ज्या देशांकडे जास्त कच्च्या तेलाचा साठा आहे ते देश गरीब का आहे?

आजही इंधनाचा सगळ्यात मोठा स्रोत पेट्रोल किंवा डिझेल आहे. त्याला काळं सोनं असं म्हणतात. जोपर्यंत पेट्रोल आणि डिझेलचं स्थान अपारंपारिक ऊर्जा घेत नाही तोपर्यंत आपल्याला त्यावर अधिकाधिक अवलंबून रहावं लागेल.

एक वर्षाआधीच्या तुलनेत 2018 मध्ये सगळ्यात जास्त तेलाचा वापर झाला आहे. Organisation of Petroleum Exporting Countries च्या एका अहवालानुसार 2017 मध्ये 9.720 कोटी बॅरल कच्च्या तेलाचा व्यापार झाला. त्या तुलनेत 2018 मध्ये 9.882 कोटी बॅरल कच्च्या तेलाचा वापर झाला.

ओपेकच्या अहवालानुसार 2019 मध्ये हा आकडा 10.023 कोटी बॅरल इतका होऊ शकतो.

त्यामुळेच कच्च्या तेलाची विक्री हे अनेक देशांच्या उत्तपन्नाचं मुख्य साधन आहे.

अशातच ज्या देशांकडे तेलाचा साठा जास्त आहे त्या देशांचा बराच फायदा होईल. मात्र प्रत्यक्षात असं नाही कारण कच्च्या तेलामुळे देशाकडे पैसा येतोच असं नाही.

व्हेनेझुएलाकडे तेलाचे सगळ्यात जास्त साठे आहेत. अमेरिकेची गुप्तचर संस्था CIA नुसार देशात 30,230 कोटी बॅरल तेल आहे.

दुसऱ्या क्रमांकावर सौदी अरेबियाचा क्रमांक लागतो.त्यांच्याकडे 26,620 कोटी बॅरल तेलाचा साठा आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर सध्या या देशाला अनेक निर्बंधांचा सामना करावा लागत आहे.

कॅनडा तिसऱ्या क्रमांकावर आहे. तिथे अंदाजे 17,050 कोटी बॅरल कच्चं तेल आहे.

या यादीत भारत 23 व्या क्रमांकावर आहे. भारताकडे 449.5 कोटी बॅरल कच्चं तेल आहे.

व्हेनेझुएलाकडे सगळ्यात जास्त प्रमाणात कच्च्या तेलाचे साठे आहेत. या देशाचं 96 टक्के उत्पन्न कच्च्या तेलावर अवलंबून आहे. अमेरिकेने लादलेल्या निर्बंधामुळे व्हेनेझुएलाला आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाची निर्यात करता येत नाही.

या देशात गंभीर राजकीय संकट आहे. देशाची आरोग्य व्यवस्था कोलमडून गेली आहे. खाद्यपदार्थांसकट जीवनावश्यक वस्तुंचा तुटवडा आहे. वीज गेल्यामुळे देशावर ब्लॅक आऊटचं संकटही घोंघावतं आहे.

त्यातच व्हेनेझुएलामध्ये समुद्राची स्थिती अशी आहे की तिथे समुद्रातून तेल काढणंही कठीण आहे.

कॅनडाची स्थितीही तशीच आहे. इथलंही तेल व्हेनेझुएलासारखंच जड आहे. ते काढण्याचा खर्चही जास्त आहे.

ब्राझीलमध्येही तेलावर बराच कर लावण्यात आला आहे. त्यामुळे तिथे तेलाचं उत्पादन कमी होतं.

एक अंदाजानुसार एक बॅरल तेल काढण्यासाठी सौदी अरेबियात जितका खर्च होतो त्याच्या चारपट खर्च ब्राझील आणि व्हेनेझुएलात येतो.

ओपेकच्या आकडेवारीनुसार सौदी अरेबियात एक बॅरल कच्चं तेल काढण्यासाठी 9 डॉलर खर्च होतो. तर व्हेनेझुएलाला त्यासाठी 27.62 अमेरिकन डॉलर आणि ब्राझीलमध्ये त्यासाठी 34.99 अमेरिकन डॉलर इतका खर्च आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)