चीनला का मानलं जातं भविष्यातील स्पेस सुपर पॉवर?

पृथ्वीवरून चंद्राच्या न दिसणाऱ्या पृष्ठभागावर यशस्वीरीत्या रोबोटिक अंतराळयान उतरवल्याचा दावा चीनने केला आहे. पण चीनचं अंतराळ संशोधन क्षेत्रात हे एकमेव यश नाही. गेली काही वर्षं सातत्याने अंतराळ संशोधनात चीनने भरीव कामगिरी करत, 'स्पेस पॉवर' बनण्याच्या दिशेनं पावलं उचलली आहेत.

चीनच्या चँग'ई-4 या मानवरहित अंतराळयानाने चंद्राचा दक्षिण ध्रुव असलेल्या ऐटकेन बेसिनच्या पृष्ठभागाला स्पर्श केल्याची माहिती चीनच्या सरकारी मीडियाने प्रसिद्ध केली आहे.

अंतराळ संशोधनात तुलनेनं नवख्या असलेल्या राष्ट्रासाठी हे उल्लेखनीय यश म्हणावं लागेल. रशिया आणि अमेरिकेने फार पूर्वीच मानवी अंतराळ मोहीम यशस्वी करून दाखवल्या आहेत. मात्र चीनला काही वर्षांपूर्वी म्हणजे 2003 साली हे यश मिळालं. 2003 साली यांग लिवी अंतराळात जाणारे पहिले चिनी अंतराळवीर ठरले होते.

चँग'ई-4 मोहिमेनंतर चीनने आगामी काही वर्षांसाठी आणखीही अनेक मोठ्या योजना आखल्या आहेत. यात जगातील सर्वांत मोठी अंतराळ दुर्बीण तयार करणे, जगातील सर्वांत अवजड रॉकेट प्रक्षेपण आणि आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनला मात देईल, असं अंतराळ स्टेशन उभारणे यांचा समावेश आहे.

चीनच्या या अंतराळ प्रवासातील पाच महत्त्वाचे मैलाचे दगड कोणते, यावर ही एक नजर.

1. चांद्र मोहीम

चिनी लोककथेतील चंद्रावर उडत जाणाऱ्या देवतेच्या नावावरून या यानाला चँग'ई हे नाव देण्यात आलं. चँग'ई-4 कार्यक्रम चीनच्या 2003 साली सुरू झालेल्या चांद्र मोहीमेचाच एक भाग आहे. 2036 साली चंद्रावर पाय ठेवून चीन आपली ही मोहीम संपवणार आहे.

चंद्राच्या अस्पर्शित भागावर यान उतरवणे मोठं आव्हान आहे. कारण या भागात यान उतरवलं तर यान आणि पृथ्वी यांच्यातील थेट संपर्कामध्ये चंद्राच्या पृष्ठभागामुळे अडचणी येतात.

ही समस्या सोडवण्यासाठी चीनने 'क्वँकिआओ' हा रिले सॅटेलाईट सोडला. याला चीनने 'मॅगपी पूल' म्हटले आहे.

चिनी लोककथेत या मॅगपी पुलाचा उल्लेख आहे. चीनच्या स्वर्ग देवतेच्या सातव्या मुलीचा नवरा आकाशगंगेमुळे तिच्यापासून दुरावतो. त्याला भेटायला जाण्यासाठी सातव्या महिन्याच्या सातव्या दिवशी मॅगपी या पक्षांनी त्यांच्या पंखांचा पृथ्वी ते चंद्रापर्यंत पूल बनवला होता, अशी दंतकथा आहे. या दंतकथेतील या पुलाला मॅगपी पूल असं नाव आहे.

क्वँकिआओ सॅटेलाईट पृथ्वीपासून चार लाख किलोमीटरवर पृथ्वीच्या कक्षेत स्थिरावण्यात आला आहे. पृथ्वीवरचे सिग्नल या सॅटेलाईटच्या माध्यमातून चँग'ई-4 यानातील लूनार लँडर आणि रोव्हरपर्यंत पोहचवले जातात.

चंद्राच्या अस्पर्शित भागाची खगोलीय माहिती मिळवण्यासाठी चँग'ई-4 यानावर काही उपकरणंही पाठवण्यात आली आहेत.

