अवकाशात मानव पाठवण्याचं भारताचं स्वप्न पूर्ण होणार?

    • Author, पल्लव बागला
    • Role, ज्येष्ठ विज्ञान पत्रकार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2022पर्यंत भारत अवकाशात अंतराळवीर पाठवेल, अशी घोषणा केली आहे. संपूर्ण स्वबळावर राबण्यात येणारी मोहीम पूर्ण करण्याची भारताची क्षमता कशी आहे? हे शिवधनुष्य इस्रो पेलू शकेल? विज्ञानावर लिखाण करणारे पल्लव बागला यांनी केलेलं हे विश्लेषण.

इंडियन स्पेस रिसर्च ऑगर्नायझेशनच्या शास्त्रज्ञांच्या मते पंतप्रधान मोदीं हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी 1.28 अब्ज डॉलर इतका अधिकचा निधी लागणार आहे आणि 40 महिन्यांच्या आत हा उपग्रह अवकाशात झेपावेल.

हे शक्य आहे, असं शास्त्रज्ञांना वाटतं आणि त्यामागे बरीच कारणं आहेत.

या मोहिमेसाठी देशातालं सर्वांत जास्त वजनाचं रॉकेट वापरलं जाईल. हे रॉकेट आहे Geosynchronous Satellite Launch Vehicle Mark III किंवा GSLV Mk-III.

याचं वजन 640 टन असून उंची 43 मीटर आहे. या रॉकेटचं यशस्वी प्रक्षेपण 2017मध्ये झालं होतं. या रॉकेटच्या प्रक्षेपणाला मोठी प्रसिद्धी मिळाली होती. पाच जंबो जेट किंवा 200 हत्तींच्या वजनाचं रॉकेट असं याचं वर्णन झालं होतं.

हे रॉकेट अवकाशात 10 टन वजनाचं पेललोड प्रक्षेपित करू शकतं. पृथ्वीच्या कक्षेत 2000 किलोमीटर उंचीवर हे प्रक्षेपण होऊ शकतं. अवकाशात अंतराळवीर सोडण्यासाठी हे पुरेसं आहे, असं संशोधकांना वाटतं.

बंगालच्या उपसागराजवळ असलेल्या लाँचपॅडमध्ये काही बदल करून अंतराळवीर अवकाशात पाठवता येतील, असं संशोधकांना वाटतं.

इस्रोनं जुलै महिन्यात पॅड अबॉर्ट टेस्ट यशस्वीरीत्या घेतली होती. या चाचणीत जे टेस्ट व्हेईकल वापरलं होतं त्यात माणसाच्या जागी डमी वापरण्यात आला होता.

हे टेस्ट व्हेईकल शक्तिशाली अंतर्गत थ्रस्टरमुळे अवकाशाच्या दिशेनं फेकलं गेलं. या प्रात्यक्षिकातून जर लाँचपॅडवर रॉकेट अपयशी ठरलं तर क्र्यू शीपचं काय होईल, याची कल्पना यातून आली.

अंतराळयानाच्या (स्पेस व्हेईकल) बाहेरून लावण्यासाठी कमी वजनाच्या सिलिकॉन टाईल्स लागतात. त्या भारतीय शास्त्रज्ञांनी बनवल्या आहेत.

स्पेस व्हेईकल किंवा हे यान जळू नये यासाठी या टाईल्स लागतात. अंतराळयान पृथ्वीवर परत येत असताना पृथ्वीच्या वातावरणाशी घर्षण होऊन तापमान 1000 डिग्री सेल्सियस इतकं पोहोचलेलं असतं, त्यामुळे या सिलिकॉन टाईल्सची गरज असते.

अहमदाबाद इथल्या प्रयोगशाळेनं अंतराळवीरांना लागणारे खास सूट यापूर्वीच विकसित केले आहेत.

पण खरं आव्हान आहे ते म्हणजे अंतराळवीरांना द्यावं लागणारं प्रशिक्षण, असं संशोधकांना वाटतं. याशिवाय अंतराळात जिवंत राहाण्यासाठी आवश्यक ती लाईफ सपोर्ट सिस्टिम विकसित करणे, हे मोठं आव्हान असणार आहे.

इस्रोचे चेअरमन आणि प्रसिद्ध रॉकेट शास्त्रज्ञ के. सीवन यांनी मला सांगितलं की, "अंतरळवीरांचा हा कार्यक्रम राष्ट्रीय अभिमानात भर घालेलच शिवाय युवकांना विज्ञानात करीअर करण्यासाठी प्रेरणा देईल."

