You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
Howdy Modi: नरेंद्र मोदी डोनाल्ड ट्रंप यांच्याबरोबर ह्युस्टनमध्ये: 'सर्व छान चाललं आहे'
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं अमेरिकेच्या ह्यूस्टन येथील NRG स्टेडियममध्ये 'Howdy, Modi' कार्यक्रमात जोरदार स्वागत झालं. त्यानंतर त्यांनी आपलं भाषण सुरू करताना राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्यावर स्तुतिसुमने उधळली.
अमेरिकेत एकमेकांना मित्रत्वाने अभिवादन करण्यासाठी हाऊडी (Howdy) हा शब्द वापरला जातो. अमेरिकतील हजारों लोक या कार्यक्रमाला आले असून हा कार्यक्रम तिथल्या भारतीयांसाठीसुद्धा महत्त्वाचा आहे.
ह्यूस्टनमध्ये तब्बल 5,000 कार्यकर्त्यांनी NRG एरिनाची सजावट केली होती. तिथं राहणाऱ्या भारतीय वंशाच्या लोकांमध्ये मोदी यांच्या भेटीविषयी प्रचंड उत्साहाचं वातावरण होतं.
सुरुवातीला साधारण दोन तास संगीताचे विविध कार्यक्रम झाले. त्यानंतर पंतप्रधान मोदी दाखल झाले आणि काही वेळाने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षही NRG एरिनामध्ये दाखल झाले. राष्ट्राध्यक्ष ट्रंप यांची अशा प्रकारच्या एखाद्या क्रार्यक्रमाला उपस्थित राहण्याची ही पहिलीच वेळ आहे.
यावेळी ट्रंप आणि मोदी यांनी जनतेशी संवाद साधला. पाहू या पंतप्रधान मोदींच्या भाषणातले महत्त्वाचे मुद्दे -
- ट्रंप यांची ओळख करून देण्याची गरज नाही. राष्ट्राध्यक्षपदावर विराजमान होण्यापूर्वीपासूनच ट्रंप घराघरात लोकप्रिय व्यक्तिमत्त्व होते. तेव्हा एक CEO ते आज अमेरिकेचे कमांडर इन चीफ, असा अविश्वसनीय प्रवास ट्रंप यांचा राहिला आहे.
- त्यांनी प्रत्येक क्षेत्रात भरभरून काम केलं आहे. मला त्यांना भेटण्याची संधी अनेकवेळा मिळते. डोनाल्ड ट्रंप हे असामान्य व्यक्तिमत्त्व आहेत. त्यांची मित्रता, प्रेम आणि ऊर्जा यांचा अनुभव मला येतो.
- अमेरिकेला पुन्हा महान बनवण्यासाठी ट्रंप प्रयत्न करत आहेत. त्यांनी अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला पुन्हा चढतं केलं आहे. आम्ही ट्रंप यांच्याशी पूर्वीपासूनच जोडले गेलेलो आहोत.
- मी त्यांना पहिल्यांदा भेटलो तेव्हा ट्रंप मला म्हणाले, भारताचा खरा मित्र व्हाईट हाऊसमध्ये बसला आहे.
- गेल्या काही वर्षात आपल्या दोन देशांनी आपले नातेसंबंध एका वेगळ्या उंचीवर नेले आहेत. ह्यूस्टनमधून तुम्हाला या नात्याचा अनुभव येईल, आपल्या दोन महान देशातील नातं तुम्हाला इथं समजेल.
- ह्यूस्टन ते हैदराबाद, न्यूयॉर्क ते न्यू दिल्ली, दोन्ही देशांमधलं नातं अतिशय घट्ट आहे.
- भारतात आज रविवारची रात्र असूनसुद्धा जगभरात वेगवेगळ्या टाईमझोन्समध्ये कोट्यवधी लोक टीव्हीला चिकटलेले आहेत.
- ट्रंप, तुम्ही मला तुमच्या कुटुंबाशी 2017 मध्ये भेटवलं होतं. आता मी तुम्हाला माझ्या कुटुंबीयांशी भेटवतो. हे कोट्यवधी लोकच माझं कुटुंब आहेत. ते जगभरात सगळीकडे आहेत.
यानंतर ट्रंप यांनी माईक हाती घेतला नि अमेरिकन भारतीयांपुढे भाषण केलं. ते काय म्हणाले -
- मोदी यांच्या आगमनामुळे मला अतिशय आनंद झाला. त्यांच्या ऐतिहासिक कार्यक्रमात मी आलो, हे माझं भाग्य समजतो.
- मोदी भारतासाठी उल्लेखनीय कार्य करत आहेत. मोदी यांच्या लोकसभा निवडणुकीतील विजयाबद्दल शुभेच्छा. तसंच त्यांचा नुकताच वाढदिवसही झाला. मी संपूर्ण अमेरिकेच्या वतीने मोदी यांना वाढदिवसाच्याही शुभेच्छा देतो.
- मोदीजी, तुमच्या प्रत्येक अडचणीच्या वेळी आम्ही तुमच्या सोबत आहोत. तुमच्या सरकारला शक्य ती मदत करण्यास आम्ही तयार.
