Howdy Modi: नरेंद्र मोदी आणि इम्रान खान यांनी टायटॅनिक सिनेमापासून धडा घ्यावा - ब्लॉग

    • Author, वुसतुल्लाह खान
    • Role, ज्येष्ठ पत्रकार, बीबीसी हिंदीसाठी पाकिस्तानहून

दिल्ली आणि इस्लामाबाद कमीत कमी एका आठवड्यासाठी न्यूयॉर्क आणि वॉशिंगटनला शिफ्ट झाले आहे. मोदींनी ह्युस्टन स्टेडिअमवरून दणक्यात भाषणाने सुरुवात केली, तर दुसरीकडे इम्रान खानने न्यूयॉर्क येथे नेट प्रॅक्टिसला सुरुवात केली आहे.

मोदी यांची ट्रंप यांच्याबरोबर दुसरी भेट प्रलंबित आहे तर इम्रान लवकरच ट्रंप यांची भेट घेणार आहेत.

ट्रंप यांनी `USA loves India' असं ट्वीट केलं होतं. आता इम्रान खान यांच्याशी भेट झाल्यावर ते काय ट्वीट करतात याकडे सगळ्यांचे लक्ष वेधले आहे.

सर्वांचे मुद्दे

भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांना काश्मीर मुद्द्यासाठी अमेरिकेची साथ हवी आहे.

ट्रंप यांनी त्यांच्या कुठल्याही भाषणात किंवा ट्वीटमध्ये काश्मीर या विषयावर बोलू नये, हा भारताचा पूर्ण प्रयत्न असेलच. तर दुसरीकडे ट्रंप यांनी एकदातरी याच विषयावर मत व्यक्त करावे, यासाठी पाकिस्तानही प्रयत्नशील असेल.

काश्मीर मुद्द्यावर भारत आणि पाकिस्तान यांच्यात मध्यस्थ करण्यासाठी तयार असल्याचं ट्रंप काही आठवड्यांपूर्वीच बोलले होते.

जवळजवळ 14 महिन्यांनंतर अमेरिकेत होणाऱ्या निवडणुकांमध्ये ट्रंप यांच्या डोळ्यांपुढे 40 लाख अमेरिकन-भारतीयांची मतं असतील. एवढंच नव्हे तर अमेरिकेला अफगाणिस्तानातून आपलं सैन्यही माघारी बोलवायचंय, भारताबरोबरचे आर्थिक व्यवहारही वाढवायचे आहेत आणि इराणला थोपवण्यासाठी पाकिस्तानची न बोलता मदतही हवी आहे.

काश्मीर हा भारताचा अंतर्गत विषय आहे, असं संयुक्त राष्ट्राच्या महासभेत ठामपणे सांगून हा विषय पुढे न वाढू देण्याचा मोदींचा प्रयत्न असेल. मात्र इम्रान खान हे मोदींनंतर भाषण करणार आहेत, त्यामुळे ते काश्मीरचा विषय आंतरराष्ट्रीय पटलावर आणण्याचा पूर्ण प्रयत्न करतील.

ट्रंप आपल्या भाषणात दक्षिण आशियाच्या संदर्भात थोडी चर्चा करून, एकूण आखात तणाव आणि इराण याविषयावर बोलण्याचा पूर्ण प्रयत्न करतील.

अस्सल मसाला

न्यूयॉर्क येथे जगभरातल्या पर्यावरण संकटाच्या मुद्द्यावर आधारित संयुक्त राष्ट्राची महासभा होत आहे. यावेळी भारत आणि पाकिस्तान आपापल्या देशांमधले वाढतं प्रदूषण आणि आंतरराष्ट्रीय पर्यावरणासाठीचे अजेंडा, यावर कुठल्या सूचना समोर ठेवतात, याकडे माझं लक्ष लागलं आहे.

भारत आणि पाकिस्तानला पुढील 10-12 वर्षं शत्रुत्व निभवायची असेल तर त्यासाठी त्यांना पर्यावरणाच्या बाबतीत तरी त्यांना एकमेकांना मदत करावी लागेल, हेच सत्य आहे. कारण जगाच्या डोळ्यांतच पाणी उरणार नाही तर मग काश्मीर तरी कुठून शिल्लक राहणार?

मोदी आणि इम्रान खान यांनी टायटॅनिक सिनेमा पाहिलाय की नाही, कुणास ठाऊक? त्यात सिनेमाच्या क्लायमॅक्सला काही कलाकार मोठमोठे व्हायलिन वाजवत असतात. काही तासातच टायटॅनिक बुडते आणि टायटॅनिकबरोबर ही मंडळीही बुडून जातात.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)