देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी यांच्यात गटबाजी नाही: चंद्रशेखर बानवकुळे | विधानसभा निवडणूक

विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची चौथी उमेदवार यादी जाहीर झाल्यानंतर त्यामध्ये ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं नाव नसल्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात होतं. काही जणांनी त्यांच्याऐवजी त्यांच्या पत्नीला उमेदवारी देण्यात येणार असल्याचा अंदाज व्यक्त केला.

यामुळे अर्ज भरायच्या शेवटच्या दिवशी काही वेळ संभ्रमावस्था निर्माण झाली होती. पण अर्ज भरण्याच्या मुदतीपर्यंत बावनकुळे दांपत्यापैकी कोणाचंच नाव जाहीर करण्यात आलं नाही. अखेरीस बावनकुळे यांच्या कामठी मतदारसंघात टेकचंद सावरकर यांना उमेदवारी देण्यात आली.

याबाबत बीबीसीने बावनकुळे यांच्याशी संवाद साधला असता, ते म्हणाले, "पूर्व विदर्भातील उमेदवारांचा प्रचार मी करावा, अशी पक्षाची भूमिका होती, त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. तिकीट मिळालं नाही हे सांगण्यासाठी फोन करण्याची गरज नसते. एखाद्याला तिकीट मिळतं तेव्हा दुसऱ्याला तिकीट मिळत नाही, हे समजून जायचं असतं. नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात कसलीच गटबाजी नाही. आम्ही सगळ्यांनी मिळून काम केलं आहे. असं कधीच मला जाणवलं नाही. त्यांच्यातील वादाच्या चर्चा कपोलकल्पित आहेत."

ज्यांना उमेदवारी मिळाली नाही, त्यांच्याबद्दल पत्रकार परिषदेत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं, की कुणाचं तिकीट कापलं असं म्हणणं योग्य नाही. पक्षात जबाबदाऱ्या बदलत असतात. ज्यांना तिकिटं मिळाली, आता त्यांच्याकडे त्या मतदारसंघांच्या जबाबदाऱ्या असतात.

मुख्यमंत्र्यांच्या या विधानानंतर खडसे, तावडे, बावनकुळे यांच्याविषयी पुन्हा विचारल्यावर फडणवीस यांनी म्हटलं, की काही जण विधानसभेत राहून काम करतात. काही जण बाहेर राहून काम करतात.

त्यानंतर दोन दिवसांनी चंद्रशेखर बावनकुळे यांना दुसरी जबाबदारी देण्यात आली. त्यांची पूर्व विदर्भाच्या प्रचारप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली. आपला प्रदीर्घ अनुभव आणि संघटनकौशल्याच्या बळावर भाजपला भरघोस यश मिळवून देण्यात आपण योगदान द्याल, असं प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यावेळी म्हणाले.

चंद्रशेखर बावनकुळे हे नागपूर जिल्ह्यातील कामठी मतदार संघातून सलग तीन वेळा निवडून आले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बावनकुळेंकडे आधी महत्त्वाचे ऊर्जा खाते दिले. नंतर मंत्रिमंडळ विस्तारात त्यांच्याकडे राज्य अबकारी खातेही सोपविण्यात आले.

चंद्रशेखर बावनकुळे हे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे निकटवर्तीय समजले जातात. पण भाजपच्या पहिल्या तीन उमेदवारांच्या यादीत त्यांचं नाव नसल्यानं आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

मतदारसंघावरून मतभेद?

दरम्यान, चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपूर जिल्ह्यातील कामठी एवजी काटोल मतदार संघातून निवडणूक लढवावी अशी मुख्यमंत्र्यांची इच्छा असल्याचं भाजपच्या गोटातून सांगण्यात येतय. काटोल मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विदर्भातील जेष्ठ नेते अनिल देशमुख रिंगणात आहेत. काटोल मधून देशमुख यांना चंद्रशेखर बावनकुळे यांनी टक्कर द्यावी असे भाजपच्या राज्यातील नेतृत्वाला वाटते.

नागपूर जिल्ह्यातील कामठी विधानसभा मतदार संघातून सलग तीन वेळा निवडून आलेल्या चंद्रशेखर बावनकुळे यांच्या जागी माजी मंत्री सुलेखा कुंभारे यांना भाजप तिकीट देऊ शकते. कुंभारेंच्या नावाची चर्चा सुरु असताना माजी मंत्री आणि बहुजन रिपब्लिकन एकता मंचच्या अध्यक्षा सुलेखा कुंभारे यांनी नागपुरात प्रेस कॉन्फरन्स घेऊन आपण कामठी विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढण्यास तयार नसल्याचं जाहीर केलं आहे.

