You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
Mission Shakti : लोअर अर्थ ऑर्बिट म्हणजे नेमकं काय, भारत खरंच अंतराळ महाशक्ती बनला आहे?
- Author, टीम बीबीसी
- Role, नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत अंतराळ विश्वात महाशक्ती बनला आहे, असं म्हटलं आहे. अमेरिका, चीन आणि रशियानंतर भारतही अंतराळ विश्वात महाशक्ती बनला आहे, असं त्यांनी म्हटलंय.
भारतानं 'मिशन शक्ती'च्या अंतर्गत लो अर्थ ऑर्बिटमध्ये भारतानं एक लाईव्ह सॅटेलाईट नष्ट केलं आहे. ही एक नियोजित मोहीम होती. हे मिशन केवळ तीन मिनिटात पार पाडल्याचंही मोदींनी देशाला सांगितलं.
विज्ञान विषयाचे पत्रकार पल्लव बागला सांगतात, "काही दिवसांपूर्वी इस्रोनं 'मायक्रो सॅट-आर' या सॅटेलाईटला लो-अर्थ ऑर्बिटमध्ये लाँच केलं होतं. 24 जानेवारी 2019ला हे सॅटेलाईट लाँच करण्यात आलं होतं. इस्रोचे अध्यक्ष डॉ. के. सिवन यांनी सांगितलं होतं की, हे सॅलेटाईट डीआरडीओसाठी सोडण्यात आलं आहे."
277 किलोमीटर उंचीवर हे सॅटेलाईट सोडण्यात आलं होतं आणि इतक्या कमी उंचीवर यापूर्वी भारतानं सॅटेलाईट लाँच केलं नव्हतं.
याच सॅटेलाईटविरोधात भारतानं बुधवारी परीक्षण केलं होतं. असं परराष्ट्र मंत्रालायानं जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे.
भारतानं पहिलं अँटी सॅटेलाईट परीक्षण ओडिशातून केलं आहे, असं सांगितलं जात आहे.
यातून भारताला काय मिळणार?
बागला यांच्या मते, "चीननं जेव्हा या प्रकारच्या सॅटेलाईटचं परीक्षण केलं तेव्हा जगभरातल्या देशांनी यावर टीका केली होती. या परीक्षणामुळे अंतराळातील कचऱ्याचं प्रमाण वाढतं आणि मग यामुळे धोका निर्माण होतो."
यामुळे भारत अंतराळात महासत्ता बनला आहे का, यावर बागला सांगतात, "एखाद्या शत्रू राष्ट्राचं सॅटेलाईट आपल्या देशावर नजर ठेवेल, तेव्हा आपण त्याला उद्ध्वस्त करू शकू, यातून आपली अंतराळातील शक्ती वाढली आहे, असं आपण म्हणू शकतो."
"असं असलं तरी याच्या वापराची संधी क्वचितच येते. कोणत्याही देशानं युद्धकाळात या सॅटेलाईटचा वापर केल्याचं एकही उदाहरण आजवर समोर आलेलं नाही," ते पुढे सांगतात.
असं असलं तरी, युद्धकाळात गरज पडल्यास भारत याचा वापर करू शकतो. पण या ऑर्बिटमध्ये पाकिस्तानचा एकही सॅटेलाईट नाही.
DRDOचे निवृत्त अधिकारी W. सेल्वामुर्ती यांच्या मते, "सध्या देशाला कोणत्याही राष्ट्राकडून सुरक्षेविषयी धोका नाहीये. पण, आजच्या उपलब्धतेमुळे भारताची बाजू मजबूत झाली आहे. याचा अर्थ अंतराळातील धोक्यांपासून भारत स्वत:चा बचाव करू शकेल. एखाद्या देशानं भारतीय अंतराळात हल्ला घडवून आणण्याचा प्रयत्न केला, तर भारत त्याला तितक्याच ताकदीनं प्रत्युत्तर देईल, असा यातून मेसेज जाईल." बीबीसी तामिळचे प्रतिनिधी बाल सुब्रह्मण्याम यांनी सेल्वामुर्ती यांच्याशी फोनवरून चर्चा केली.
ते पुढे म्हणाले, "बुधवारचं परीक्षण यशस्वी ठरलं आहे. हे मिसाईल सॅटेलाईट जमिनीवरून मारा करू शकतं आणि ते शत्रूच्या कोणत्याही उपग्रहाला टार्गेट करू शकेल. यासाठी फक्त टार्गेट आणि मिसाईलचा वेग मॅच करावा लागेल."
'अर्थ ऑर्बिट' किती प्रकारचे असतात?
वैज्ञानिक प्रत्येक मोहीमेसाठी वेगवेगळे अर्थ ऑर्बिट वापरतात. ज्या सॅटेलाईटला एका दिवसात पृथ्वीभोवती 4 प्रदक्षिणा घालायच्या असतात, त्याला पृथ्वीशेजारील ऑर्बिटमध्ये लाँच केलं जातं.
दोन प्रदक्षिणा घालण्यासाठी अंतर वाढवावं लागतं, एक प्रदक्षिणा घालायची असल्यास अंतर अधिक वाढवावं लागतं.
अर्थ ऑर्बिटचे दोन प्रकार असतात -
1. सर्क्युलर ऑर्बिट
2. इलिप्टिकल ऑर्बिट
सर्क्युलर ऑर्बिटचं विभाजन तीन भागांमध्ये केलं जातं. लोअर अर्थ ऑर्बिट, मीडियम अर्थ ऑर्बिट आणि जियोसिंक्रोनस ऑर्बिट.
लोअर अर्थ ऑर्बिटचा परिघ 160 किमी ते 2,000 किमी इतका असतो. यामध्ये लॉँच करण्यात आलेलं सॅटेलाईट दिवसातून पृथ्वीभोवती तीन ते चार प्रदक्षिणा घालू शकतं.
या ऑर्बिटमध्ये हवामानाविषयी माहिती देणारे सॅटेलाईट, इंटरनॅशनल स्पेस स्टेशन यांचा समावेश असतो. याशिवाय देखरेख ठेवणाऱ्या सॅटेलाईटचाही समावेश होतो.
मीडियम अर्थ ऑर्बिटचा परिघ 2,000 किमी ते 36,000 किमी इतका असतो. यामध्ये लाँच करण्यात आलेलं सॅटेलाईट दिवसातून पृथ्वीभोवती दोन प्रदक्षिणा घालू शकतं. 12 तासांमध्ये हा सॅटेलाईट एक प्रदक्षिणा घालतो.
जियोसिंक्रोनस ऑर्बिटचा परिघ 36,000 किमीच्या पुढे सुरू होतो. या ऑर्बिटमधील सॅटेलाईट एका दिवसात पृथ्वीभोवती एक प्रदक्षिणा घालतात. कम्युनिकेशन सॅटेलाईटचा यात समावेश होतो.
पृथ्वीवर का नाही पडला सॅटेलाईट?
लाईव्ह सॅटेलाईटला भारतानं उद्ध्वस्त केलं असेल तर तो जमिनीवर का नाही पडला, असा प्रश्न यानिमित्तानं उपस्थित होतो.
खरंतर हे जमिनीच्या गुरुत्वाकर्षणामुळे होतं. पृथ्वीपासून ठरावीक अंतरानंतर गुरुत्वाकर्षाचा परिणाम समाप्त होतो. आणि मग सॅटेलाईटचे तुकडे आकाशात विखुरले जातात.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)