जळगाव हत्याकांड: 4 अल्पवयीन भावंडांची हत्या, 3 आरोपींना अटक

जळगाव जिल्ह्यातील रावेर येथे बोरखेडा रस्त्यावरच्या शेतातल्या घरात चार अल्पवयीन भावंडांची हत्या झाली. याप्रकरणी तीन जणांना ताब्यात घेतल्याची माहिती महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. तसंच, पीडित कुटुंबाला मदत करण्याचं आश्वासनही देशमुखांनी दिलं आहे.

महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी बोरखेडा घटनेतील मृतांच्या पालकांची भेट घेऊन कुटुंबाचे सांत्वन केले.

अनिल देशमुख म्हणाले, "ही घटना अत्यंत दुःखद असून माणुसकीला काळिमा फासणारी घटना आहे. पोलिसांनी चांगला तपास कमी वेळेत केला असून या प्रकरणी खटला जलदगती न्यायालयात चालवला जाईल तसेच उज्वल निकम हे सरकारी वकील असणार असल्याची माहिती त्यांनी दिली."

तत्पूर्वी, सर्व आरोपीना अटक होईपर्यंत मृतदेहावर अंतिम संस्कार न करण्याची भूमिका काही संघटना प्रतिनिधींनी घेतली होती. पण पोलिसांनी दिलेल्या आश्वासनानंतर मृतदेह पुरण्यात आले.

घटना काय घडली?

रावेर तालुक्यातील बोरखेडा गावात रोड नजीक असलेल्या मुस्तफा शेख यांच्या शेतात सालदार म्हणून महताब व रुमाल बाई भिलाला हे दाम्पत्य आपल्या पाच मुलांसह राहत होते, 15 तारखेला आपल्या मध्य प्रदेश येथील मूळ गावी गेले होते, भिलाला कुटुंबातील संजय भिलाला याने माहिती दिली की "त्याने त्याच्या मित्रांना फोन करू सांगितले होते की आम्ही गावी आहोत सकाळी येऊ शकू, तुम्ही घरी एक दोन वेळा जाऊन माहिती घ्या, पण मी जेव्हा घरी आलो तेव्हा समजले की ही घटना झाली , मला पोलीस स्टेशनला घेऊन गेले होते चौकशी केली कुणाकुणाचे फोन आले होते, त्यावेळी ह्या तिघांनी तेथे सांगितले की आमची नियत फिरली होती, आमच्याकडून चुकीचे काम घडले."

16 तारखेला सकाळी भिलाला कुटुंबातील मोठी मुलगी सईता 14, मुलगा रावल 11, अनिल 8, सुमन 3 ह्यांचे मृतदेह 16 तारखेला सकाळी शेतमालकाला रक्ताच्या थारोळ्यात दिसले. त्यांनी तत्काळ पोलिसांना ही माहिती दिली, पोलिसांनी तात्काळ परिसर सील करत तपास सुरू केला, त्यांना घटना स्थळी कुऱ्हाड भेटली होती.

जळगाव पोलिसांनी तात्काळ तीन तपास पथके नेमून संध्याकाळपर्यंत 5 संशयित ताब्यात घेतल्याची माहिती मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली होती. हे तरुण पीडित कुटुंब प्रमुखांच्या ओळखीतलेच होते. त्यातील 3 युवकांना पोलिसांनी अटक केली आहे.

जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी पीडित कुटुंबाला 2 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)