You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
जगातल्या दर सहा मृत्यूंपैकी एक प्रदूषणामुळे
- Author, केटी सिल्व्हर
- Role, आरोग्य प्रतिनिधी, बीबीसी
दिवाळीच्या फटाक्यांनी प्रदूषित झालेल्या वातावरणात श्वास कोंडत असतानाच आणखी एक धोक्याची घंटा वाजत आहे -- जगभरात दर सहा मृत्यूंपैकी एक प्रदूषणामुळे होत असल्याचं एका अहवालातून स्पष्ट झालं आहे.
'द लॅन्सेट'ने प्रसिद्ध केलेल्या एका शोधनिबंधानुसार 2015 मध्ये जगभरात 90 लाख मृत्यू प्रदूषणामुळे झाल्याचं उघड झालं आहे.
आर्थिकदृष्ट्या मागास आणि विकसनशील देशांमध्ये अशा मृत्यूंचं प्रमाण अधिक आहे. बांगलादेश आणि सोमालियात तर परिस्थिती आणखी बिकट आहे.
यातच वायू प्रदूषण सगळ्यांत घातक ठरलं आहे. प्रदूषणामुळे होणाऱ्या मृत्यूंपैकी दोन तृतीयांश घटना फक्त वायू प्रदूषणामुळे होत आहेत.
ब्रुनेई आणि स्वीडनमध्ये प्रदूषणामुळे होणाऱ्या मृत्यूचं प्रमाण अत्यंत कमी आहे.
ह्दयरोग, पक्षाघात तसंच फुप्फसाचा कर्करोग असे असंसर्गजन्य आजार प्रदूषणामुळे होत असल्याचं स्पष्ट झालं आहे.
प्रदूषण केवळ पर्यावरणाची समस्या राहिली नसून ती आरोग्याच्या दृष्टीने गंभीर समस्या झाली आहे. त्याचे परिणाम दूरगामी आणि धोकादायक आहेत, असं न्यूयॉर्कमधील इकान स्कूल ऑफ मेडिसिनचे प्राध्यापक फिलीप लॅड्रिगन यांनी सांगितलं.
प्रदूषणासंदर्भात 'द लॅन्सेट'ने प्रसिद्ध केलेल्या संशोधनाचे लॅड्रिगन सहलेखक आहेत.
हवेच्या प्रदूषणामुळे 65 लाख नागरिकांचा अकाली मृत्यू झाला आहे. घातक रासायनिक वायू, लाकूड तसंच कोळसा जळण्यातून निर्माण होणारी रसायनं आरोग्यासाठी जीवघेणी ठरत असल्याचं या संशोधनात म्हटलं आहे.
18 लाख लोक जलप्रदूषणाचे बळी ठरत आहेत. कामाचा भाग म्हणून धोकादायक परिस्थितीत कार्यरत आठ लाखजणांनी जीव गमावला आहे.
92 टक्के मृत्यू विकसनशील देशांमध्ये झाले आहेत. या यादीत भारताचा पाचवा क्रमांक आहे. चीन या यादीत 16व्या स्थानी आहे.
इंग्लंडमध्ये आठ टक्के मृत्यू प्रदूषणामुळे होत आहेत.
'द लॅन्सेट'मध्ये प्रकाशित संशोधनासाठी अभ्यासकांनी 188 देशांतील स्थितीचा आढावा घेतला. या यादीत इंग्लंड 55व्या स्थानी असून अमेरिका, जर्मनी, फ्रान्स, स्पेन, इटली आणि डेन्मार्क या देशांच्या मागे आहे.
वायू प्रदूषण जागतिक संकट झालं आहे. युरोपीय देशांपैकी इंग्लंडला हवेच्या प्रदूषणाचा सर्वाधिक फटका बसला आहे, असं ब्रिटिश ल्युंग फाऊंडेशनचे डॉ. पेनी वूड्स यांनी सांगितलं.
डिझेलवर चालणारी वाहनं प्रदूषणासाठी कारणीभूत आहेत, कारण ती श्वसनाला घातक रसायनं सोडतात. यामुळे फुप्फुसांवर परिणाम होतो. लहान मुलं आणि ज्येष्ठ नागरिकांना याचा सर्वाधिक त्रास होतो, असं त्यांनी सांगितलं.
अमेरिकेत सहा टक्के लोकांचा मृत्यू प्रदूषणामुळे ओढवतो. विकसित आणि विकसनशील देशांमधल्या आर्थिक विषमतेमुळं प्रदूषणाला खतपाणी मिळते.
प्रदूषण, गरिबी, असमानता आणि अनारोग्य हे जागतिक स्तरावरील गंभीर प्रश्न आहेत. प्रदूषणामुळे जगण्याच्या मूलभूत हक्कांवर गदा येते, असं 'प्युअर अर्थ' या स्वयंसेवी संस्थेच्या कार्ती सांडिल्य यांनी सांगितलं.
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)