या सर्व प्रकरणात चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपली कुठलीही भूमिका जाहीर केलेली नाही. पण बावनकुळेंनी कामठी विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढविण्यासाठी पूर्ण तयारी केली आहे. पण तिसऱ्याही यादीत नाव नसल्यानं बावनकुळे यांनी कामठीची आशा सोडल्याच त्यांच्या निकटवर्तीयांचे म्हणणं आहे.

भाजपचे प्रदेश प्रवक्ते गिरिष व्यास यांनी मात्र चंद्रशेखर बावनकुळे 4 ऑक्टोबरला कामठी विधानसभा मतदार संघातून अर्ज भरतील असं स्पष्ट केलं आहे.

गडकरींच्या निकटवर्तीयांचं तिकीट कापलं?

चंद्रशेखर बावनकुळे हे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे निकटवर्तीय असल्याने त्यांचे तिकीट कापले गेले नाही ना, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.

दक्षिण नागपूरचे विद्यमान आमदार सुधाकर कोहळे यांनाही उमेदवारी नाकारण्यात आलीये. भाजपचे शहराध्यक्ष प्रवीण दटके यांना मध्य नागपूर मधून भाजपची उमेदवारी हवी होती पण तिथून विद्यमान आमदार विकास कुंभारे यांना उमेदवारी दिल्याने तेही नाराज आहेत. योगायोग म्हणजे चंद्रशेखर बावनकुळे, प्रवीण दटके आणि सुधाकर कोहळे हे नितिन गडकरी यांचे निकटवर्तीय आहेत.

नागपूर लोकसत्ताचे निवासी संपादक देवेंद्र गावंडे यांनी याबद्दल बोलताना म्हटलं, की कोणताही नेता आपल्या सहकाऱ्याला तिकिट मिळेल यासाठी प्रयत्न करणारच. बावनकुळेंच्या बाबतीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे प्रयत्न करतील यात काही शंका नाही. पण कामठी विेधानसभा मतदार संघातून भाजप चंद्रशेखर बावनकुळे यांनाच उमेदवारी देईल.

चंद्रशेखर बावनकुळे यांना नागपूर जिल्हातील कामठीऐवजी काटोलमधून उमेदवारी देणं शक्य नाही, त्यांना कामठीमधूनच भाजप तिकीट देईल कारण भाजपकडे कामठीत दुसरा कुठलाही तुल्यबळ उमेदवार नाही असेही गावंडे बीबीसी मराठीसोबत बोलताना म्हणाले.

ज्येष्ठ पत्रकार बाळ कुलकर्णी यांच्या मते मात्र भाजप सध्या तरी चंद्रशेखर बावनकुळे यांना कामठी विधानसभा मतदार संघातून उमेदवारी देईल असं वाटत नाही. जर चंद्रशेखर बावनकुळे यांनी काटोल येथील उमेदवारी स्वीकारली नाही तर सध्या तरी त्यांना भाजपमध्ये दुसरी काही जबाबदारी मिळेल असे वाटत नाही.

पण चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर मुख्यमंत्र्यांची नाराजी का याचे कारण एकदा तिकीट फायनल झाले की कळू शकेल असेही बाळ कुलकर्णी यांनी म्हटलं.

कोण आहेत चंद्रशेखर बावनकुळे?

नागपूरच्या कामठी विधानसभा मतदार संघातून तीनवेळा भाजपचे आमदार.

ऑटोरिक्षा चालविण्याचे काम करता करता नागपूरच्या कोराडी येथील महानिर्मितीच्या वीज निर्मिती प्रकल्पातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे नेतृत्व करायला सुरवात केली.

कोराडी येथील वीजनिर्मिती केंद्रातील युनियन लिडर म्हणून ते उदयास आले.

दरम्यान नागपूरचे तत्कालीन पालकमंत्री नितीन गडकरी यांच्या संपर्कात बावनकुळे आले आणि भाजपकडून ते जिल्हा परिषद सदस्य झाले.

पुढे त्यांना आमदारकीचे तिकीट मिळाले आणि ते सलग तीन वेळा आमदार होते.

त्यांना ऊर्जा आणि नंतर अबकारी ही दोन महत्वाची खातीही मिळाली होती.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)