अंधार पडल्यावर कळतं कुणाकडे आहे किती पैसा

    • Author, शौतिक बिस्वास
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

रात्रीच्या वेळी दिसणाऱ्या भारताचं दृश्य सॅटेलाइट्स अर्थात उपग्रह टिपत असतात. पण हाच फोटो देशातली विषमताही टिपतो असं संशोधनाद्वारे स्पष्ट झालं आहे.

अर्थशास्त्रज्ञ प्रवीण चक्रवर्ती आणि विवेक देहिजा यांना तसं नक्कीच वाटतं. US एअर फोर्स डिफेन्स मेटरॉलॉजिकल सॅटेलाइट प्रोग्रॅमनं घेतलेले फोटो या जोडगोळीनं मिळवले.

हा सॅटेलाइट पृथ्वीला दिवसभरातून 14 वेळा प्रदक्षिणा घालतो. रात्रीच्या वेळी पृथ्वीवरून परावर्तित होणारा प्रकाश हा सॅटेलाइट सेन्सर्सच्या माध्यमातून टिपतो.

अभ्यासकांनी सॅटेलाइटनं घेतलेल्या भारताच्या फोटोंवर भारताचा नकाशा सुपरइंपोज केला. असं केल्यामुळे देशाच्या कुठल्या भागात कोणत्या वेळी किती प्रकाश आहे याची माहिती मिळाली.

रात्रीच्या वेळी प्रकाशमान असणाऱ्या जिल्ह्यांचा या जोडगोळीनं सविस्तर अभ्यास केला. देशभरातल्या 640 जिल्ह्यांपैकी 387 जिल्ह्यांचा अभ्यास त्यांनी केला. या जिल्ह्यांची व्याप्ती 12 राज्यांमध्ये पसरली आहे. देशाच्या लोकसंख्येपैकी 85 टक्के जनता या जिल्ह्यांमध्ये राहते. सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या 80 टक्के याच भागातून निर्माण होतं. याच जिल्ह्यांमध्ये संसदेच्या 87 टक्के जागा आहेत.

अनोख्या पद्धतीद्वारे अर्थशास्त्रज्ञांनी देशातल्या असमान उत्पन्न पातळ्यांचा म्हणजेच पर्यायानं आर्थिक विषमतेचा अभ्यास केला.

रात्रीच्या वेळी देशातल्या बहुतांश भागामध्ये अंधार असतो. कारण रात्रीच्या वेळी ऑफिसं-दुकानं बंद असतात म्हणजेच व्यवहार कमी असतो. आर्थिक व्यवहार होण्याची शक्यता खूपच कमी असते. माणसांची वर्दळही कमी असते.

राज्यांमधली विषमता वाढत चालल्याचं सॅटेलाइटचे फोटो आणि नकाशा यांच्या एकत्रीकरणातून स्पष्ट झालं आहे.

मुंबई तसंच बंगळुरूसारख्या शहरांमध्ये चालणारी आर्थिक उलाढाल 12 राज्यातल्या 380 जिल्ह्यांएवढी आहे. देशातल्या जिल्ह्यांपैकी 90 टक्के जिल्हे इतर दहा टक्के जिल्ह्यांच्या तुलनेत फक्त एक तृतीयांश प्रकाशमान आहेत.

आणि विशेष म्हणजे आर्थिक उदारीकरण अर्थात ग्लोबलायझेशनच्या पर्वानंतरही विषमतेचं प्रमाण वाढतच चाललं आहे.

ग्लोबलायझेशनपूर्वी आर्थिक विषमता निश्चितच होती, मात्र त्याचं प्रमाण सामान्य स्वरुपाचं होतं. ग्लोबलायझेशनंतर मात्र विषमतेचा लंबक एका दिशेनं कलला आहे.

2014 या एका वर्षाच्या अभ्यासानुसार केरळ, तामिळनाडू आणि महाराष्ट्र या सधन राज्यातला माणूस, आर्थिकदृष्ट्या सर्वसामान्य असणाऱ्या बिहार, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश या राज्यांतल्या माणसापेक्षा तिपटीनं श्रीमंत आहे.

"राज्याराज्यांमधली, राज्याअंतर्गतही तसंच जिल्ह्यांतर्गत विषमता वेगानं वाढतं आहे. श्रीमंत अधिक श्रीमंत होत आहेत आणि गरीब अधिक गरीब होतोय असं नाही, पण गरीब माणूस श्रीमंत होण्याचा वेग अतिशय संथ आहे. यामुळे विषमतेचं प्रमाण झपाट्यानं वाढतं आहे," असं मुंबईस्थित IDFC इन्स्टिट्यूटचे वरिष्ठ संशोधक डॉ. देहिजा यांनी सांगितलं. आर्थिकदृष्ट्या मागास राज्यं, सधन राज्यांच्या तुलनेत खूपच पिछाडीवर पडत चालली आहेत.

