You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
अमेरिका गाठून अब्जाधीश झालेल्या विक वर्मा या भारतीयाची गोष्ट
- Author, विल स्मेल
- Role, बिझनेस रिपोर्टर, बीबीसी न्यूज
विक वर्मांनी जे केलं ते कदाचित आताच्या काळात चालणार नाही, कारण अमेरिकेनं इमिग्रेशनचे नियम अधिक कडक केलेले आहेत.
पण 1984मध्ये कोलकात्याच्या (तेव्हाचं कलकत्ता) 18 वर्षांच्या महत्त्वाकांक्षी विकने अमेरिकेला जाऊन विद्यापीठात शिकण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्याने आपली इच्छाशक्ती पणाला लावली होती.
फ्लोरिडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये इलेक्ट्रिकल इंजिनियरिंगच्या प्रवेशासाठी अर्ज करून ते कोलकात्यातील अमेरिकन दूतावासामध्ये आवश्यक तो व्हिसा मिळवण्यासाठी गेले.
त्यांचा व्हिसा तिथल्या तिथे फेटाळण्यात आला.
हा नकार स्वीकारण्याऐवजी विकने ठरवलं की त्या इमिग्रेशन ऑफिसरला त्यांचा निर्णय कसा चूक आहे हे दाखवून द्यायचं.
"मी काही तास त्यावर विचार केला, पुन्हा तिथे गेलो आणि त्या माणसाला सांगितलं, "तुम्ही चूक करत आहात. तुम्ही मला पुरेशी संधी दिलीत असं मला वाटत नाही. नेमकं याच कारणासाठी मला अमेरिकेला जायचं आहे कारण मला खात्री आहे की माझं योगदान महत्त्वाचं असेल," आता 54 वर्षांचे असणारे विक सांगतात.
"सुदैवाने त्या माणसाला माझी जिद्द आवडली आणि त्याने तिथल्या तिथे माझा व्हिसा मंजूर केला. आयुष्यामध्ये बदल घडवून आणणाऱ्या क्षणांपैकी तो एक क्षण होता. मला तो व्हिसा मिळाला नसता तर आज माझं आयुष्य पूर्णपणे वेगळं असतं."
'मल्टी-मिलियनेअर' विक
भारतात रहावं लागलं असतं तरीही कदाचित विक यशस्वी झाले असते, पण अनेक वर्षांपूर्वी अमेरिकेला स्थलांतर केल्यानंतर त्यांनी बरंच काही साध्य केलं आहे.
स्वबळावर 'मल्टी-मिलियनेअर' झालेले विक हे गेली सहा वर्षं सिलिकॉन व्हॅलीमधील '8x8' कंपनीचे प्रमुख आहेत. ही कंपनी उद्योग आणि संस्थांना कम्युनिकेशन सॉफ्टवेअर देते ज्याच्या मदतीने व्हिडिओ कॉन्फरन्सिंगपासून ते ऑटोमॅटिक टेक्स्ट मेसेजेस, कॉल सेंटरसाठीचं व्हॉईस कम्युनिकेशन साधता येतं.
जरी या कंपनीचे नाव घराघरांत पोहोचलेलं नसलं तरी मॅकडॉनल्ड्सपासून ते रेगस (Regus) आणि युकेच्या न्याय खात्यापर्यंत सर्वांना विक यांची कंपनी सेवा पुरवते. 8x8ची वार्षिक उलाढाल 297 दशलक्ष अमेरिकन डॉलर्सची असून ही कंपनी न्यूयॉर्क स्टॉक एक्स्चेंजवर लिस्टेड आहे. या कंपनीचं बाजार भांडवल 2.4 दशकोटी (बिलियन) अमेरिकन डॉलर्सपेक्षा जास्त आहे.
1987मध्ये फ्लोरिडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून इलेक्ट्रिकल इंजिनियरिंगची पदवी घेतल्यानंतर विक यांनी याच विषयामध्ये युनिव्हर्सिटी ऑफ मिशिगन आणि कॅलिफोर्नियातील स्टॅनफर्ड विद्यापीठातून मास्टर्सची पदवी मिळवली.
शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी सावी टेक्नॉलॉजी नावाची कंपनी स्थापन करायला मदत केली. या कंपनीने विकसित केलेल्या प्रणालीच्या मदतीने अमेरिकन संरक्षण खात्याला त्यांचे जगभरातले कार्गो ट्रक्स ट्रॅक करणं शक्य झालं. थोड्याच कालावधीनंतर युके आणि नाटोच्या सदस्य राष्ट्रांनीही हीच टेक्नॉलॉजी अवलंबली.
