You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
सौदी अरामको: तेल प्रकल्पांवरील ड्रोन हल्ल्यांमुळे पेट्रोल डिझेल महागणार?
सौदी अरेबियाची सरकारी खनिज तेल उत्पादक कंपनी सौदी अरामकोच्या दोन मोठ्या केंद्रांवर ड्रोनद्वारे हल्ला करण्यात आला. अबकायक आणि खुरैस या ठिकाणी झालेल्या हल्ल्यांमुळे जागतिक तेल उत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे. पण यामुळे भारतात पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढणार का?
सौदीचे ऊर्जा मंत्री प्रिन्स अब्दुल अजीज बिन सलमान यांनी या हल्ल्यामुळे अरामकोचं तेल उत्पादन निम्म्यानं कमी झाल्याचं सांगितलं.
57 लाख बॅरल कच्च्या तेलाच्या उत्पादनावर या हल्ल्यामुळे परिणाम झाला आहे. ऑगस्टमध्ये ओपेकने जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार सौदी अरेबियाद्वारे दररोज 98 लाख बॅरल कच्च्या तेलाचं उत्पादन केलं जातं.
अरामको कंपनीच्या तळांवर झालेल्या हल्ल्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारातील तेलाच्या किमतींवर परिणाम होऊ शकतो.
'ऑईलप्राईज'ने दिलेल्या वृत्तानुसार, हल्ल्यामुळे झालेलं नुकसान भरून काढत काम सुरळीत करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत, असं अरामको कंपनीने स्पष्ट केलं. मात्र तसं झालं नाही तर आंतरराष्ट्रीय बाजारात 15 कोटी बॅरल तेलाची कमतरता जाणवू शकते. यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किमती वाढू शकतात.
जगाला होणाऱ्या तेल पुरवठ्यापैकी पाच टक्के विक्रीला याचा फटका बसू शकतो.
भारतात पेट्रोल-डिझेल महागणार?
दरम्यान, या हल्ल्यांनंतर अचानक वाढलेल्या तेल किमतींमुळे भारत सरकारची डोकेदुखी वाढू शकते, असं बीबीसी व्यापार प्रतिनिधी जगदीप चिमा सांगतात. "भारताच्या एकूण कच्च्या तेल आयातीपैकी 17 टक्के तेल हे सौदीतून येतं. पण त्यामुळे आता लगेच पेट्रोल पंपांवर मोठ्या रांगा लागतील, अशी शक्यता कमी आहे. कारण कच्च्या तेलाचे साठे साधारणतः पुढचे 87 दिवसांसाठी पुरेसे असतात. पण कच्च्या तेलाच्या किमती 70 डॉलर प्रति बॅरलच्या आसपास असल्याने भविष्यात किमती वाढूही शकतात."
मात्र या हल्ल्यामुळे भारताला होणाऱ्या तेलपुरवठ्यात कुठलाही व्यत्यय येणार नाही, असं केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सांगितलं. "भारताचे रियाध येथील राजदूत सौदी अरामकोच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहेत. आम्ही आमच्या सर्व ऑईल कंपन्यांबरोबर चर्चा करून सप्टेंबरसाठी कच्च्या तेलाचा साठा तपासला आहे. त्यामुळे भारताला होणाऱ्या तेलपुरवठ्यात कुठलाही व्यत्यय येणार नाही. आम्ही परिस्थितीवर नजर ठेवून आहोत."
भारत नेहमीच 80 टक्क्यांपेक्षा जास्त तेल आयात करतं. गेल्या एप्रिल ते जुलै 2019 या तिमाहीत वापरल्या गेलेल्या तेलापैकी 84.9 टक्के तेल आयात केलेलं होतं, असं केअर रेटिंग्स ही बाजारपेठांचं अभ्यास करणारी संस्था सांगते.
भारत तेलासाठी इराकनंतर सौदी अरेबियावर सर्वांत जास्त अवलंबून आहे. गेल्या आर्थिक वर्षात भारताने सौदीकडून 29.56 कोटी बॅरल कच्चे तेल आयात केलं होतं. सध्या सौदीने भारताला तेलपुरवठ्यात कुठलाही व्यत्यय येणार नसल्याची शाश्वती दिली असली की भारताला पर्याय तपासावे लागतील, असंही केअर रेटिंग्स सांगते.
भारत सध्या इराणकडून होणारा कच्च्या तेलाचा पुरवठा पुन्हा सुरळीत करण्याचा प्रयत्न करत आहे. कारण त्यामुळे देशातील तेल शुद्धीकरण 2.3 टक्क्यांनी कमी झालं होतं, तर देशात पेट्रोलची आयात 298 टक्क्यांनी तर डिझेलची आयात 363.5 टक्क्यांनी वाढली होती, असं केअर रेटिंग्स संस्थेने सांगितलं आहे.
तेल बाजारात अरामकोचा दबदबा
जगातल्या सर्वाधिक तेल उत्पादक कंपन्यांमध्ये अरामको हे नाव अग्रणी आहे. तेलाची सर्वाधिक निर्यात याच कंपनीकडून केली जाते.
