला होता, त्यावरून पूर्वीच्या काळात मंगळाच्या पृष्ठभागावर पाणी असावं हे समोर आलं आहे.
पण कमकुवत वातावरणामुळे मंगळावरील हवामान पूर्वीच्या तुलनेत थंड झालं आहे. परिणामी तिथं असणारं पाणी बर्फात रुपांतरित झालं आहे. हा नवा शोध मार्सिसच्या मदतीनं शक्य झाला आहे.
मार्सिस हे मंगळाभोवती फिरणाऱ्या यानावरील एक रडार आहे. हे एक अत्यंत विशाल जलाशय असावं अशी शक्यता या संशोधनाचे नेतृत्व करणाऱ्या इटालियन नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ अस्ट्रोफिजिक्सचे प्राध्यापक रॉबर्टो ओरोसेई यांनी वर्तवली आहे.
मंगळावरील या पाण्याची खोली किती आहे याबाबत मार्सिसला शोध लावता आलेला नाही. मात्र ही खोली कमीतकमी एक मीटर असावी असा शोधपथकाचा अंदाज आहे.
मंगळावर झालेल्या या नव्या संशोधनामुळे जीवसृष्टीच्या शक्यतेसंदर्भात निश्चितपणे काहीही सांगितलं जाऊ शकत नाही.
या अनुषंगानं मुक्त विद्यापीठाशी संबंधित डॉ.मनीष पटेल यांनी माहिती दिली. "मंगळावर जाण्यास योग्य वातावरण नाही. मात्र आता आमचा शोध काहीसा पुढे गेला आहे," असं त्यांनी सांगितले.
"नव्या शोधामुळे मंगळावर पाणी असल्याचं सिद्ध होतं मात्र केवळ यामुळे तिथं जगण्याच्या शक्यतेबाबतचा निष्कर्ष काढला जाऊ शकत नाही" असं ते पुढे म्हणाले.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)