You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
या शहरात 80 लाख रुपये कमावणारा माणूसही असतो गरीब
"मित्रा... तुझा पगार तर लाखात आहे.", "एवढ्या पगाराचं तू करतो तरी काय?", "तुझी तर ऐश आहे राव..."
भारतात यासारख्या आर्श्चयमिश्रित गप्पा तुम्हाला नेहमी ऐकायला मिळू शकतात. फ्रेंड सर्कलमध्ये ज्या मित्रांचा पगार हा लाखात असतो त्यांना यशस्वी समजलं जातं. समाज किंवा कुटुंबातही अशा व्यक्तींना यशस्वी व्यक्तीच्या रूपात बघितलं जातं.
पण तुम्हाला माहीत आहे का? या भूतलावर असं एक शहर आहे, जिथं 80 लाख रुपये कमावणाऱ्यालाही गरीब समजलं जातं. हे शहर आहे, अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को.
अमेरिकेतील निवासी आणि शहरी विकास विभागाचा ताजा अहवाल याकडे अंगुलीनिर्देश करतो.
या अहवालानुसार, सॅन फ्रान्सिस्को, सॅन माटिओ आणि आजूबाजूच्या परिसरात राहणाऱ्या चार सदस्यांच्या कुटुंबाचं उत्पन्न जर 80 लाख रुपये असेल तर ते किमान वेतन मिळवणारं कुटुंब समजलं जाईल.
त्याच ठिकाणी जर एखादं कुटुंब 50 लाख रुपये कमावत असेल तर ते कुटुंब गरीब आहे. देशातील इतर भागांच्या तुलनेत या शहरांमधील गरिबीचा स्तर कैक पटीनं उच्च आहे.
अमेरिकेत गरीब कोण आणि श्रीमंत कोण?
'ब्रुकिंग इन्स्टिट्यूट'ची वेबसाइट 'द हॅमिल्टन प्रोजेक्ट'चा एक सर्व्हे अमेरिकेतल्या लोकांच्या कमाईमध्ये फार मोठं अंतर असल्याचं दर्शवतो.
अमेरिकेतल्या जवळपास दोन-तृतीयांश लोकांचं उत्पन्न हे सॅन फ्रान्सिस्कोत 80 लाख रुपये कमावणाऱ्या गरीब कुटुंबापेक्षाही कमी आहे.
अमेरिकेतील चार सदस्यांच्या कुटुंबाचं सरासरी उत्पन्न हे जवळपास 62 लाख रुपयांपेक्षाही कमी आहे. त्याचवेळी यापेक्षाही जास्त सदस्य असणाऱ्या कुटुंबांचं सरासरी उत्पन्न हे जवळपास 41 लाख रुपये आहे.
32.6 कोटी लोकसंख्या असलेल्या अमेरिकेतले 4 कोटी लोक हे दारिद्र्यरेषेच्या खाली आहेत. अशा चार सदस्यांच्या कुटुंबाचं उत्पन्न जवळपास 17 लाख रुपये आहे.
देशातील इतर काही मोठ्या शहरांच्या तुलनेत अन्य भागातील लोकांचं उत्पन्न हे फारच कमी आहे.
इतर शहरांपेक्षा सॅन फ्रान्सिस्को वेगळं कसं?
या शहरात माहिती तंत्रज्ञान (IT) आणि तंत्रज्ञानावर आधारित उद्योगांची संख्या मोठी आहे. त्यामुळेच इथं राहणाऱ्या लोकांचं उत्पन्न पण त्या मानानं चांगलंच आहे.
तगड्या उत्पन्नाची आशा ठेवणाऱ्या लोकांसाठी हे शहर म्हणजे त्यांच्या स्वप्नातलं शहर झालं आहे.
सॅन फ्रान्सिस्कोच्या शहरी भागात राहणाऱ्या 25 ते 64 वर्षं वयातील नोकरदारांचं उत्पन्न सन 2008 ते 2016 दरम्यान 26 टक्क्यांपर्यंत वाढलं आहे. दुसऱ्या शहरांच्या तुलनेत ही वाढ फार जास्त आहे.
सन 2016 पर्यंत इथल्या लोकांचं सरासरी उत्पन्न हे जवळपास 43 लाख रुपये झालेलं होतं.
अर्थातच अमेरिकेतल्या अन्य भागातल्या लोकांनाही अधिक पगार दिला जातो. सॅन जोसमध्ये 25 ते 64 वर्षं वयोगटातील नोकरदारांचं सरासरी उत्पन्न हे 45 लाख रुपये आहे. तर वॉशिंग्टन डीसीमध्ये जवळपास 42 लाख रुपये आणि बॉस्टनमध्ये 38 लाख रुपये इतकं आहे.