- अमेरिका आणि भारत दोन्हीही लोकशाही मूल्यं जपणारे देश आहेत. दोघांच्याही राज्यघटनेत आम्ही 'We, The People…' असं सुरुवातीला लिहिलं आहे.
- भारतीय वंशाच्या अमेरिकन जनतेबद्दल मला अभिमान आहे. भारतीय जनतेचे मी आभार मानतो आणि मी तुमच्यावर खूप प्रेम करतो. तुमच्यासाठी आमचं सरकार सदैव तत्पर आहे. खात्री बाळगा, डोनाल्ड ट्रंपपेक्षा उत्तम राष्ट्राध्यक्ष तुम्हाला मिळणार नाही.
- भारतात 30 कोटी लोक गरिबीतून बाहेर आले, हे उल्लेखनीय यश आहे. माझ्या विजयानंतर अमेरिकेत 60 लाख नवे रोजगार निर्माण झाले. टेक्सासमधलं बेरोजगारीचं प्रमाण सध्याचं नीचांकावर आहे.
- मागच्या दोन वर्षात भारतीय वंशाच्या अमेरिकन नागरिकांमधलं बेरोजगारीचं प्रमाण घटलं आहे. आम्ही इतिहासातली सर्वांत मोठी करकपात केली. भारतीय वंशाचे लोक अमेरिकेची अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी महत्त्वाचं काम करत आहेत.
- मोदी यांच्यासोबत भविष्यातही काम करण्याची इच्छा माझी इच्छा आहे.
- बास्केटबॉल स्पर्धेमुळे दोन्ही देशात वेगळं नातं आहे. पुढच्या आठवड्यात अमेरिकेची लोकप्रिय NBA बास्केटबॉल स्पर्धा मुंबईत होईल. त्या स्पर्धेला येण्याची माझी इच्छा, बरं का मोदी साहेब?
- सुरक्षसाठी दोन्ही देश मिळून प्रयत्न करत आहेत. मुस्लीम कट्टरवादाविरोधात मिळून लढू.
- अंतराळविषयक संशोधनासाठी दोन्ही देश मिळून काम करणार.
- संरक्षण क्षेत्रात भारताला अमेरिका मोठी मदत करेल. दोन्ही देशांना आपल्या सीमा सुरक्षित ठेवण्याची चिंता आहे. आपण आपल्या सुरक्षेला धोका असणाऱ्यांचा बिमोड करणार.
- अवैध स्थलांतर रोखणं, हेसुद्धा आपल्या दोन्ही देशांपुढचं सर्वांत मोठं आव्हान आहे. आपण त्यासाठी प्रयत्न करत आहोत.
- स्थलांतरितांपेक्षा आपण सर्वप्रथम अमेरिकन नागरिकांच्या हिताचा विचार केला पाहिजे.
- अमेरिका आणि भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी मिळून प्रयत्न करू. तंत्रज्ञानाचा वापर करून लोकांना गरिबीतून बाहेर काढू. येत्या काळात अमेरिकेचं उज्जव भविष्य असेल.
अमेरिका आणि भारताच्या संबंधांसाठी नरेंद्र मोदी यांचा हा अमेरिका दौरा महत्त्वाचा मानला जात आहे.
ट्रंप यांच्यासाठीही हा कार्यक्रम तितकाच महत्त्वाचा आहे. आंतरराष्ट्रीय संबंधांचे विश्लेषक आणि डेलाव्हेयर विद्यापीठाचे प्राध्यापक मुक्तदर खान सांगतात, "ट्रंप या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यामागे एक राजकीय कारण आहे. पुढच्या वर्षी अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुका आहेत. त्या डोळ्यांसमोर ठेवत ट्रंप या कार्यक्रमात भारतीय समुदायाला आकर्षित करण्याची संधी साधणार आहेत."
"तसंच दोन्ही देशांमध्ये व्यावसायिक तणाव निर्माण झाला आहे. ट्रंप भारताच्या काही धोरणांमुळे नाराज आहेत. त्यामुळे दोन्ही नेते या दौऱ्यात एकत्र येऊन या समस्येवर तोडगा काढू शकतात. या व्यासपीठावरून मोठ्या घोषणा होण्याचीही शक्यता आहे. असं झाल्यास ही भारतासाठी सकारात्मक बाब असेल," असंही खान यांन बीबीसी हिंदी प्रतिनिधी कमलेश यांच्याशी संवाद साधताना सांगितलं.
दरम्यान, ट्रंप यांनी ट्वीट करून "मी आज ह्युस्टनमध्ये माझ्या मित्राबरोबर असेन. टेक्सासमध्ये दिवस चांगला जाणार आहे," असं म्हणाले.
मोदींनीही या ट्वीटला उत्तर देत, "नक्कीच दिवस चांगला जाणार आहे. तुम्हाला भेटण्यास आतूर," असं म्हटलं आहे.
दरम्यान, मोदींच्या या कार्यक्रमाच्या ठिकाणी मोठी निदर्शनं पाहायला मिळत आहेत. काश्मीरमध्ये कलम 370 रद्द केल्यानंतर उद्भवलेल्या परिस्थितीमुळे मोदी सरकारविरुद्ध लोक फलकांद्वारे निदर्शनं करत आहेत.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)