You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
मंगळ ग्रहाविषयीच्या या 10 गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?
नासाने पाठवलेला पर्सव्हिअरन्स (Perseverance) रोव्हर मंगळाच्या पृष्ठभागावरील येझरो (Jezero) नावाच्या विवरामध्ये यशस्वीरित्या लँड झालाय.
7 महिन्यांच्या प्रवासानंतर हे यान मंगळावर उतरलं.
या पर्सव्हिअरन्स रोव्हरमध्ये विविध उपकरणं, अनेक कॅमेरे आणि मायक्रोफोन्स आहेत. शिवाय या रोव्हरमध्ये एक लहान हेलिकॉप्टरही आहे, जे उडवण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.
हा रोव्हर ज्या विवरात उतरलाय ते येझरो विविर 45 किलोमीटर व्यासाचं आहे. अब्जावधी वर्षांपूर्वी इथे एक तलाव असावा असा संशोधकांचा कयास आहे. म्हणूनच इथे जीवसृष्टीचे काही अंश मिळतात का? याचा शोध हा रोव्हर घेणार आहे.
चला मग मंगळ ग्रहाविषयीच्या 10 गोष्टी जाणून घेऊया.
1. सूर्यमालिकेत मंगळ ग्रह सूर्यापासून 22.72 कोटी किलोमीटर अंतरावर आहे. सूर्यमालिकेत पृथ्वी तिसऱ्या क्रमांकावर आहे. तर त्यानंतर म्हणजे चौथ्या क्रमांकावर मंगळ आहे. पृथ्वीचं सूर्यापासूनचं अंतर 11.88 कोटी किलोमीटर आहे.
2. मंगळ ग्रह पृथ्वीच्या निम्मा आहे. पृथ्वीचा व्यास 12,681.6 किलोमीटर आहे तर मंगळाचा व्यास 6752 किलोमीटर आहे. मात्र त्याचं वजन पृथ्वीच्या एक दशांश आहे.
3. मंगळ सूर्याची एक प्रदक्षिणा 687 दिवसात पूर्ण करतो. याचाच अर्थ पृथ्वीच्या तुलनेत सूर्याची एक प्रदक्षिणा पूर्ण करायला मंगळ ग्रहाला जवळपास दुप्पट कालावधी लागतो. म्हणजेच मंगळावर एक वर्ष 687 दिवसांचं असतं.
4. मंगळावरचा एक दिवस (ज्याला सोलार डे असंही म्हणतात) 24 तास 37 मिनिटांचा असतो.
5. हाडं गोठवणारी थंडी, धुळीची वादळं आणि वावटळी हे सर्व पृथ्वीच्या तुलनेत मंगळावर खूपच जास्त आहे. तरीही जीवसृष्टीसाठी मंगळाची भौगोलिक स्थिती इतर ग्रहांच्या तुलनेत खूप चांगली असल्याचं मानलं जातं.
उन्हाळ्यात या ग्रहावर सर्वाधिक तापमान 30 अंश सेल्सियस असतं तर हिवाळ्यात तापमान शून्याखाली 140 अंश सेल्सियसपर्यंत घसरतं.
6. पृथ्वीप्रमाणेच मंगळावरही वर्षातले चार ऋतू असतात. पानगळ, उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा. पृथ्वीच्या तुलनेत मंगळावर प्रत्येक ऋतू दुप्पट काळ असतो.
7. पृथ्वी आणि मंगळ या दोन्ही ग्रहांची गुरूत्वाकर्षणाची क्षमता वेगवेगळी आहे. त्यामुळे पृथ्वीवर सुमारे 45 किलो वजनाची व्यक्ती मंगळावर 17 किलो वजनाची होते.
8. मंगळाला दोन चंद्र आहेत. फोबोस, याचा व्यास 23 किलोमीटर आहे आणि डेमिओस, याचा व्यास 13 किलोमीटर आहे.
9. मंगळ आणि पृथ्वी दोन्हींच्या भूगर्भात चार स्तर आहेत. पहिला स्तर पर्पटी म्हणजे क्रस्ट जो लोहयुक्त बेसॉल्ट दगडापासून बनला आहे. दुसरा स्तर मँटल, हा सिलिकेट दगडांपासून बनला आहे. तिसरा आणि चौथा स्तर म्हणजे बाह्यगाभा आणि अंतर्गत गाभा. पृथ्वीच्या केंद्राप्रमाणे मंगळाचे हे दोन स्तरही लोह आणि निकेल यापासून बनलेले असू शकतात, असा अंदाज आहे. मात्र हे गाभे धातूप्रमाणे टणक आहेत की द्रव पदार्थांनी बनलेले आहेत, सध्या याची ठोस माहिती उपलब्ध नाही.
10. मंगळाच्या वातावरणात 96% कार्बन डाय ऑक्साईड आहे. तसंच 1.93% ऑर्गन, 0.14% ऑक्सिजन आणि 2% नायट्रोजन आहे.
याशिवाय मंगळाच्या वातावरणात कार्बन मोनॉक्साईडचे अंशही सापडले आहेत.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)