You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
काँडम वापराला पर्याय म्हणून आता पुरुषांसाठीही महिलांसारखंच गर्भनिरोधक गोळ्या येणार?
- Author, मिशेल रॉबर्ट
- Role, आरोग्य प्रतिनिधी, बीबीसी न्यूज ऑनलाइन
गर्भनिरोधक गोळ्या या महिलांसाठीच असल्याचं आपल्याला माहिती आहे. मात्र आता पुरुषांसाठीदेखील अशा गोळ्या येऊ घातल्या आहेत. याविषयी घेण्यात आलेल्या एका महत्त्वाच्या वैद्यकीय परिषदेत तज्ज्ञांनी या गोळ्यांची आरोग्यासाठी सुरक्षिततेच्या दृष्टीने प्राथमिक चाचणी घेतल्याचं सांगितलं.
या गोळ्यांमध्ये शुक्राणूंची निर्मिती होण्यापासून रोखणारी संप्रेरकं (हॉर्मोन्स) आहेत. प्रजोत्पादन रोखण्यासाठी पुरुषांना नसबंदी किंवा व्हॅसेक्टोमीसारखी छोटी शस्त्रक्रिया किंवा कॉन्डमचा वापर करावा लागतो. ही गोळी या सर्व उपायांना उत्तम पर्याय ठरू शकेल.
मात्र या गोळ्या बाजारात येण्यासाठी आणखी दशकभराचा काळ लागेल, असं एन्डोक्राईन सोसायटीच्या वार्षिक सभेत डॉक्टरांनी सांगितलं.
कामेच्छा
गर्भनिरोधक गोळ्या जवळपास 50 वर्षांपूर्वी सर्वप्रथम ब्रिटनच्या बाजारात आल्या. मग पुरुषांसाठी अशी संतती प्रतिबंध करणारी गोळी तयार करायला इतकी वर्षं का लागली?
काही जणांच्या मते पुरुषांसाठी अशी एखादी गोळी आणण्याची समाजाची मानसिकता नाही. त्यामुळे तशी व्यावसायिक गरजही भासली नाही. मात्र यासंदर्भात घेण्यात आलेल्या ओपिनियन पोलमध्ये अनेक पुरुषांनी अशी गोळी बाजारात आली तर नक्कीच घ्यायला आवडेल, असं मत नोंदवलं आहे.
मात्र पुरुष खरंच ही गोळी घेत आहेत, यावर स्त्रिया विश्वास ठेवणार की नाही, हा भाग वेगळा.
याविषयी 2011 साली अँग्लिया रस्कीन विद्यापीठाने ब्रिटनमध्ये एक सर्व्हे केला होता. त्यात 134 पैकी 70 स्त्रियांना आपला जोडीदार गोळी घ्यायलाच विसरेल, अशी काळजी वाटते.
मात्र अशा गोळीचा पुरुषाच्या कामेच्छेवर किंवा लैंगिक क्षमतेवर परिणाम व्हायला नको, हे संशोधनातील सर्वांत मोठं आव्हान आहे.
शुक्राणू निर्मिती
सामान्यपणे पुरुषाच्या शरीरात संप्रेरकांच्या प्रेरणेने अंडकोषात सातत्याने शुक्राणूंच्या पेशी तयार होत असतात. त्यामुळे संशोधनातील मुख्य मुद्दा म्हणजे शुक्राणू निर्मिती करणाऱ्या या संप्रेरकांची पातळी शरीरावर कुठलाही साईड इफेक्ट होणार नाही, इतकी कमी करणं. संप्रेरकांची पातळी कमी झाल्यास शुक्राणूंमध्ये प्रजननाची क्षमताच राहणार नाही.
'मेल पिल'ने हे उद्दिष्ट गाठायला हवं, अशी LA बायोमेड आणि वॉशिंग्टन विद्यापीठातील संशोधकांची आशा आहे.
40 जणांवर पहिला प्रयोग करण्यात आला. हा प्रयोग आशादायी ठरल्याचं संशोधकांनी ऑरलिन्सच्या एन्डोक्राईन 2019च्या परिषदेत सांगितलं.