8x8 कंपनी
त्यानंतर विक 10 वर्षं सावी टेक्नॉलॉजीचे प्रमुख होते. 2006मध्ये अमेरिकन संरक्षण क्षेत्रातील कंपनी लॉकहीड मार्टिन कंपनीला त्यांनी आपल्या कंपनीचा उद्योग घसघशीत मोबदल्यात विकला.
कदाचित विक तेव्हाच निवृत्त होऊ शकले असते पण त्यांनी लॉकहीडमध्ये सात वर्षं काम केलं. त्यानंतर तिथून बाहेर पडत त्यांनी 2013मध्ये पुन्हा 8x8ची सूत्रं हाती घेतली. 1987मध्ये या कंपनीची स्थापना झाली तेव्हा ही कंपनी मायक्रोचिप्स तयार करत असे.
व्हिडिओ कॉम्प्रेशनसाठीच्या अल्गोरिदमवरून कंपनीला हे 8x8 नाव देण्यात आलं होतं. "हे खूपच गीकी आहे. पण खरी गोष्ट म्हणजे कंपनीचं नाव नंबरापासून सुरू होत असल्यामुळे आम्ही लिस्टमध्ये नेहमीच वर असायचो."
विकच्या नेतृत्त्वाखाली 8x8ने विस्तार केला आणि अनेक लहान प्रतिस्पर्धी कंपन्या विकतही घेतल्या. 2013मध्ये या कंपनीचे फक्त 400 कर्मचारी होते. आता कंपनीच्या कॅलिफोर्नियामधल्या मुख्यालयामध्ये 1500 कर्मचारी काम करतात. आणि कंपनीची ऑस्ट्रेलिया, युके आणि रोमानियामध्ये कार्यालयं आहेत.
क्रेग-हॅलम कॅपिटल्सचे टेक ऍनालिस्ट जॉर्ज सुटोन म्हणतात की "8x8 ने आक्रमकपणे त्यांच्या ब्रँडमध्ये गुंतवणूक केली, नियोजनबद्ध कार्यक्रम, मोठ्या प्रमाणावरील थेट विक्री आणि टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून कंपनीचा विस्तार केला.
तर नॉर्थलँड कॅपिटल मार्केट्सचे टेक ऍनालिस्ट माईक लॅटीमोअर म्हणतात की 8x8कंपनीली त्या क्षेत्रामध्ये चांगलं स्थान आहे.
कंपनी दरवर्षी 300 नव्या कर्मचाऱ्यांना संधी देते असं विक सांगतात.
रिसेप्शनिस्टपासून कंपनीच्या प्रत्येक कर्मचाऱ्याला कंपनीचा शेअर मिळतो. विक यांच्यामते हे महत्त्वाचं आहे कारण मग प्रत्येकाला 'आपण कंपनीचा मालक असल्यासारखं वाटतं.'
नव्यानं भरती झालेल्या सर्व कर्मचाऱ्यांना कंपनीच्या बोर्डासमोर आणि नव्याने सुरुवात करणाऱ्या इतर 70 जणांसमोर भाषण द्यावं लागतं. उद्योगासाठीची नवी कल्पना त्यांना मांडावी लागते.
अमेरिकन कर्मचाऱ्यांची ही बैठक विक यांच्या भव्य बंगल्यातल्या पुलाजवळ होते. सिलकॉन व्हॅलीतल्या लॉस अल्टोस हिल्स डिस्ट्रीक्टमधल्या उच्चभ्रू वस्तीत त्यांचा बंगला आहे. गुगलचे सर्गे ब्रिन हे त्यांच्यापासून तीन घरं सोडून राहतात.
"नव्याने जॉईन होणाऱ्यांनी बोर्डासमोर आणि इतर सर्वांसमोर उभं राहून बोलल्याने दोन गोष्टी होतात. एकतर आपलं मत महत्त्वाचं आहे हे त्यांना समजतं आणि जर आपण तर्कसंबद्ध, अर्थपूर्ण बोलत असू तर ते बोलायची संधी आपल्याकडे आहे हे त्यांच्या लक्षात येतं," विक सांगतात.
"जर ती कल्पना चांगली आणि स्मार्ट असेल तर आम्ही खरंच त्याची अंमलबजावणी करतो. पण ती बथ्थड असेल तरी आम्ही त्यांच्याशी निदर्यी वागत नाही."
विक यांचे वडील भारतीय प्रशासकीय सेवेमध्ये होते. आणि आपण अमेरिकेमध्ये जे काही साध्य केलं, त्याचा आपल्याला अभिमान असल्याचं विक सांगतात.
"प्रत्येकाचा जन्म काहीतरी करण्यासाठी झालेला असतो. माझा जन्म कंपनी उभारण्यासाठी झाला होता."
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)