You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
गगनयान: 3 भारतीयांना अंतराळात पाठवणारी मोहीम नेमकी काय?
2022 साली तीन भारतीयांना 7 दिवसांसाठी अंतराळात पाठवण्याच्या मोहिमेला केंद्र सरकारनं शुक्रवारी मंजुरी दिली.
'गगनयान' नावाच्या या मोहिमेसाठी 10 हजार कोटींचा खर्च येणार असल्याची माहिती केंद्रीय कायदामंत्री रविशंकर प्रसाद यांनी दिली.
ही मोहीम यशस्वी झाल्यास अंतराळात माणसाला पाठवणारा भारत चौथा देश ठरेल.
यापूर्वी रशिया, अमेरिका आणि चीन या तीन देशांनी ही मोहीम फत्ते केली आहे.
15 ऑगस्टला मोदींनी केली होती घोषणा
भारतीयांना अंतराळात पाठवण्याचा हा संकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गेल्या वर्षी 15 ऑगस्टला जाहीर केला होता. 2022 पर्यंत देशातील एखाद्या तरुणाला अथवा तरुणीला अंतराळात पाठवण्यात येईल, असं मोदींना लाल किल्ल्यावरून दिलेल्या भाषणात म्हटलं होतं.
भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO किंवा इस्रो) हे काम 2022पर्यंत पूर्ण करेल, असं इस्रोचे अध्यक्ष डॉ. के. सीवान यांनी त्यावेळी सांगितलं होतं.
40 महिन्यांच्या आत या मोहिमेला सुरुवात करण्यात येईल, असं इस्रोनं स्पष्ट केलं आहे.
याच मोहिमेच्या सुरुवातीला इस्रोनं नोव्हेंबर महिन्यात GSLV मार्क £D या रॉकेटचं यशस्वी प्रक्षेपण केलं होतं.
2022 पर्यंत भारतीय व्यक्तीला अंतराळात पाठवण्याचं सरकारचा उद्देश आहे. GSLV मार्क III D2 या रॉकेटच्या साहाय्यानेच तिघांना अंतराळात पाठवलं जाईल, असं विज्ञान अभ्यासक पल्लव बागला यांनी बीबीसीला सांगितलं.
भारताच्या या घोषणनंतर पाकिस्तानही चीनच्या मदतीनं त्यांच्या नागरिकाला अंतराळात पाठवण्याची योजना आखत आहे, अशी त्यावेळी चर्चा होती.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)