You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
भुसावळ हत्याकांड : भाजप नगरसेवकाच्या हत्येमागे राजकीय कारण की जुनं वैमनस्य?
- Author, प्रवीण ठाकरे
- Role, बीबीसी मराठीसाठी
भाजप नगरसेवक रवींद्र खरात यांच्या घरावर झालेल्या हल्ल्यात त्यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाला. गेले 48 तास भुसावळ शहरात तणाव आहे आणि याच घटनेची चर्चा आहे... मात्र दबक्या आवाजात.
भुसावळमधील समता नगर भागात 6 ऑक्टोबरला रात्री दहाच्या सुमारास ही घटना घडली. तीन जण मोटरसायकलवरून खरात यांच्या घराजवळ आले. हाती धारदार शस्त्रं आणि गावठी कट्ट्यांनी त्यांनी दोघांवर हल्ला केला. मग ते पुढे खरात यांच्याकडे गेले.
"हम्प्या उर्फ रवींद्र खरात घराबाहेर बसले असताना त्यांच्यावर चाकूने हल्ला करण्यात आला. ते जीव वाचवण्यासाठी पळत असताना त्यांच्यावर मागून गोळ्या झाडणायत आल्या. यावेळी रवींद्र खरात यांना वाचवण्यासाठी त्यांचे भाऊ सुनील धावून आले. पण आरोपींनी त्यांच्यावरही गोळीबार केला. याच वेळी रवींद्र खरात यांच्या पत्नी मध्ये आल्याने हल्लेखोरांनी त्यांच्यावरही जोरदार प्रहार केला," असं जळगावचे पोलीस अधीक्षक पंजाबराव उगले यांनी सांगितलं.
या हल्ल्यात रवींद्र खरात, त्यांचे भाऊ सुनील आणि मुलं रोहित व प्रेमसागर तसंच सुमित गाजरे यांची हत्या करण्यात आली. रवींद्र खरात यांची पत्नी रजनी खरात, दुसरा मुलगा हितेश आणि अन्य एक जण गंभीर जखमी झाले आहेत.
या प्रकरणी पोलिसांनी तीन जणांना ताब्यात घेतले असून त्यातील दोन जण जखमी आहेत.
रवींद्र खरात आरपीआयचे जिल्हाध्यक्ष होते. 2016 मध्ये त्यांनी भाजप-आरपीआय युती असताना भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढविली आणि नगरसेवक झाले. त्यामुळे ऐन निवडणुकांच्या तोंडावर झालेल्या त्यांच्या हत्येमुळे चर्चांना उधाण आलं आहे.
मात्र हा सर्व प्रकार जुन्या वैमानस्यातून घडला असून आरोपी आणि पीडित यांच्यात वैयक्तिक हेवेदावे होते, त्यामुळेच आरोपींनी पीडितांची हत्या केली आहे, असं प्राथमिक तपासात निष्पन्न झाल्याचं पोलिसांनी सांगितलं.
नेमका काय प्रकार घडला?
रवींद्र खरात यांची पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरूपाची होती. त्यांच्याविरुद्ध काही गुन्हे दाखल तर होतेच, शिवाय तडीपारीचा प्रस्तावही होता. त्यांच्या मुलाविरोधातही तडीपारीची कारवाई सुरू होती.
या प्रकरणात पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे. "तिघे आरोपी 10-12 पर्यंत शिकलेले आहेत. यापैकी दोघंजण वेल्डिंगचं काम करतात, तर तिसरा आरोपी आपल्या वडिलांना केटरिंग व्यवसायात मदत करतो. हत्याकांडातील हत्यारे जप्त करण्यात आली असून पुढील तपास चालू आहे," असं उगले यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं. आरोपींची यापूर्वीची गुन्हेगारी पार्श्वभूमी सध्या तरी समोर आलेली नाही, असं उगले यांनी स्पष्ट केलं.
घटनास्थळावरील एका साक्षीदाराने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितलं की आरोपी सर्वांना ठार करायच्या उद्देशानेच आलेले दिसत होते. "त्यांनी सरळ वार केले. जे मध्ये आले त्यांच्यावरही वार केले आणि गोळ्या झाडल्या. रवींद्र आणि मुलांनी पळायच्या प्रयत्न केला, पण ते अयशस्वी ठरले. रवींद्र यांच्या घरापासून पुढे असलेल्या रेल्वे हॉस्पिटलजवळ मोटरसायकलवर पाठलाग करत आरोपींनी गोळ्या घातल्या," असं या साक्षीदाराने सांगितलं.
ज्येष्ठ पत्रकार शेखर पाटील यांनी या प्रकरणाची पार्श्वभूमी सांगताना म्हटलं, "भुसावळमधील रेल्वेच्या मोकळया जागेत समतानगरचा काही भाग वसला आहे. काही दिवसांपूर्वी रेल्वेने येथील अंदाजे 16 हजार अतिक्रमण धारकांना हटवलं होतं. पण रवींद्र खरात यांचं घर आणि त्याभोवतालची वस्ती शाबूत होती.
"ही दाट वस्ती असती किंवा सर्वच समतानगर हटवले असते तर असा हल्ला करण्यासाठी आरोपी धजावले नसते. त्यामुळे या हत्याकांडाला राजकीय अथवा सामाजिक दृष्टीने बघता येणार नाही. दोन गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींमधील वादाचे पर्यवसन इतक्या भीषण हत्याकांडात झालेलं आहे," असं शेखर पाटील यांनी सांगितलं.
"ही घटना माणुसकीला कलंक लावणारी आहे," असं रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी म्हटलं.
"रवींद्रची गन्हेगारी पार्श्वभूमी असली, त्याच्यावर काही केसेस असल्या तरी आम्ही त्याला पक्षात घेताना ताकीद दिली होती, की त्याने आपल्या जीवनामध्ये बदल करणं आवश्यक आहे. त्यामुळेच तो पक्षात असल्यापासून त्याच्यावर नवीन केसेस नव्हत्या," असं आठवलेंनी माध्यमांशी बोलताना सांगितलं.
खरात कुटुंबीयांच्या वतीने या घटनेवर कुणीही प्रतिक्रिया देण्याच्या मानसिकतेत नव्हते. मात्र टाइम्स ऑफ इंडियाच्या एका बातमीनुसार हे खून दीड वर्षांपूर्वी झालेल्या एका खून प्रकरणामुळे झाले असावे, असा पोलिसांचा अंदाज आहे. मारेकऱ्यांना संशय असावा की रवींद्र यांचा मुलगा प्रेमसागर या खुनामागे आहे, असं पोलिसांनी सांगितलं.
घटनेनंतर भुसावळ शहरातील तणाव पाहता पोलिसांनी अतिरिक्त बंदोबस्त तैनात केला होता. स्वतः पोलीस अधीक्षकांनी घटनेच्या रात्री आणि दुसऱ्या दिवशी (सोमवारी) घटनास्थळी भेट देत तपासाचा आढावा घेतला.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)