You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
नितेश राणे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमात कशासाठी गेले होते?
भाजपचे कणकवलीचे उमेदवार नितेश राणे यांच्या एका फोटोची सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे. या फोटोत नितेश राणे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमात सहभागी झाल्याचे दिसत आहेत.
संघाच्या कार्यक्रमात व्यासपीठासमोर स्वयंसेवकांमध्ये नितेश राणे बसल्याचे या फोटोत दिसत असून हा फोटो आता चर्चेचा विषय ठरलाय.
नितेश राणे हे संघाच्या कार्यक्रमात असले, तरी ते संघ गणवेशात नाहीत. त्यामुळं फोटोच्या सत्यतेबद्दल अनेकजण शंकाही घेताना दिसत आहेत.
त्यामुळं बीबीसी मराठीनं या फोटोची सत्यता पडताळली. हा फोटो खरा असून, संघाच्या कार्यक्रमातीलच असल्याचे समोर आले.
विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा भाग म्हणून काल संध्याकाळी सहा वाजता भाजपनं देवगड तालुका बुथ कार्यकर्ता मेळावा आयोजित केला होता. त्याआधी देवगडमधीलच जमसांडे येथे संघाचा विजयादशमीनिमित्त कार्यक्रम होता. संघाचा कार्यक्रम संध्याकाळी चार वाजता होता. या कार्यक्रमात हजेरी लावून नितेश राणे, भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार आणि इतर कार्यकर्ते पुढे कार्यकर्ता मेळाव्याला गेले.
भाजपचे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे अध्यक्ष प्रमोद जठार यांनी बीबीसी मराठीला सांगितलं, "देवगड येथे सोमवारी (7 ऑक्टोबर) संध्याकाळी सहा वाजता भाजपची जाहीर सभा होती. त्याआधी देवगडमध्येच विजयादशमीनिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं संचलन आणि कार्यक्रम होता. तिथे माझ्यासह नितेश राणे आणि अन्य कार्यकर्त्यांनी हजेरी लावली."
आधीच्या वक्तव्यांचं काय?
नितेश राणे यांनी बाबासाहेब पुरंदरे यांच्यावर टीका केली होती तसंच पुण्यातील गडकरी पुतळ्याला विरोध केला होता. या पार्श्वभूमीवर नितेश राणेंची संघाच्या कार्यक्रमातील उपस्थिती आश्चर्यकारक मानली जात आहे.
याबद्दल प्रमोद जठार यांना विचारलं असता ते म्हणाले, "माणसं जशी असतील तशी घ्या आणि आपल्याला हवी तशी घडवा, हे संघाचं ब्रीदवाक्य आहे. माणसं मारून विचार बदलता येत नाहीत. आपल्या संपर्कानं बदलता येतात. भाजपनं राणे कुटुंबीयांना स्वीकारलं ना, मग आता राणे संघमय सुद्धा होतील."
नितेश राणे आमचा विचार समजून घेतील आणि त्यांचे विचार बदलतील, यावर आमचा विश्वास आहे, असंही जठार यांनी म्हटलं.
तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मालवण तालुक्याचे माजी कार्यवाह विलास हर्डीकर बीबीसी मराठीशी बोलताना म्हणाले, "संघ समाजातल्या प्रत्येक भारतीयाला स्वीकारतो. जसं आहे तसं घेतो आणि जसं पाहिजे तसे संस्कार करून समाजामध्ये सोडतो. नितेश राणेही देशाला, समाजाला अपेक्षित सकारात्मक वागतील."
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मालवण तालुक्याचे माजी कार्यवाह विलास हर्डीकरांनी म्हटलं, "आधीच्या वक्तव्यांवर आज काय मत आहे, हे स्वतः नितेश राणेच नीट सांगू शकतील. पण पुढच्या काळात त्यांचे विचार नॉर्मल होतील, आताही ते बदलतील. चांगल्या विचारांमध्ये आल्यावर व्यक्ती बदलतात. आणीबाणीवेळी तुरूंगात असताना संघाच्या संपर्कात आल्यानं अनेकजण स्वयंसेवक बनले होते."
