You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
NASA : 'भारताच्या मिशन शक्तीमुळे अंतराळातला कचरा वाढला'
भारताने 27 मार्च रोजी लोअर अर्थ ऑरबिटमध्ये अॅंटी सॅटेलाइट मिसाइल चाचणी केली. त्यानंतर भारत हा अंतराळ महाशक्ती बनला आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषित केलं.
या घोषणेनंतर भारतीय वैज्ञानिकांचं भरभरून अभिनंदन देखील झालं. पण भारताच्या या पावलानंतर अंतराळातला कचरा वाढला आहे, असा आरोप अमेरिकेच्या नॅशनल अॅरोनॉटिक्स अॅंड स्पेस ऑर्गनायजेशनने (NASA) केला आहे.
भारताने 'महाभयंकर' कृत्य केलं आहे, अशा शब्दांत NASAने भारताच्या या कृतीचं वर्णन केलं आहे. भारताच्या चाचणीमुळे आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशन (ISS)ला धोका निर्माण होऊ शकतो, अशी भीती NASAचे प्रमुख जिम ब्राइडनस्टाइन यांनी व्यक्त केली आहे.
'भारताच्या चाचणीनंतर अंतराळात कचरा निर्माण झाला आहे आणि गेल्या दहा दिवसात अंतराळातील कचरा ISSला धडकण्याची शक्यता शक्यता 44 टक्क्यांनी वाढली आहे,' असं NASAने म्हटलं आहे.
असं असलं तरी ISS सुरक्षित असल्याचं देखील त्यांनी स्पष्ट केलं आहे. 'गरज पडल्यास हा कचरा आम्ही दुसऱ्या ठिकाणी हलवू,' असं ब्राइडनस्टाइन सांगतात.
27 मार्च रोजी पंतप्रधान मोदी यांनी मिशन शक्ती यशस्वी झाल्याची घोषणा केली. 27 मार्च रोजी त्यांनी टीव्हीवर दिलेल्या संदेशात सांगितलं की भारत हा अंतराळ महाशक्ती बनला आहे.
आतापर्यंत अॅंटी सॅटेलाइट मिसाइलची चाचणी फक्त तीन देशांनी यशस्वीरीत्या केली आहे. अमेरिका, रशिया आणि चीननंतर भारताने ही चाचणी केली आहे.
भारताच्या या पावलावर नासाने कठोर शब्दांत टीका केली आहे. नासाचे प्रमुख सांगतात की अंतराळात किती कचरा झाला आहे याचा आढावा NASAने घेतला आहे.
अंतराळाच्या कक्षेत किमान 400 तुकडे आहेत आणि 10 सेमीपेक्षा अधिक व्यास असलेले 60 तुकडे शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे. या तुकड्यांपैकी 24 असे तुकडे आहेत की त्यामुळे ISS ला धोका निर्माण होऊ शकतो.
"ISSच्या वर किंवा जवळ एखादी चाचणी घडवून अंतराळात कचरा करणं हे महाभयंकर कृत्य आहे. अशा प्रकारच्या कृत्यामुळे, मानवाने जी अंतराळाच्या क्षेत्रात प्रगती केली आहे तिला खीळ बसू शकते," असं मत नासाच्या प्रमुखांनी मांडलं.
भारताने चाचणी केल्यानंतर अमेरिकेचे संरक्षण मंत्री पॅट्रिक शानाहन यांनी या कृतीची दखल घेतली होती. या कृतीमुळे अंतराळात सावळागोंधळ वाढू शकतो, अशी भीती त्यांनी व्यक्त केली होती. भारताच्या कृतीचा नेमका परिणाम काय होईल याचा अभ्यास आम्ही करत आहोत, असं वक्तव्य त्यांनी केलं होतं.
भारताने चाचणी 300 किमी अंतरावर केली आहे. त्यामुळे ISSला धोका निर्माण होणार नाही असं भारतीय वैज्ञानिकांना वाटतं. "ही चाचणी आम्ही मुद्दामहूनच लोअर अर्थ ऑरबिटमध्ये केली. हा कचरा काही काळातच नामशेष होऊन जाईल," असं भारताच्या डिफेन्स अॅंड डेव्हलपमेंट ऑर्गनायजेशनचे (DRDO) प्रमुख जी. सतिश रेड्डी यांनी म्हटलं आहे.
रेड्डी यांच्या मताशी ब्राइडनस्टाइनही सहमत आहेत ते सांगतात की "हे एक बरं झालं की हा कचरा लोअर अर्थ ऑर्बिटमध्ये आहे आणि काही काळानंतर तो संपुष्टात येईल, पण त्यासाठी आपल्याला काही काळ वाट पाहावी लागणार आहे."
चीनने या प्रकारची चाचणी 2007मध्ये केली होती. त्यानंतर जो कचरा तयार झाला होता तो अद्यापही अंतराळातच आहे, असं ब्राइडनस्टाइन सांगतात.
अंतराळात असलेल्या कचऱ्याच्या मागावर अमेरिकन लष्कर आहे. अंतराळात 10,000 तुकडे आहेत त्यांच्या मागावर अमेरिकन लष्कर आहे. या कचऱ्यापैकी किमान एकतृतीयांश कचरा हा चीनच्या चाचणीने तयार झाला असावा, असं म्हटलं जातं.
अंतराळात देखील शस्त्रास्त्र स्पर्धा निर्माण झाली आहे आणि ही धोक्याची घंटा आहे, असं निशस्त्रीकरणाच्या समर्थकांना वाटतं.
ASAT तंत्रज्ञानामुळे भारताकडे अंतराळातला उपग्रह पाडण्याची क्षमता निर्माण झाली आहे आणि संघर्षाच्या काळात भारत या तंत्रज्ञानाचा वापर शत्रूचा सॅटेलाइट पाडण्यासाठी करू शकतो अशी भीती व्यक्त केली जात आहे. या चाचणीमुळे भारत आणि चीनमध्ये तणावाची स्थिती निर्माण होऊ शकते, असं देखील म्हटलं जात आहे.
मोदींच्या घोषणेनंतर विरोधकांनी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. पंतप्रधानांनी ही घोषणा निवडणूक डोळ्यासमोर ठेऊनच केली आहे असा आरोप विरोधकांनी केला आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)