युक्रेनच्या निवडणुकीत कॉमेडियन व्होलोड्यमर झेलनस्कीय आघाडीवर

युक्रेनमध्ये राष्ट्राध्यक्षपदासाठीच्या निवडणुकीत कोणताही राजकीय पार्श्वभूमी नसणारा कॉमेडियन आघाडीवर आहे. एक्झिट पोलमध्ये ही बाब स्पष्ट झाली आहे.

व्होलोड्यमर झेलनस्कीय या कॉमेडियनने टीव्हीवरील एका कार्यक्रमात राष्ट्राध्यक्षाची भूमिका निभावली होती. या कलाकाराला 30.4 टक्के मतं मिळाल्याचं एक्झिट पोलमध्ये उघड झालं आहे. विद्यमान राष्ट्राध्यक्ष पेट्रो पोरोशेन्को हे दुसऱ्या क्रमांकावर आहेत. त्यांना 17.8 टक्के मतं आहेत.

या दोघांनी युरोपियन युनियनला धार्जिणी भूमिका घेतली आहे. हे दोघं एकमेकांविरुद्ध पुढच्या महिन्यात उभे ठाकणार आहेत. माजी पंतप्रधान युलिआ टायमोशेन्को यांना 14.2 टक्के मतं मिळाली असल्याने त्यांची निवडून येण्याची कमी आहेत.

सध्याच्या आकडेवारीने मी आनंदी आहे पण ही अंतिम निवडणूक नव्हे असं व्होलोड्यमर यांनी सांगितलं. दुसरं स्थान मिळणं हा कठोर धडा असल्याचं पोरोशेन्को यांनी म्हटलं आहे.

कोण आहेत व्होलोड्यमर झेलनस्कीय?

सर्व्हंट ऑफ द पीपल या उपहासात्मक कार्यक्रमात व्होलोड्यमर एका सामान्य माणसाची भूमिका करतात. हा सामान्य माणूस भ्रष्टाचाराविरोधात लढा देऊन राष्ट्राध्यक्षपदी पोहोचतो.

कोणताही राजकीय वारसा नसणाऱ्या व्होलोड्यमर यांनी निवडणूक प्रचाराची साचेबद्ध पद्धत तोडली आहे. त्यांनी कोणतीही रॅली घेतली नाही. अगदी मोजक्या मुलाखती त्यांनी दिल्या. त्यांची स्वत:ची अशी राजकीय मतंही नाहीत.

सोशल मीडियावर ते खूप सक्रिय आहेत. म्हणूनच युवा मतदार त्यांच्याकडे आकर्षित होण्याची शक्यता आहे.

व्होलोड्यमर रशियन आणि युक्रेनियन अशा दोन्ही भाषा बोलतात. भाषाहक्क हा युक्रेनमध्ये संवेदनशील मुद्दा आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)