शिवाय या उपकरणांद्वारे चंद्रावर रोप उगवण्याचा प्रयोगही करण्यात येणार आहे. याला 'लुनार मिनी बायोस्फिअर' असं नाव देण्यात आलं आहे. याअंतर्गत बटाटा, अरबीडॉप्सिस या रानटी गवताच्या बिया आणि रेशीमकिड्यांच्या अंड्यांवर जीवशास्त्रीय प्रयोग करण्यात येतील.

चंद्राला पृथ्वीभोवती आणि स्वतःभोवती एक फेरी पूर्ण करण्यासाठी सारखाच वेळ लागतो. याला 'टायडल लॉकिंग' म्हणतात. या टायडल लॉकिंगमुळे पृथ्वीवरून चंद्राचा एकच भाग दिसतो.

चंद्राच्या न दिसणाऱ्या भागाला 'डार्क साईड' म्हणतात. मात्र इथे 'डार्क' हा शब्द 'काळोखा' नव्हेत तर 'न पाहिलेला' या अर्थाने वापरण्यात आला आहे. खरंतर चंद्राच्या पृथ्वीवरून दिसणाऱ्या आणि न दिसणाऱ्या अशा दोन्ही भागांवर दिवस आणि रात्र होत असतात.

मात्र चंद्राच्या न दिसणाऱ्या भागाचा पृष्ठभाग अधिक जाड आणि टणक आहे. तिथे विवरंही जास्त आहेत.

मात्र डाग कमी आहेत. या डागांना 'मारिया' म्हणतात. मारिया हे लॅटिन मरे म्हणजेच समुद्र या शब्दाचं अनेकवचन आहे. हे डाग म्हणजे लाव्हापासून बनलेले बेसाल्ट खडक आहेत. ते एखाद्या समुद्रासारखे दिसतात. चंद्राच्या दृश्य भागात मोठ्या प्रमाणावर 'मरे' आहेत. मात्र अदृश्य भागावर कमी आहेत.

2. सर्वाधिक प्रक्षेपण

2018 साली चीनने जगातील इतर कुठल्याही देशापेक्षा जास्त म्हणजे 39 रॉकेट प्रक्षेपित केली आहेत. त्यापैकी केवळ एक उड्डाण अपयशी ठरलं. 2016 साली 22 उपग्रह सोडणाऱ्या चीनने अवघ्या दोन वर्षांत ही झेप घेतली.

गेल्या वर्षी अमेरिकेने 34 तर रशियाने 20 उपग्रह प्रक्षेपित केली आहेत. 2016 साली अमेरिकेने आपल्या अंतराळ कार्यक्रमावर तब्बल 36 अब्ज डॉलर खर्च केले होते. तर त्याच वर्षी चीनने 5 अब्ज डॉलरहूनही कमी खर्च केला होता, ही बाब लक्षात घेतली पाहिजे.

पृथ्वीच्या कक्षेत अधिकाधिक उपग्रह सोडता यावेत, यासाठी चीन खूप जास्त वजन उचलणारे आणि वारंवार वापरता येतील, असे रॉकेट तयार करत आहे.

एलॉन मस्कच्या 'स्पेस-एक्स'सारख्या मोठ्या कंपन्या अमेरिकेसाठी परवडणारे रॉकेट निर्मिती करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र असाच प्रयत्न करणाऱ्या चीनच्या एका खासगी कंपनीचा पहिला प्रयत्न अयशस्वी ठरला आहे.

3. अंतराळ स्टेशन

चीनने 2011 साली 'टिआनगाँग-1'चे प्रक्षेपण करून नवीन अंतराळ स्टेशन स्थापनेच्या हालचाली सुरू केल्या आहेत.

टिआनगाँग-1ला चीनने 'स्वर्गातील महाल' (Heavenly Palace) असे म्हटलं होतं.

हे एक छोटं अंतराळ स्टेशन आहे. यात अंतराळवीर अल्प काळासाठी राहू शकतात. दीर्घकाळ या प्रोटोटाईप स्टेशनमध्ये राहता येत नाही. चीनमधील पहिल्या महिला अंतराळवीर ली यांग यांनी 2012 साली या स्टेशनला भेट दिली होती.

या स्टेशनने विहित काळापेक्षा दोन वर्ष अधिक सेवा बजावली आणि मार्च 2016मध्ये ते बंद झालं. एप्रिल 2018 ला या स्टेशनने दक्षिण प्रशांत महासागरावर पृथ्वीच्या कक्षेत प्रवेश केला आणि ते नष्ट झाले.