28 दिवस सुरू होतं निरीक्षण
- 10 जणांना प्लासेबो देण्यात आल्या. (रुग्णाला कुठलंही औषध न देता औषधाच्या नावाखाली साधी गोळी खायला देतात. मात्र रुग्णाला ते माहिती नसते. ही गोळी घेतल्यावर आपल्याला बरं वाटेल, केवळ या श्रद्धेने बरेचदा रुग्ण बरे होतात. अशा गोळ्यांना प्लासेबो म्हणतात.)
- 30 जणांना पुरुषांसाठीच्या संतती प्रतिबंध करणाऱ्या गोळ्या 11-beta-MNTDC देण्यात आल्या.
अँड्रोजेन असलेल्या गोळ्या ज्यांनी घेतल्या त्यांच्या अंडाशयातील संप्रेरकांची पातळी शुक्राणू निर्मिती करण्यास असमर्थ ठरेल, इतकी घसरली आणि चाचणीनंतर संप्रेरकांची पातळी पुन्हा वाढली.
या प्रयोगाचे साईड इफेक्ट झाले. मात्र खूप कमी आणि सौम्य.
पाच पुरुषांनी कामेच्छा किंचीत कमी झाल्याचं सांगितलं तर दोघांनी वीर्यपतनात अडचण आल्याचं सांगितलं. मात्र सेक्शुअल अॅक्टिव्हिटीत कुठलीच बाधा आली नाही. साईड इफेक्टमुळे कुणीही गोळ्या घेणं थांबवलं नाही आणि ही पहिली चाचणी यशस्वी झाली.
गोळ्यांवर संशोधन करणाऱ्या प्रा. क्रिस्टीना वँग आणि त्यांचे सहकारी संशोधनाबाबत उत्सुक असले तरी सावधही आहेत. त्या सांगतात, "चाचणीच्या परिणामांवरून एक बाब लक्षात आली ती म्हणजे दोन हॉर्मोनल अॅक्टिव्हिटीचे मिश्रण असलेल्या या गोळ्यांमुळे कामेच्छेमध्ये काहीही फरक पडत नसला तरी त्यामुळे शुक्राणुंची निर्मिती कमी होते."
मात्र या गोळ्यांवर आणखी मोठ्या प्रमाणावर आणि दीर्घकाळासाठी प्रयोग होण्याची गरज असल्याचं त्या सुचवतात.
बॉडी जेल
प्रा. वँग पुरुषांसाठीच्या केवळ संप्रेरकाधारित संतती नियमन गोळ्यांवर संशोधन करत आहेत, असं नाही. त्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी एक बॉडी जेलही तयार केलं आहे. ब्रिटनमध्ये या जेलवरदेखील आंतरराष्ट्रीय चाचणी होणार आहे.
ही जेल पुरुषांच्या पाठीवर आणि खांद्यावर लावण्यात येते. तिथे त्वचेतून ही जेल शरीरात शोषली जाते. या जेलमधील प्रोजेस्टीन हॉर्मोन अंडाशयातील नैसर्गिकरीत्या तयार होणाऱ्या टेस्टोस्टेरॉनची निर्मिती थांबवते. यामुळे शुक्राणूंची खूप कमी निर्मिती होते.
दुसरीकडे या जेलमधील टेस्टोस्टेरॉन कामभावना आणि इतर कार्य सुरू ठेवते.
दरम्यान, वॉशिंग्टन स्कूल ऑफ मेडिसीनचे प्रा. वँग, डॉ. स्टेफनी पेज आणि त्यांचे सहकारी DMAU नावाच्या एका वेगळ्या कम्पाउंडवरही अभ्यास करत आहेत. याचा देखील पुरुष संतती प्रतिबंधक उपाय म्हणून वापर करू शकतील का, यावर सध्या संशोधन सुरू आहे.
या गोळीचीही 100 जणांवर चाचणी घेण्यात आली. या गोळ्यांवर पुढच्या टप्प्याची चाचणी होऊ शकते, असं या चाचणीच्या परिणामांमधून दिसून आलं.
मनोविकार (मूड डिसॉर्डर)
काही वैज्ञानिक अशा संप्रेरकांवर संशोधन करत आहेत ज्यांचे परिणाम दीर्घकालीन असतील. महिन्याला एक इंजेक्शन घेऊन पुरुषांमध्ये संतती प्रतिबंध करता येईल का, याचा ते अभ्यास करत आहेत.
