You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
अरामकोवरील हल्ल्यानंतर अमेरिका पाठवणार सौदी अरेबियामध्ये सैन्य
सौदी अरेबियाची सरकारी तेल कंपनी अरामकोवर झालेल्या ड्रोन हल्ल्यानंतर अमेरिकेनं सौदीमध्ये लष्कर पाठविण्याची घोषणा केली आहे.
अमेरिकेचे संरक्षण मंत्री मार्क एस्पर यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं, की लष्कर पाठविण्याची योजना हे सुरक्षेच्या दृष्टिनं उचललेलं पाऊल आहे. अर्थात, अमेरिका सौदीमध्ये नेमके किती सैनिक पाठवणार आहे, हे अजून स्पष्ट झालं नाहीये.
गेल्या आठवड्यात तेल कंपनी अरामकोच्या दोन ठिकाणांवर हल्ले झाले होते. येमेनमधल्या हुथी बंडखोरांनी या हल्ल्याची जबाबदारी घेतली होती. हुथी बंडखोरांना इराणचं समर्थन आहे.
मात्र अमेरिका आणि सौदी अरेबिया या दोन्ही देशांनी इराणवरच हल्ल्याचा आरोप केला आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी शुक्रवारी (20 सप्टेंबर) इराणवर नवीन आर्थिक निर्बंध लादण्याची घोषणा केली. त्याचवेळी सैन्याला संघर्षात लोटण्याची आपली इच्छा नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं होतं.
इराणवर लादण्यात आलेले हे सर्वांत कठोर निर्बंध असल्याचं ट्रंप यांनी म्हटलं होतं. या निर्बंधाचा परिणाम इराणच्या सेंट्रल बँकेवर तसंच त्यांच्या स्वायत्त निधीवर होईल.
ओव्हल ऑफिसमध्ये माध्यमांशी संवाद साधताना ट्रंप यांनी म्हटलं, "जे लोक शक्तिप्रदर्शन करत होते, ते आता थोडातरी संयम बाळगतील."
मात्र शनिवारी (21 सप्टेंबर) इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड कमांडरने वेगळीच प्रतिक्रिया दिली आहे. देशाविरुद्ध कारस्थान करणाऱ्यांना संपवून टाकू असा इशाराच त्यांनी दिला.
मेजर जनरल हुसैन सलामी यांनी सरकारी टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं, "सावध राहा. आम्ही बदला घेऊ. जोपर्यंत आम्ही आमच्या सर्व शत्रूंना नष्ट करत नाही, तोपर्यंत हे सुरूच राहिल."
काय आहे पेंटॅगॉनचं म्हणणं?
संरक्षण मंत्री एस्पर यांनी म्हटलं की सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिरातने आपल्याकडे मदत मागितली होती.
अमेरिकन फौज हवाई सुरक्षा तसंच क्षेपणास्त्रांच्या सुरक्षेकडे अधिक लक्ष देईल. त्याचबरोबर दोन्ही देशांदरम्यान शस्त्रास्त्रांचीही देवाणघेवाण होईल.
जॉइंट चीफ ऑफ स्टाफचे अध्यक्ष जनरल जोसेफ डनफोर्ड यांनी हे एक छोटं पाऊल असल्याचं म्हटलं आहे. सैनिकांची संख्या हजारोंच्या घरात नसेल, असंही त्यांनी स्पष्ट केलं. अर्थात, सैनिकांना सौदीमध्ये नेमकं कसं पाठवणार हे त्यांनी स्पष्ट केलेलं नाही.
अमेरिका इराणवर हल्ला करण्याची योजना बनवत आहे का, असा प्रश्न संरक्षण मंत्र्यांना विचारण्यात आला. याला उत्तर देताना त्यांनी म्हटलं, की आम्ही अजूनतरी या टप्प्यापर्यंत पोहोचलो नाहीये. न्यूयॉर्क टाइम्सनं यासंबंधीचं वृत्त छापलं आहे.
सौदी अरेबियामध्ये नेमकं काय झालं?
सौदी अरेबियातील सरकारी तेल कंपनी अरामकोच्या अबकायक आणि खुरैस या दोन मोठ्या ठिकाणी गेल्या आठवड्यात ड्रोननं हल्ले करण्यात आले होते. या हल्ल्यांमुळे या दोन्ही ठिकाणच्या तेल उत्पादनावर मोठा परिणाम झाला. त्याचा फटका जगभरातील तेल पुरवठा आणि तेलाच्या किमतींनाही बसला.
