You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
एकनाथ खडसे यांच्या ऐवजी त्यांची मुलगी रोहिणी खडसे यांना उमेदवारी - विधानसभा निवडणूक
ज्येष्ठ भाजप नेते एकनाथ खडसे यांना यावेळी उमेदवारी नाकारण्यात आली आहे. त्यांच्याऐवजी त्यांची मुलगी रोहिणी खडसे यांना तिकीट देण्यात आलं आहे.
याआधी, पक्षाकडून आपल्याला तिकीट मिळण्याची शक्यता नसल्याचं एकनाथ खडसेंनी कार्यकर्त्यांना स्पष्ट केलं होतं.
ज्यांना उमेदवारी मिळाली नाही, त्यांच्याबद्दल पत्रकार परिषदेत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं, की कुणाचं तिकीट कापलं असं म्हणणं योग्य नाही. पक्षात जबाबदाऱ्या बदलत असतात. ज्यांना तिकिटं मिळाली, आता त्यांच्याकडे त्या मतदारसंघांच्या जबाबदाऱ्या असतात.
मुख्यमंत्र्यांच्या या विधानानंतर खडसे, तावडे, बावनकुळे यांच्याविषयी पुन्हा विचारल्यावर फडणवीस यांनी म्हटलं, की काही जण विधानसभेत राहून काम करतात. काही जण बाहेर राहून काम करतात.
खडसे यांनी गुरूवारी (3 ऑक्टोबर) आपल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला आणि त्यांना आपल्याला तिकीट मिळणार नसल्याचं सांगितलं. खडसे यांच्या कार्यकर्त्यांनी यावेळी अपक्ष लढण्याचा सल्ला त्यांना दिला.
खडसेंच्या समर्थनार्थ कार्यकर्त्यांनी जोरात घोषणाबाजीही केली.
कार्यकर्त्यांची समजूत घालताना खडसेंनी म्हटलं, की आजपर्यंत मी पक्षाच्या आदेशाचं पालन केलं आहे. मंत्रिपदाचा राजीनामा देण्याचा आदेश आला, मी एका मिनिटांत राजीनामा दिला. पक्ष माझ्यासोबत अन्याय करणार नाही.
आपण संघाचे स्वयंसेवक असू तर आज्ञा पाळलीच पाहिजे. माझ्या नावाला बट्टा लागेल असं काही करू नका, असा सल्लाही खडसेंनी कार्यकर्त्यांना दिला.
'पक्षश्रेष्ठींवर दबाव आणण्याचा प्रयत्न?'
खडसेंच्या या नाराजी नाट्यावर बोलताना पुण्य नगरी दैनिकाच्या संपादक राही भिडे यांनी म्हटलं, "एकनाथ खडसेंनी घेतलेली पत्रकार परिषद हे शक्तीप्रदर्शन आणि पक्षावर दबाव टाकण्याचा प्रकार आहे. कारण त्यांना तिकिटाची अपेक्षा होती. त्यांनी अनेक वर्ष या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केल्यामुळे तिथल्या लोकांचं समर्थन त्यांना आहे. हा लेवा-पाटील बहुल मतदारसंघ असल्यामुळे तिथल्या लोकांचं पाठबळ खडसेंना आहे. त्यामुळे आता खडसेंना तिकीट मिळतंय की त्यांच्या मुलीला हे पाहणं महत्त्वाचं ठरेल."
त्यांनी सांगितलं, की ज्या पद्धतीने खडसेंना टांगणीवर ठेवलं आहे. त्यामुळे तिथे असंतोष वाढत चालला आहे. तो वाढत राहावा म्हणून त्यांनी अर्जही भरला आहे. दुसरीकडे शरद पवारांच्या गटातून खडसे आमच्या संपर्कात आहे अशा बातम्या येत आहेत. त्यामुळे खडसेंना तिकीट मिळेल की नाही ही शंका आहेच आणि मिळालं तरी त्यांची नाराजी दूर होणारच नाही. कारण त्यांना सरकारमध्ये अधिकाराचं पद हवंय. तेही मिळण्याच्या शक्यता नाही. त्यामुळे पक्षाने तिकीट दिलं तरी ते स्वीकारतील का हेही पाहणं महत्त्वाचं ठरेल.
'कोणताही पर्याय नाही'
राजकीय विश्लेषक अभय देशपांडे यांच्या मते खडसेंसमोर खरंतर पक्षाने कोणताच पर्याय ठेवलेला नाही.
पक्षाने खडसेंना Love it or leave it अशा स्थितीवर आणून ठेवलंय. त्यामुळे आता काय करायचं याचा निर्णय खडसेंनी घ्यायचा आहे, असं अभय देशपांडेंनी म्हटलं.
या संदर्भात बोलण्यासाठी बीबीसी मराठीनं खडसेंच्या स्नुषा आणि खासदार रक्षा खडसे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्यांनी या विषयावर काहीही बोलण्यास नकार दिला
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)