चीनच्या 'टिआनगाँग-2' या दुसऱ्या अंतराळ स्टेशनचे कामही सुरू झालं आहे. ते 2022पर्यंत पूर्णपणे सुसज्ज अंतराळ स्टेशन उभारण्याचा चीनचा मानस आहे.

4. उपग्रहविरोधी क्षेपणास्त्र चाचणी

अंतराळात फिरणारा उपग्रह नष्ट करणाऱ्याची क्षमता असणारा चीन हा रशिया आणि अमेरिकेनंतरचा तिसरा देश ठरला आहे.

चीनने 2007 साली हवामानाविषयी माहिती देणारा उपग्रह नष्ट केला होता. हा उपग्रह नष्ट करण्यासाठी चीनने जमिनीवरून मारा करणाऱ्या बॅलेस्टिक क्षेपणास्त्राचा वापर केल्याचा अंदाज आहे.

यावर आंतरराष्ट्रीय जगतातून बरीच टीका झाली. त्यावर प्रतिक्रिया देताना चीनने, आम्ही अंतराळातील तसेच कोणत्याही शस्त्रास्त्र स्पर्धेचा विरोध करतो, अशी प्रतिक्रिया दिली होती.

2016मध्ये त्यांनी 'अॅओलाँग-1' उपग्रह सोडला. याला 'फिरणारा ड्रॅगन' (Roaming Dragon) असंही म्हणतात. अंतराळातील जुन्या उपग्रहांचा कचरा साफ करण्यासाठी या उपग्रहाला रोबोटिक हातही बसवण्यात आला आहे.

"अंतराळातील निकामी झालेल्या उपग्रहांचा कचरा एकत्र करून तो संपूर्णपणे नष्ट करण्यासाठी पृथ्वीच्या कक्षेत आणणारं तंत्रज्ञान आम्ही विकसित केलं आहे. त्यामुळे 'अॅओलाँग-1' हा अंतराळातील कचरा गोळा करण्यासाठी तयार करण्यात येणाऱ्या उपग्रहांच्या मालिकेतील एक उपग्रह आहे," अशी माहिती चीनच्या अंतराळ कार्यक्रमातील अधिकाऱ्यांनी दिली होती.

नासाच्या माहितीनुसार अंतराळात निकामी झालेल्या उपग्रहांचे चेंडूच्या आकाराचे जवळपास 20,000 तुकडे पृथ्वीभोवती फिरत आहेत. हे तुकडे उपग्रह आणि अंतराळयानांचं नुकसान करू शकतात.

तर गोटी किंवा त्याहून मोठ्या आकाराचे जवळपास पाच लाख तुकडे आहेत. तर ज्यांना गोळाही करता येत नाही असे तर लाखो तुकडे आहेत.

मात्र हेच तंत्रज्ञान युद्धादरम्यान शत्रू राष्ट्राचे उपग्रह नष्ट करण्यासाठीही वापरलं जाण्याची शक्यता आहे.

गेल्या वर्षी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी आपल्या संरक्षण खात्याला 'अंतराळदल' ही सहावी शाखा स्थापन करण्याचे आदेश दिले होते.

अमेरिका 2002 साली क्षेपणास्त्र विरोधी करारातून बाहेर पडला. यामुळे राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश यांच्या प्रशासनासाठी अंतराळ आधारित शस्त्रास्त्र यंत्रणा तयार करण्याचा मार्ग सुकर झाल्याने अमेरिकेच्या वाढत्या महत्त्वाकांक्षेविषयी चीनने काळजी व्यक्त केली होती.

5. क्वाँटम कम्युनिकेशन

सायबर सुरक्षेविषयी सांगायचे तर माहितीची सुरक्षितता हीच सर्वाधिक महत्त्वाची बाब असते.

याबाबतीत चीनला पहिलं मोठं यश मिळालं ते 2016 साली. 2016मध्ये चीनने माहिती लीक होणार नाही, अशी गुप्त संपर्क यंत्रणा असलेला उपग्रह प्रक्षेपित केला होता.

या उपग्रहाला प्राचीन चीनमधील शास्त्रज्ञ आणि तत्त्ववेत्ते मिसीयस यांचं नाव देण्यात आलं होतं. या उपग्रहात माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी क्वाँटम सिद्धांताचा वापर करण्यात आला होता.

कुठल्याही प्रकारचा बाहेरील हस्तक्षेप लगेच निदर्शनास येत असल्याने क्वाँटम कम्युनिकेशन सुरक्षित मानलं जातं.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)