कोणत्या क्षेत्रांत सर्वाधिक उत्पन्न?
जास्तीचं उत्पन्न मिळणाऱ्या परिसरातल्या इतर नोकऱ्यांमध्येही लोकांना चांगला पगार दिला जातो.
सॅन फ्रान्सिस्कोमधील डॉक्टर हा सर्वाधिक उत्पन्न मिळवणारा असतो. डॉक्टरांचं सरासरी उत्पन्न हे एक कोटी 32 लाख रुपयांहून अधिक असतं. सरकारी अधिकाऱ्यांचं सरासरी उत्पन्न जवळपास एक कोटी 15 लाख रुपये असतं. त्याचवेळी सॉफ्टवेअर डेव्हलपर जवळपास 80 लाख रुपये सरासरी कमावतात.
असं असलं तरी इथं असेही लोक आहे, ज्यांचं उत्पन्न फारच कमी आहे. सॅन फ्रान्सिस्कोत सर्वांत कमी उत्पन्न हे शेतकऱ्याचं आहे. शेतकऱ्यांच उत्पन्न सरासरी 13 लाख रुपये आहे. त्याचठिकाणी लहान मुलांचं संगोपान करणाऱ्यांचं उत्पन्न हे जवळपास 15 लाख रुपये आहे.
आमदनी अठन्नी, खर्चा रुपय्या
इथल्या लोकांचं उत्पन्न जरी जास्त असलं तरी इथं राहण्याचा खर्चही काही कमी नाही. इथं सर्वाधिक खर्च हा राहण्यावर होतो.
सॅन फ्रान्सिस्कोमध्ये निवासावर देशाच्या सरासरीच्या तुलनेत 25 टक्के अधिक खर्च करावा लागतो.
असं असलं तरी इथल्या लोकांचं उत्पन्न हे राष्ट्रीय सरासरी त्या तुलनेत 45 टक्के आहे.
सॅन फ्रान्सिस्कोमध्ये 2BHK अपार्टमेंटचं दर महिन्याचं भाडं हे जवळपास 2 लाख रुपयाहून अधिक असतं. 2008 मध्ये ते जवळपास यापेक्षा निम्मं होतं.
ओहायोसारख्या राज्यांमध्ये हे भाडं 58 हजार रुपयांच्या आसपास असतं. या शहरांच्या मानाने सॅन फ्रान्सिस्कोमध्ये उत्पन्नाच्या तुलनेत घर भाड्यावरील खर्च अधिक आहे.
दुसऱ्या शहरांच्या तुलनेत इथं उत्पन्न दुप्पट जरी असलं तरी घरभाड्यावर 270 टक्के अधिकचा खर्च करावा लागतो.
अशा परिस्थितीत सॅन फ्रान्सिस्कोमध्ये राहणं एखाद्या आर्थिक आव्हानापेक्षा कमी नाही.
अमेरिकन सरकार हे मानतं की, जर समान क्षेत्रात, समान सदस्यांचं कुटुंब सरासरी उत्पन्नाच्या तुलनेत 80 टक्के किंवा त्यापेक्षा कमी कमावतं असेल तर ते कुटुंब गरीब आहे.
सॅन फ्रान्सिस्को सरकारने जास्तीचं घरभाडं गृहीत धरून 80 लाख रुपये उत्पन्न असलेल्यांना किमान उत्पन्नाच्या श्रेणीत टाकलं आहे. इथं चार सदस्यांच्या कुटुंबांचं सरासरी उत्पन्न हे 81 लाख रुपये आहे.
असं असलं तरी 80 लाखांपेक्षा कमी कमावणाऱ्यांना सरकारकडून देण्यात येणाऱ्या घरभाडं भत्ता किंवा मदतीसाठी दावेदार मानलं जात नाही.
सॅन फ्रान्सिस्को शहर एक महागडं शहर जरी असलं तरी इथलं वातावरण आणि समृद्ध संस्कृती लोकांना आकर्षित करत असते.
चांगल्या जीवनमानाची आशा ठेऊन असलेले इथे राहण्यासाठी येतात. भारतात लाखोंनी पगार मिळवणाऱ्यांना जरी श्रीमंत समजलं जात असलं तरी सॅन फ्रान्सिस्कोमध्ये महागाईच इतकी आहे की, इथं 80 लाख कमावणारा पण गरीब समजला जातो.
हे पाहिलंत का?
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)