नासाला मंगळावर जीवन सापडेल? काय वाटतं संशोधकांना?

    • Author, जॉनाथन अॅमोस
    • Role, बीबीसी विज्ञान प्रतिनिधी

प्राचीन काळातील जीवनाच्या खुणा पृथ्वीपेक्षा मंगळावर सापडण्याची शक्यता जास्त आहे, असे नासाच्या रोवर मोहिमेशी संबंधित एका शास्त्रज्ञाने सांगितले.

मंगळावर प्राचीन काळात जीवन होते का, हे शोधण्यासाठी 2021 साली सहा चाकांचा एक रोबोट या ग्रहावर उतरणार आहे. 3.9 अब्ज जुन्या दगडांमधून या यानाला प्राचीन जीवसृष्टीच्या खाणाखुणा शोधाव्या लागणार आहेत.

पृथ्वीच्या तुलनेत मंगळावर प्राचीन जीवसृष्टीच्या खाणाखुणा अधिक चांगल्या प्रकारे सुरक्षित राहिल्या असतील, असं संशोधकांना वाटते.

पृथ्वीवर दगडांची पुननिर्मिती होण्याची प्रक्रिया सतत सुरू असते त्यामुळे प्राचीन जीवनाचे पुरावे सापडण्याची शक्यता कमी होते. मात्र मंगळावर सुरुवातीच्या काळातील इतिहास पुसला जाण्याची अशी प्रक्रिया नाही.

"विश्वास बसणार नाही पण मंगळाचा इतिहास पाहता तेथेही पृथ्वीप्रमाणेच प्लेट टेक्टोनिक्स (भूविवर्तनीय हालचाली) घडल्या आहेत," असे कॅलिफोर्निया येथिल नासाच्या जेट प्रोपल्शन लॅबोरेटरी (जेपीएल) येथील केन विलिफोर्ड यांनी सांगितलं.

"पृथ्वीचा दगडांचा सगळा इतिहास महासागराच्या तळाशी गेला आहे. तसेच जे दगड भूपृष्ठावर राहिले आहेत तेसुद्धा उष्णतेने व दाबामुळे बदलले आहेत. अशी परिस्थिती मंगळवार असण्याची शक्यता नाही. पृथ्वीवरील नव्या दगडांपेक्षा मंगळावरील दगड अधिक चांगल्या प्रकारे जपले गेले असतील," असे विलिफोर्ड यांनी बीबीसीला सांगितले.

हे नवे रोवर मंगळाच्या विषुववृत्ताजवळ असणाऱ्या जेझेरो क्रेटरजवळ उतरवले जाईल. उपग्रहांनी पाठवलेल्या माहितीवरून येथे एकेकाळी खोल सरोवर असल्याचे समजते.

जर या सरोवराच्या पाण्यामध्ये किंवा आजूबाजूला सूक्ष्मजीव राहिले असतील आणि ते तेथिल गाळामध्ये अडकले असतील. ते आजच्या काळात खोदून काढले जाऊ शकतात, असे वैज्ञानिकांनी वाटते.

या सरोवराच्या काठावरील कार्बोनेट संचयनातून काही पुरावे सापडतात का हे पाहण्याचे मुख्य उद्दिष्ट असेल.

द्रवामधून (पाणी) संचय होऊन कार्बोनेटसारख्या खनिजांची निर्मिती होत असते. जेव्हा ते संचयित होऊन स्थायूरुपात जात असतात तेव्हा पाण्यातील सर्व घटक अडकतात. त्यामुळे पाण्यामध्ये असणारे सर्व घटक त्या खनिजात अडकलेले असतात असे पुर्दुए इंडियाना विद्यापीठातील ब्रिओनी हॉर्गन यांनी सांगितले. रोव्हर स्ट्रोमाटोलाइटस सारख्या जागी उतरून शोध सुरू करेल.

स्ट्रोमाटोलाइटस ही सूक्ष्मजींवाद्वारे स्तंभाकार रचना असते.

हे रोवर या जागी उतरून सरोवराच्या काठावर खोदून नमुने गोळा करेल. त्यानंतर हे नमुने धातूच्या डब्यातून पृथ्वीवर पाठवले जातील त्यानंतर पुढील काम सुरु होईल.

रोवरने गोळा केलेले साधारणपणे 40 नमुने 2030 पर्यंत मिळवण्याचे नासा आणि युरोपातील एसा संस्थेने नियोजन केले आहे. अमेरिकन जिओफिजिकल युनियनच्या बैठकीमध्ये विलिफोर्ड आणि होर्गन यांनी यावर चर्चा केली.

2012 साली गेल क्रेटरवर उतरलेल्या क्युरिओसिटी रोबोटप्रमाणेच हे रोवर आहे

यावेळेसही स्कायक्रेन तंत्रज्ञान वापरले जाणार आहे. या तंत्रज्ञानामुळे रोबोट, रोवर अत्यंत अचूक जागी उतरवले जातात. टेरेन रिलेटिव्ह नेविगेशन नावाने एक तंत्रज्ञान विकसित केले आहे, त्यामुळे यान अधिक अचूक पद्धतीने उतरवले जाऊ शकेल.

क्रेटरच्या किनाऱ्यावरील सरोवरात पाण्याचा पुरवठा करणाऱ्या त्रिभूज प्रदेशातील खडकांसमोर रोव्हर उतरेल अशी अपेक्षा आहे.

रोव्हर उतरण्याचे आणि त्याचा पुढील नियोजन झाल्याचे अमेरिकन जिओफिजिकल युनियनच्या बैठकीत या मोहिमेचे मुख्य शास्त्रज्ञ केन फर्ले यांनी म्हटलं आहे.

"या रोबोटमध्ये दिशादर्शनासाठी व्यवस्था बसवली असून दोन स्थळांमध्ये प्रवास करण्यासाठी ती उपयोगी पडेल. चांगल्या भूप्रदेशात ते प्रतिदिन 100 मीटर प्रवास करू शकेल," असे डॉ. फर्ले यांनी सांगितले.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)