You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
भारताच्या चंद्रयानाला सापडलं चंद्रावर बर्फ
- Author, पॉल रिन्कॉन
- Role, सायन्स एडिटर, बीबीसी न्यूज वेबसाईट
भारताच्या चंद्रयान-1 या अवकाशयानानं चंद्राबद्दल गोळा केलेल्या माहितीतून चंद्राच्या पृष्ठभागावर बर्फाचं अस्तित्व सिद्ध झालं आहे. चंद्राच्या उत्तर आणि दक्षिण ध्रुवावर हे बर्फ दिसलं आहे. या बर्फाचा उगम प्राचीन काळातील असावा, असा संशोधकांचा कयास आहे.
चंद्रयान-1नं 2008-2009 या कालावधीत गोळा केलेल्या माहितीवर आधारित रिसर्च पेपर Proceedings of the National Academy of Sciences (PNAS)मध्ये प्रसिद्ध झाला आहे.
तुटक स्वरूपात हे बर्फ साठलं असल्याचं दिसून आलं आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर असलेल्या विवरांमध्ये सर्वाधिक बर्फ दिसून आलं आहे. तर उत्तर ध्रुवावर या बर्फाचा विस्तार तुलनेनं जास्त भागावर झालेला आहे.
चंद्रयानावर असलेल्या The Moon Mineralogy Mapper (M3) या यंत्रानं चंद्रावरील पाण्याची 3 गुणवैशिष्ट्यं टिपली आहेत. याशिवाय या बर्फाचे रेणू कशा पद्धतीने इन्फ्रारेड शोषतात तेही मोजलं आहे. म्हणजेच M3 ला द्रव रूपातील पाणी, बाष्प आणि बर्फ यांतील फरक कळतो.
चंद्राचा आस 1.54 अंशानं कलला आहे, तसेच चंद्राच्या ध्रुवावर असे काही भाग आहेत जिथं सूर्यकिरण कधीही पोहचलेली नाहीत.
चंद्राच्या नेहमी अंधारात असलेल्या विवरांतील तापमान कधीही -157 डीग्री सेल्सियसच्यावर गेलेलं नाही. त्यामुळे या ठिकाणी असं वातावरण निर्माण झालं आहे, जेणे करून तिथं दीर्घ कालावधीसाठी हे बर्फ आहे त्या स्थितीत कायम राहिलं आहे.
चंद्राच्या दक्षिण ध्रुवाच्या पृष्ठभागावर बर्फ असावं, असं दाखवणारे पुरावे पूर्वीही मिळाले होते. पण हे पुरावे चंद्राच्या मातीवरून होणाऱ्या प्रकाशाच्या परावर्तनावर आधारित होते.
जर चंद्राच्या पृष्ठभागावर पुरेसा बर्फ असेल तर भविष्यातील चंद्रावरील मानवी मोहिमांसाठी तो पाण्याचा स्रोत ठरू शकतो. तसेच अशा मोहिमांत चंद्रावर मुक्काम करणाऱ्यांसाठी पिण्याचं पाणी म्हणूनही याचा उपयोग होऊ शकतो. तसंच या बर्फाचं हायड्रोजन आणि ऑक्सिजनमध्ये विघटन करून त्याचा उपयोग रॉकेटमध्ये इंधन म्हणूनही होऊ शकतो. विघटन झालेल्या ऑक्सिजनचा उपयोग अंतरळावीरांना श्वसनासाठी होऊ शकतो.
यापूर्वी बुध ग्रहाच्या उत्तर ध्रुवावर आणि सेरीज या लघुग्रहाच्या पृष्ठभागावर पाण्याचा बर्फ दिसून आला आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)