ब्लूमबर्गने दिलेल्या बातमीनुसार, 2018 मध्ये अरामकोनं 111 अब्ज डॉलरचा नफा कमावला होता. हा आकडा अॅपल आणि गुगलची मूळ कंपनी असलेल्या अल्फाबेटच्या एकूण वार्षिक नफ्यापेक्षाही अधिक आहे.
फोर्ब्सनुसार 2018 मध्ये जगातल्या सर्वाधिक नफा मिळवणाऱ्या कंपन्यांमध्ये अरामकोचं नाव पहिल्या स्थानी आहे. 2017 मध्ये अरामकोने 100 अब्ज डॉलर एवढी रक्कम कर म्हणून भरली होती.
जगाला लागणाऱ्या तेलाच्या गरजेपैकी एक टक्के तेल खुरैस या केंद्रातून वितरित केलं जातं. अबकायक या ठिकाणी कच्च्या तेलाची रिफायनरी आहे. जगाला पुरवण्यात येणाऱ्या 7 टक्के तेलावर प्रक्रिया करण्याचं काम अबकायक केंद्रात होतं, असं बीबीसीच्या व्यापार प्रतिनिधी कॅटी प्रेसकॉट यांनी सांगितलं.
आंतरराष्ट्रीय बाजारात विक्रीसाठी येणाऱ्या तेलापैकी 10 टक्के तेल सौदी अरेबियामधून येतं. सौदीतच तेल उत्पादन कमी झालं तर तेलाच्या किमती वाढू शकतात, असं त्यांनी सांगितलं.
तेलाच्या किमतींवर देखरेख ठेवणाऱ्या मॉर्निंगस्टार कंपनीचे संचालक सँडी फील्डन यांनी सांगितलं की आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किमती 30 टक्क्यांपर्यंत वाढू शकतात. मात्र सर्वसामान्यांना याचा बोजा आता लगेच सहन करावा लागणार नाही. आठवडाभरानंतर याची झळ पोहोचू शकते, असा इशारा त्यांनी दिला.
अरामकोच्या IPOवर परिणाम?
20 निखर्व डॉलर एवढं प्रचंड मूल्यांकन असणारी अरामको 2020-21 पर्यंत सौदी शेअर मार्केटमध्ये आपले शेअर्स विक्रीस आणणार होती. यासाठी बँकांशी चर्चा सुरू होती. यानंतर आंतरराष्ट्रीय बाजारातही IPO आणण्याच्या हालचाली सुरू होत्या.
अरामकोचा पाच टक्के हिस्सा बाजारात आणायची इच्छा आहे, असं सौदी प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी 2016मध्ये म्हटलं होतं. कंपनीला कमीत कमी 100 अरब डॉलर एवढी कमाई होईल, असा विश्वास होता.
या हल्ल्याने अरामको कंपनीचे कच्चे दुवे उघड झाले आहेत. कंपनी शेअर बाजारात उतरत असताना असं होणं घातक आहे. मध्य पूर्वेत तणाव कायम राहिला तर याचा थेट परिणाम तेलाच्या किमतींवर पडणार ही काळजी वाढली, असं कॅटी प्रेसकॉट यांनी सांगितलं.
रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार, 15 सप्टेंबरला मध्यपूर्वेशी निगडीत शेअर बाजार खालच्या किंमतीवर उघडले. दुबई शेअर बाजार 0.5 टक्के, अबुधाबी शेअर बाजार 0.1 टक्के तर कुवेतचा शेअर बाजार 0.4 टक्के इतक्या नीचांकी पातळीवर सुरू झाला.
रॉयटर्सने दिलेल्या बातमीनुसार राईस युनिव्हर्सिटीच्या बेकर इन्स्टिट्यूटचे मध्यपूर्व विषयांचे जाणकार जेम्स क्रेन यांच्या मते, सौदी अरब आणि इराण यांच्यातील प्रॉक्सी वॉरला हे खतपाणी घालणारं आहे. अमेरिकाही यात उतरू शकतं.
येमेन या हल्ल्यासाठी जबाबदार आहे का?
येमेनमध्ये इराणशी संलग्न हौती गटाच्या प्रवक्त्याने या हल्ल्यासाठी 10 ड्रोन पाठवण्यात आल्याचं सांगितलं. भविष्यात सौदीवर असे हल्ले होऊ शकतात, असं येमेन लष्कराचे प्रवक्ते याह्या सारए यांनी सांगितलं.
हौती गटाने सौदीत जाऊन धमाका केला. या हल्ल्यासाठी सौदी सरकारमधल्या प्रतिष्ठित लोकांची मदत झाली असा दावाही त्यांनी केला.
हौती गटाचा हा दावा अमेरिकेने फेटाळला आहे. हा हल्ला इराणने केला असं अमेरिकेन म्हटलं आहे. दरम्यान हा आरोप बिनबुडाचा आहे असं इराणने म्हटलं आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)