डॉ. सीवन म्हणाले, "अंतराळवीरांना प्रशिक्षण देण्याची पूर्ण क्षमता आपल्याकडे अजूनही नाही. या मोहिमेची डेडलाईन लक्षात घेता इतर संस्थांची यात मदत घेतली जाईल."

1984ला सोव्हिएट रशियाच्या मोहिमेत अंतराळात भ्रमण केलेले भारताचे पहिले अंतराळवीर राकेश शर्मा म्हणाले, "एका उंचीवर पोहोचलेल्या कोणत्याही अवकाश कार्यक्रमासाठी अवकाशात माणूस पाठवणं नैसर्गिक म्हणावं असं असतं. तुम्ही हे करू शकला तर काळाच्या पुढचं पाऊल ठरतं."

आतापर्यंत रशिया, अमेरिका आणि चीन या देशांनी अंतराळात माणूस पाठवला आहे. जर भारत या मोहिमेत यशस्वी ठरला तर अवकाशात माणूस पाठवणारा भारत हा 4था देश ठरेल.

पण काही संशोधकांना वाटतं की या मोहिमेचा उद्देश चुकीचा आहे.

संशोधक व्ही. सिद्धार्थ म्हणाले, "नील आर्मस्ट्राँग यांनी चंद्रावर पाऊल ठेवल्यानंतर 50 वर्षांनी भारतानं अंतराळात मनुष्य पाठवणं म्हणजे सर्वांत मूर्ख कल्पना आहे."

नील यांचं 2012ला निधन झालं. 20 जुलै 1969ला त्यांनी चंद्रावर पाऊल ठेवलं होतं. माणसासाठी एक छोटं पाऊल आणि मानवजातीसाठी मोठी झेपं, असं त्यांनी या घटनेचं वर्णन केलं होतं.

मनुष्य अंतराळात पाठवण्याचा धोका घेण्यापेक्षा खरंतर यंत्रमानव मोहीम हाती घेणं योग्य पाऊल ठरलं असतं कारण अंतराळवीर करत असलेली अनेक काम रोबोही करतात.

डॉ. सीवन यांनी सिद्धार्थ यांची भूमिका खोडून काढली. ते म्हणाले अशी अनेक काम आहेत, जी फक्त मानवी बुद्धिमत्ताच करू शकते. भारतीयांना अंतराळात पाठवण्याची भारताची क्षमता विकसित करण्याचा प्रयत्न आपण करत आहोत, असं ते म्हणाले.

ते पुढे म्हणाले, "पृथ्वीच्या पाठीवरील सर्वांत जुन्या संस्कृतीपैकी एक म्हणजे भारत आहे. पृथ्वीच्या बाहेर जेव्हा माणसाच्या वसाहती स्थापन करायच्या असतील तेव्हा त्यात भारत कसं काय मागे राहू शकेल?"

केंद्र सरकारचे विज्ञान सल्लागार के. विजय राघवन म्हणाले, "या मोहिमेसाठी भारताकडे अचूक तंत्रज्ञान आणि वातावरण आहे."

यापूर्वी जेव्हा जेव्हा इस्रोला आव्हानात्मक जबाबदाऱ्या दिल्या त्या त्यावेळी या कसोट्यांवर इस्रोनं स्वतःला सिद्ध करून दाखवलं आहे.

2014मध्ये भारतानं मंगळाच्या कक्षेत यशस्वीरीत्या उपग्रह सोडला. ही कामगिरी करणारा भारत 4थ्या क्रमांकाचा देश ठरला. हे मिशन फक्त 6 कोटी 70 लाख डॉलरमध्ये पूर्ण झालं. पाश्चात्य देशांशी तुलना करता हा खर्च फारच कमी आहे.

तर 2009मध्ये चंद्रयान-1 मिशन पूर्ण केलं. रडारच्या सहायानं चंद्रावरील पाण्याचा शोध घेणारे हे सर्वांत परिपूर्ण मिशन ठरलं आहे. तर 2017मध्ये भारतानं एकाच मोहिमेत 104 उपग्रहांचं प्रक्षेपण करून यापूर्वीचं रशियाचा एकाच वेळी 37 उपग्रह प्रक्षेपित करण्याचा विक्रम मोडून काढला.

डॉ. सीवन म्हणतात, "अपयश हा पर्याय नाही. इस्रोची टीम आव्हानांचा सामना करून 2022पर्यंत भारतीयाला अंतराळात नेईल."

(पल्लव बागला हे दिल्लीस्थित विज्ञान लेखक आहेत. त्यांनी 'Reaching for the Stars: India's Journey for Mars and Beyond' हे पुस्तक लिहिलं आहे. या पुस्तकाचं प्रकाशन Bloomsburyनं केलं आहे.)

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)