बुधवारी सौदी अरेबियाच्या संरक्षण मंत्रालयानं ड्रोन आणि क्षेपणास्त्राचे अवशेष दाखवत या हल्ल्यामधील इराणच्या सहभागाचे पुरावे दिले होते. मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी म्हटलं होतं, "हल्ले नेमके कोणत्या ठिकाणावरून करण्यात आले, याचा शोध घेण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत."
अमेरिकेनंही या हल्ल्यासाठी इराणला जबाबदार धरलं आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अमेरिकन माध्यमांना सांगितलं, की हल्ले दक्षिण इराणमधून करण्यात आले होते. यासंबंधीचे पुरावेही आमच्याकडे आहेत.
इराणनं फेटाळला हल्ल्याचा आरोप
या हल्ल्यात आपला हात असल्याचा आरोप इराणनं फेटाळून लावला आहे. इराणचे पंतप्रधान हसन रुहानी यांनी सांगितलं, की हा हल्ला येमेनमधील लोकांनी बदला घेण्याच्या भावनेतून केला आहे.
इराणचे परराष्ट्र मंत्री मोहम्मद जावेद झरीफ यांनी एका ट्वीटमध्ये म्हटलं, "गेल्या साडेचार वर्षांपासून अत्याचार आणि युद्धाचे दुष्परिणाम भोगणारे येमेनमधील लोक बदला घेण्यासाठी हल्ला करू शकत नाहीत, हा अमेरिकेचा गैरसमज आहे.
बुधवारी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माइक पोम्पियो यांनी सौदी अरेबियामधील तेल ठिकाणांवर केलेल्या हल्ल्यांना 'युद्ध' म्हणून घोषित केलं.
पोम्पियो यांच्या ट्वीटला उत्तर देताना इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनी ट्वीट करून स्पष्ट केलं, की आम्हाला युद्धात काहीही रस नाहीये. मात्र आमच्यावर हल्ला झाला तर आम्ही शांत राहणार नाही.
ड्रोन हल्ल्यांमुळे झालेली उलथापालथ आणि तेल उत्पादनावर झालेल्या परिणामानंतर अरामकोनं सांगितलं, की सप्टेंबर अखेरीपर्यंत परिस्थिती पूर्वपदावर येऊ शकते.
हल्ल्याचा भारतावर परिणाम
अरामकोवर झालेल्या ड्रोन हल्ल्यानंतर तेलाच्या किमती वाढलेल्या आहेत. गेल्या काही वर्षांतील दशकांमध्ये तेलाच्या किमतीतील ही सर्वात मोठी दरवाढ आहे. त्यामुळे मध्य-पूर्वेमध्ये एका नवीन संघर्षाचा धोका निर्माण झाला आहे.
या हल्ल्यामुळे सौदी अरेबियाचं एकूण उत्पादन आणि जगातील 5 टक्के तेल पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. भारत जवळपास 83 टक्के तेल आयात करतो. भारत जगातील सर्वाधिक तेल आयात करणाऱ्या देशांपैकी एक आहे.
सुरूवातीला भारत आपल्या तेलाच्या आयातीतील 10 टक्क्यांहून अधिक हिस्सा इराणकडून खरेदी करायचा. मात्र यावर्षाच्या सुरुवातीलाच अमेरिकेनं इराणसोबतच्या अणुकरारातून माघार घेतली. त्यानंतर अमेरिकेनं भारतासह अनेक देशांवर इराणकडून तेल खरेदी न करण्याबद्दल दबाव आणायला सुरुवात केली.
सध्या तरी भारत कच्चं तेल आणि स्वयंपाकासाठीचा गॅस इराक आणि सौदी अरेबियाकडून खरेदी करतो. सौदी अरेबियाकडून होणाऱ्या तेल पुरवठ्यामध्ये अडथळा आल्यामुळे भारतात तेलाच्या किमतींमध्ये वाढ होत आहे. भारतात तेलाच्या किमती सध्याच्या किमतीपेक्षाही वाढू शकतात, असा अंदाज व्यक्त होत आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)