तसेच, "त्यांच्या आधीच्या वक्तव्यांबद्दल आमची सहमती नाहीच. आम्ही नाराजीही व्यक्त केलीये. त्यांच्याकडून पुन्हा काही घडल्यास तशी नाराजीही त्यांना बोलून दाखवू." असंही विलास हर्डीकरांनी सांगितलं.
'संघाच्या परिसस्पर्शानं राणेंचं सोनं होईल'
प्रमोद जठार म्हणतात, राणे हे लोह आहेत. "लोहाला परिसाचा, संघाचा स्पर्श झाल्यावर त्यांचं सोनं होईल."
"राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचा विचार वाचण्यासाठी आमच्या मंडळींनी राणेंना पुस्तकं दिली आहेत. ते नक्की बदलतील, अन्यथा त्यांचा पराभव होईल." असं प्रमोद जठार म्हणाले.
"नितेश राणे आज आमदारकीच्या आशेनं आलेत, पण त्यानिमित्तानं संघविचार समजून घेतील. 'वाल्याचा वाल्मिकी होतो', यावर आमचा विश्वास आहे." असंही जठार यांनी सांगितलं.
ज्या पक्षात आलोय, त्यांच्या मातृसंघटनेला समजून घेणं गरजेचं - नितेश राणे
मी ज्या पक्षाचा भागीदार झालोय, ज्या पक्षात आलोय. त्या पक्षाला समजून घेणं, त्यांच्या मातृसंघटनेला समजून घेणं गरजेचं असल्याचं नितेश राणे म्हणाले. त्यांनी एबीपी माझा वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत हे सांगितलं.
नितेश राणे पुढे म्हणाले, "माझ्याकडचे विषय आणि त्यांच्याकडील माहिती याबाबत संवाद साधण्याची संधी मला यानिमित्तानं मिळेल. सगळ्या गोष्टी समजून घेण्यासाठी एका सकारात्मक विचारानं तिथं जाऊन विषय समजून घेण्यासाठी आणि अभ्यास करण्याचा प्रयत्न केला."
नितेश राणे यांना संघाच्या कार्यक्रमातील या फोटोवरून सोशल मीडियावर ट्रोलही करण्यात आलं. त्याबाबत बोलताना नितेश राणे म्हणाले, "नितेश राणेला जे ओळखतात, ते ट्रोल करूच शकत नाही. नितेश राणेला ओळखणारा महाराष्ट्रात मोठा वर्ग आहे, तो वर्ग माझ्याबद्दल काय विचार करतो, हे माझ्यासाठी महत्त्वाचं आहे."
नितेश राणेंच्या फोटोत चुकीचं काय आहे? संघात जाणं चांगली गोष्ट - नारायण राणे
नितेश राणेंचे वडील आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी याबाबत म्हटलं, "नितेश राणेंच्या फोटोत चुकीचं काय आहे? संघात जाणं चांगली गोष्ट आहे. उद्या मीही जाईन. जायचं तर मनापासून जायचं."
"हिंदुत्व हीच माझी मूळ विचारधारा आहे. कॉंग्रेसमध्ये नाईलाजाने मी राहिलो. तेव्हा सेना भाजपची युती होती. माझं प्रमोद महाजनांशी बोलणं झालं नाही. तेव्हा युती होती मला भाजपमध्ये घेता येणार नाही असं महाजनांनी सांगितलं. त्यामुळे कॉंग्रेसमध्ये जाण्यावाचून पर्याय नव्हता. मी कॉंग्रेसमध्ये 12 वर्षे नाईलाजाने राहिलो. विचारधारेशी तडजोड करून राहिलो."
दरम्यान, सोशल मीडियावर मात्र नितेश राणेंच्या फोटोची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे. यातील काही निवडक पोस्ट :
नितेश राणेंचा फोटो ट्वीट करत कॅप्शनमध्ये परेश जोशी म्हणतात, देर आये दुरूस्त आये!
संग्राम देशमुख नामक व्यक्तीनं नितेश राणेंना उद्देशून म्हटलंय, ...तर मग जुन्या पोस्ट डिलीट करा.
फेसबुकवर छाया थोरात म्हणतात, आदरणीय नितेश राणे संघ कार्यात झोकून देताना..
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)