"संघराज्य प्रणालीत प्रादेशिक असमतोल वाढतो आहे. गेल्या काही वर्षांतल्या आर्थिक इतिहासाचं हे लक्षण ठरत आहे."

राहणीमान सुधारत असतानाही विषमता का वाढते आहे? ढिसाळ प्रशासन आणि मागास राज्यांमध्ये नोकरी आणि व्यवसायांसाठी आवश्यक कौशल्याची कमतरता ही कारणं विषमतेला बळ देत आहेत, असं अर्थतज्ज्ञांना वाटतं. पण विषमता वाढीमागची कारणं संशोधकांसमोरचं कोडं आहे.

विषमता वाढीचा कल हा काळजीचा आहे. भारतासारख्या खंडप्राय आणि सामाजिक गुंतागुंतीच्या देशात आर्थिक विषमता सामाजिक अस्वस्थता वाढवू शकते. आर्थिकदृष्ट्या मागास राज्यं किंवा प्रदेश सधन राज्यांचा पैसा तसंच सुविधा आपल्याकडे मिळवण्यासाठी प्रयत्न करतात.

"आर्थिक उलाढालींच्या अभ्यासासाठी रात्रीचा प्रकाश ही फूटपट्टी वापरता येईल. आपल्याकडे ठोस आकडेवारीची उणीव भासते," असं डॉ. देहिजा यांनी सांगितलं.

प्रगती झाली की नाही हे मोजण्यासाठी अनेकदा कुठल्या ना कुठल्या प्रातिनिधिक किंवा प्रतिकात्मक गोष्टींचा आधार घेतला जातो.

US सेंट्रल बँकेनं आर्थिक कारभाराचा अभ्यास करण्यासाठी 'वीजपुरवठ्याचा वापर' याला प्रमाण मानलं.

एका अर्थतज्ज्ञाने तर हॅब्जबर्ग देशांच्या राष्ट्रीय उत्पन्नाचा अंदाज लगावण्यासाठी इतर काही घटकांबरोबरच दरडोई उत्पन्न आणि प्रत्येकानं पाठवलेली पत्रं यांचा संबंध लावला होता.

अमेरिकेतील काही अर्थतज्ज्ञांनी राहणीमान आणि विषमतेचा अभ्यास करण्यासाठी हाडाच्या सांगाड्याचा वापर केला.

पृथ्वीवरून परावर्तित होणाऱ्या रात्रीच्या प्रकाशाचे काही प्रश्न आहेत. चंद्राची स्थिती बदलत राहते यामुळे पृथ्वीवर रात्री पडणाऱ्या प्रकाशाचं प्रमाणही बदलतं.

एअरोसोल, पाण्याची वाफ, ओझोन थर तसंच अन्य ताऱ्यांचा पडणारा प्रकाश यामुळे वातावरणातल्या प्रकाशाचं प्रमाण बदलतं.

मात्र अत्याधुनिक सॅटेलाइट प्रकाशमान परिसर तसंच अंधारमय भाग असं तपशीलवार वर्गीकरण करून फोटो पाठवतात.

रात्रीच्या प्रकाशाचं चित्र अधिक सुस्पष्ट, अचूक आणि तात्काळ मिळावं यासाठी शास्त्रज्ञ नवीन सॉफ्टवेअर तसंच अल्गोरिदम विकसित करत आहेत.

शहरांची वाढ कशी झाली तसंच जमिनीचा वापर कसा होतो आहे हे अभ्यासण्यासाठी रात्रीच्यावेळी निघणाऱ्या या प्रकाशाचा उपयोग केला जातो.

सणासुदीच्या काळात उजळणाऱ्या आभाळाचाही सखोल अभ्यास केला जातो.

संघर्षमय प्रदेशात तसंच नैसर्गिक आपत्ती उद्भभवलेल्या परिसरात मदतीसाठी रात्रीच्या प्रकाशाचा उपयोग होतो.

संसर्गजन्य आजारांचं आक्रमण, कार्बन उत्सर्जन पातळी, प्रकाश प्रदूषण यांच्या अभ्यासात रात्रीच्या प्रकाशाची मदत होते.

वेगळ्या शब्दांमध्ये सांगायचं झालं तर, "पृथ्वीवरच्या माणसांचं आयुष्य अभ्यासण्यासाठी पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या 800 किलोमीटरहून अधिक उंचीवरून रात्रीच्या प्रकाशाचा उपयोग केला जातो," असं येल विद्यापीठाच्या भरतेंदू पांडे यांनी सांगितलं.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)