डेन्मार्क : जगातल्या सगळ्यांत महागड्या व्होडकाची चोरी!

जगातल्या सगळ्यांत महागड्या व्होडकाची चोरी झाल्यानंतर तिची रिकामी बाटली एका बांधकामस्थळी सापडली. या व्होडकाची किंमतही डोळे पांढरे करणारी आहे - 1.3 मिलियन डॉलर म्हणजेच 8 कोटी 23 लाख रुपये.

गेल्या आठवड्यात पहाटे या व्होडकाची चोरी झाल्याच्या वृत्ताला डेन्मार्क पोलिसांनीही दुजोरा दिला आहे.

सोने आणि चांदीपासून बनवण्यात आलेल्या या व्होडकाच्या बाटलीला हिऱ्यांचं झाकण आहे. डेन्मार्कमधल्या कोपनहेगनमधल्या एका बारमध्ये महागडया व्होडकाच्या बाटल्या मांडण्यात आल्या आहेत. याच बारने कर्ज काढून ही व्होडका घेतली होती.

एका चोरानं बारमध्ये प्रवेश करत रशियन-बाल्टिक कंपनीच्या बनावटीची ही व्होडकाची बाटली पळवून नेली होती. याची दृश्य बारच्या CCTVमध्ये कैद झाली आहेत. मात्र शहरातल्या एका बांधकाम स्थळी ही बाटली शाबूत पण रिकामी सापडली आहे.

"या बाटलीसोबत नेमकं काय झालं ते सांगता येणार नाही. मात्र ही बाटली रिकाम्या अवस्थेत सापडली," असं कोपनहेगन पोलिसांच्या प्रवक्त्यानं सांगितलं.

या कॅफे 33 बारचे मालक ब्रायन इंगबर्ग यांनी या बाटलीची किंमत अजूनही तीच असल्याचं स्पष्ट केलं.

"दुर्देवानं बाटली रिकामी सापडली. बांधकाम स्थळावरच्या एका कामागारालाच ती सापडली," ही माहिती त्यांनी डेन्मार्कमधल्या एक्सत्रा ब्लॅडेट या वृत्तपत्राला दिली. "पण बाटली वाचल्याचा आनंद आहे," असंही त्यांनी पुढे सांगितलं.

या प्रकारची व्होडका इंगबर्ग यांच्याकडे असल्यानं ते ही बाटली पुन्हा भरणार आहेत. ही बाटली त्यांनी लातव्हियामधल्या डार्ट्झ मोटर कंपनीकडून घेतली होती. गेल्या सहा महिन्यांपासून त्यांच्या संग्रहात ही बाटली होती.

रशियातली वाहनं बनवणाऱ्या रशिया-बाल्टिक कंपनीनं आपल्या शतकपूर्ती महोत्सवासाठी ही खास बाटली तयार करून घेतली होती. बाटलीची पुढची बाजू कातड्यानं सजवण्यात आली आहे.

त्यात रशियन-बाल्टिक कंपनीच्या गाड्यांमध्ये वापरण्यात येणाऱ्या रेडिएटर गार्डची प्रतिकृतीही बसवण्यात आली आहे. तसंच झाकण हे रशियन इंम्पिरिअल ईगलच्या आकारात असून त्यावर हिरे बसवण्यात आले आहेत.

'हाऊस ऑफ कार्ड्स' या मालिकेतल्या एका दृश्यात या बाटलीचा वापर करण्यात आला आहे. रशियाचे राष्ट्रपती अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना ही बाटली भेट देत असल्याचं हे दृश्य आहे.

हे पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)