या इंजेक्शनवरही पहिल्या टप्प्यातील चाचणी घेण्यात आली. मात्र काही पुरुषांनी मूड स्विंग किंवा नैराश्याची तक्रार केल्यानंतर दुसऱ्या टप्प्याच्या प्रयोगासाठी नाव नोंदणी थांबवण्यात आली आहे.
जे पुरुष संतती प्रतिबंधासाठी कुठल्याही प्रकारचे (गोळ्या किंवा इंजेक्शन) संप्रेरके घेण्यासाठी उत्सुक नाहीत, अशांसाठी शुक्राणू लिंगातून बाहेर येणारच नाही, यासाठी दुसरा कुठला पर्याय असू शकतो का, यावरही संशोधन सुरू आहे. शस्त्रक्रियेविना करण्यात येणारी वेस्केटोमीचा पर्यायही तपासला जात आहे.
असाच एक पर्याय म्हणजे 'व्हेसलजेल'. हे एक पॉलीमर मटेरियल आहे. हे मटेरियल डाव्या आणि उजव्या अंडकोशातून ज्या दोन नलिकांद्वारे शुक्राणू लिंगामध्ये सोडले जातात, त्या नलिका बंद करते. या व्हेसलजेलवरदेखील संशोधन सुरू आहे. हे व्हेसलजेल संतती नियमनासाठी संप्रेरकविरहीत, दीर्घकालीन उपाय ठरू शकते. शिवाय, गरज असेल तेव्हा प्रजनन क्षमता पूर्वीसारखी नॉर्मल होऊ शकतं.
सध्या प्राण्यांवरच या व्हेसलजेलची चाचणी घेण्यात आली असली तरी मानवावरील चाचणीसाठी निधी मिळालेला आहे.
संभाव्य बाजारपेठ
ब्रिटनमध्ये पुरुषांवर संतती प्रतिबंध बॉडी जेलचे प्रयोग करण्यात येणार आहेत. एडिनबर्ग विद्यापीठातील प्रा. रिचर्ड अँडरसन या प्रयोगाचे नेतृत्व करत आहेत.
ते सांगतात, पुरुष आणि महिला दोघंही अशा प्रकारच्या संतती नियमनाच्या नव्या पर्यायासाठी उत्सुक असल्याचं सर्वेक्षणातून आढळूनदेखील औषध निर्मिती क्षेत्र पुरुषांसाठी संतती प्रतिबंध करणाऱ्या औषधावरील संशोधनाबाबत उदासीन आहे.
ते म्हणतात, "मला वाटतं या क्षेत्राला संभाव्य बाजारपेठेविषयी शाश्वती वाटत नाही."
"ही एक मोठी कहाणी आहे आणि निधीचा तुटवडा, हादेखील यातील एक महत्त्वाचा भाग आहे."
औषधनिर्मिती क्षेत्रातून गुंतवणूक होत नसल्याने संशोधकांना चॅरिटेबल ट्रस्ट आणि शैक्षणिक क्षेत्रातून देण्यात येणाऱ्या देणग्यांवर अवलंबून राहावे लागते. या प्रक्रिया वेळखाऊ आहे.
शेफिल्ड विद्यापीठातील अँड्रोलॉजीचे प्राध्यापक अॅलेन पॅसी सांगतात, "पुरुषांसाठी संतती नियमनाच्या गोळ्या किंवा इंजेक्शनावर झालेल्या संशोधनाचा इतिहास फारसा आशादायी नाही. त्यांना फार यश मिळालेले नाही. मात्र नवीन प्रयोग होत आहेत, ही चांगली गोष्ट आहे."
"हे प्रयोग यशस्वी झाले तरच औषध निर्मिती कंपन्या अशाप्रकारचे उत्पादन बाजारात आणण्यात रस दाखवतील."
"दुर्दैवाने आजवर पुरूषांसाठी संतती नियमन करणाऱ्या गोळ्या बाजारात आणण्यात खूपच कमी औषध निर्मिती कंपन्यांनी रस दाखवला आहे. मी पूर्णपणे समजू शकलेलो नसलो तरी यामागे शास्त्रीय कारणांपेक्षा बाजाराच्या गणिताची कारणं अधिक असावी."
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)