You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
भारतावर दाटलेले हे वेगळ्या रंगाचे नवे ढग कोणते?
- Author, जोनाथन अॅमॉस
- Role, बीबीसी सायन्स प्रतिनिधी
अवकाशातून पाहिलं तर भारत आणि दक्षिण आशियातील देशांवरील ढग वेगळ्या रंगाचे दिसतात. काय बरं असेल या मागचं कारण?
गेल्या ऑक्टोबरमध्ये युरोपने Sentinel-5P हा उपग्रह अवकाशात सोडला आहे. जगभरातील हवेची गुणवत्ता तपासणं हे या उपग्रहाचं काम आहे. या उपग्रहानं या मागचं कारण शोधून काढलं आहे.
हवेत असणाऱ्या फॉर्माल्डिहाईड या वायूमुळे हे असं घडत आहे. खरं तर हा रंग नसलेला वायू आहे आणि तो नैसर्गिकरीत्या वनस्पतींतून उत्सर्जित होतो. मग यात इतकं गंभीर काय आहे?
गंभीर आहे ते याच्या निर्मितीचं आणखी एक कारण. म्हणजे प्रदूषणातूनही या वायूची निर्मिती होते.
फॉर्माल्डिहाईड काय असतं?
हवेत प्रामुख्याने असलेले वायू म्हणजे नायट्रोजन आणि ऑक्सिजन होय. यांच्याशी तुलना करता फॉर्माल्डिहाईडचं प्रमाण फारच कमी असतं. हवेतील 1 अब्ज रेणूंमध्ये काही रेणूच फॉर्माल्डिहाईडचे असतात.
रॉयल बेल्जियन इन्स्टिट्यूट फॉर स्पेस एरोनॉमीच्या इसाबेल डी स्मेड्ट म्हणाल्या, "हवेत फॉर्मल्डिहाईडचं जे प्रमाण आहे, त्यात विविध सेंद्रिय घटकांचा समावेश असतो. याचा स्रोत विविध वनस्पती असतात. म्हणजेच हे स्रोत नैसर्गिक असतात. पण या वायूचा आणखी महत्त्वाचा स्रोत आहे तो म्हणजे आग, धूर आणि इतर प्रदूषक."
त्या म्हणतात, "हा बदल प्रदेशनिहाय वेगवेगळा असू शकतो. पण हे प्रमाण जर जास्त असेल तर मात्र स्रोत कोळशाचं ज्वलन आणि वणवाही असतात. भारतात शेतातून पीक काढल्यानंतर शेतातील पाचट पेटवण्याची पद्धत मोठ्या प्रमाणावर आहे."
भारतात स्वयंपाकासाठी इंधन म्हणून अजूनही लाकडांचा वापर होतो, याचा परिणामही हवेतल्या प्रदूषणावर होतो.
जेव्हा अस्थिर सेंद्रिय घटकांची प्रक्रिया नायट्रोजन ऑक्साईड आणि सूर्यप्रकाशाशी होते तेव्हा या प्रक्रियेतून जमिनीवर ओझोनची निर्मिती होते. असा ओझोन श्वसनाशी संबंधित आजारांना कारणीभूत ठरतो.
जर हा नकाशा काळजीपूर्वक पाहिला तर एक बाब लक्षात येते ती म्हणजे या हवेला मैदानी प्रदेशातच रोखून धरतो हिमालय.
राजस्थानच्या वाळवंटात आणि वायव्येकडे फॉर्मालडेहाईडचं प्रमाण कमी दिसतं. याचं कारण म्हणजे इथं वनस्पतींचं प्रमाणही कमी आहे आणि लोकसंख्याही विरळ आहे.
उपग्रहाचं महत्त्व
युरोपीयन स्पेस एजन्सीने हा उपग्रह सोडला असून युरोपीयन युनियनच्या कोपर्निकस अर्थ मॉनिटरिंग कार्यक्रमाचा हा भाग आहे.
या उपग्रहातील काही उपकरणांमुळे हवेत असणाऱ्या वेगवेगळ्या वायूंचा शोध घेता येतो. यामध्ये फॉर्माल्डिहाईड, नायट्रोजन ऑक्साईड, सल्फर ऑक्साईड, मिथेन, कॉर्बन मोनॉक्साईड आणि एअरोसोल यांचाही समावेश आहे. या उपग्रहातील ट्रोपोमी या यंत्रामुळे हे मोजमाप शक्य झालं आहे.
यातील काही वायू आरोग्यावर परिणाम करतात शिवाय ते हवामान बदलालाही जबाबदार आहेत.
इसाबेल म्हणाल्या, "आपल्याकडे पुरेशी आकडेवारी असली तरीही आपल्याला अजूनही काही दिवस नोंदी ठेवाव्या लागतील. बऱ्याच वेळा काही वर्षं ही पाहणी करावी लागते."
भारताचा हा जो नकाशा आहे त्यात चार महिन्यांची माहिती आहे. जी माहिती गोळा करण्यासाठी काही वर्षं लागली असती ती माहिती नव्या तंत्रज्ञानात काही महिन्यांत गोळा करता येते.
सध्या या उपग्रहाची चाचणी सुरू असून या महिन्याच्या अखेरीस तो पूर्णपणे कार्यरत होईल.
हे वाचलं का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता)