सोशल : 'फटाक्यांवर बंदी? डोक्यावर पडलात का?'

सुप्रीम कोर्टाने प्रदूषण टाळण्यासाठी दिल्लीत 1 नोव्हेंबरपर्यंत फटाके विक्रीवर बंदी घातली आहे. दिल्लीतल्या प्रदूषणाच्या पातळीवर या निर्णयाचा काही परिणाम होतो का याचा अभ्यासही केला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर बीबीसी मराठीने फेसबुकवर प्रश्न विचारला की अशा प्रकारची बंदी महाराष्ट्रातही घातली गेली पाहिजे का?

यावर वाचकांनी भरभरून आणि वेगवेगळी मतं व्यक्त केली आहेत. वैभव निसाळ म्हणतात की अशी बंदी महाराष्ट्रात नक्कीच घातली पाहिजे. राहुल गाडेकर म्हणतात की सगळ्याच फटाक्यांवर बंदी नको, काही मोजक्या फटाक्यांवर बंदी असायला हवी.

श्रीकांत पावणेंनी लिहीलं आहे की फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्यासाठी आम्ही शपथ घेतली आहे. बंदी व्हायलाच पाहिजे.

शैलेश गोसावींच मत आहे की फक्त मोठा आवाज करणाऱ्या फटाक्यांवर बंदी असली पाहिजे. मकरंद कुलकर्णी म्हणतात, "नक्कीच बंदी हवी कारण आमच्या भागात रोज मध्यरात्री कुणाचा न कुणाचा वाढदिवस जोरात फटाके वाजवून साजरा करतात त्याचा खूप त्रास होतो."

नझीम बागवान म्हणतात की बंदी घातली तर फटाक्यांच प्रमाण वाढेल.

अरविंद डोईफोडेंचंही हेच मत आहे.

जयश्री इंगळे म्हणतात की आता आपण सर्वांनीच पर्यावरणाच्या बाबतीत संवेदनशील व्हायला हवं. तर हा प्रश्न पर्यावरणाचा आहे. त्यामुळे जर प्रदूषण वाढत असेल तर त्यावर वेळीच कायदा करावा. तरच आपली येणारी पिढी होणाऱ्या दुष्परिणांमापासून दूर राहील, असं मत अजय कांबळे यांनी मांडलं आहे.

अर्थात सर्वांनाच फटाक्यांबर बंदी घालणं मान्य नाही. सत्यजित लवंड तर सरळ म्हणतात, फटाक्यांवर बंदी, काय डोक्यावर पडलात का? अनेकांना असंही वाटत की फटाक्यांवर बंदी घालण म्हणजे हिंदूंच्या सणांवर आक्रमण करणं आहे. पराग कोडग ही हेच म्हणतात.

गौरव शिरगावकर विचारतात की सगळे सणच बंद करायचा विचार नाही ना?

बंदी करायची असेल तर सरसकट वर्षभर करा असं चैतन्य देशपांडे म्हणतात.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)