जगभरात एकाच दिवशी एवढ्या महिलांची हत्या होते

जगभरामध्ये दर दिवशी सरासरी १३७ महिलांची हत्या त्यांच्या साथीदाराकडून किंवा कुटुंबातल्या कुणाकडून होते, असं संयुक्त राष्ट्रांच्या अंमली पदार्थ आणि गुन्हेगारी कार्यालयाने (United Nations Office of Drugs and Crime किंवा UNODC) प्रसिद्ध केलेल्या ताज्या आकडेवारीवरून स्पष्ट झालं आहे.

"स्त्रियांची हत्या होण्याची सर्वाधिक शक्यता घरातच असते," असं या अहवालात म्हटलं आहे.

2017 साली हत्या झालेल्या 87,000 महिलांपैकी अर्ध्याहून अधिक महिलांची हत्या त्यांच्या सर्वांत जवळच्या व्यक्तींकडून झाली. या आकडेवारीतील सुमारे 30,000 महिलांची हत्या त्यांच्या सर्वांत जवळच्या साथीदारानेच केली, तर 20,000 जणींची हत्या नातेवाईकाकडून झाली.

या आकडेवारीमागील स्त्रियांविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न 'बीबीसी 100 Women'ने केला. त्यामुळे ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या दिवशी आम्ही काही अशा बातम्या तपासल्या ज्यात लिंगभेदामुळे महिलांची हत्या झाली होती. त्यातील काही जणींच्या कहाण्या खाली आहेत. तसंच त्यांच्या हत्येचं वार्तांकन कसं झालं, याबद्दल अधिक शोध घेण्याचाही प्रयत्न आम्ही केला आहे.

पुरुष-हत्यांचा दर जास्तच

"घरातल्याच किंवा साथीदाराकडून होणाऱ्या हत्यांमध्ये स्त्रियांपेक्षा पुरुषांचा जीव जाण्याची शक्यता सुमारे चार पटींनी जास्त आहे," असं UNODCच्या आकडेवारीमधून अधोरेखित होतं.

जगभरातील अशा हत्यांमध्ये बळी गेलेल्या सरासरी 10 जणांपैकी आठ जण पुरुष असतात, असं या अहवालात सूचित केलं आहे.

परंतु, अत्यंत घनिष्ठ साथीदाराने केलेल्या हत्यांचा विचार केला तर सरासरी 10 मृतांपैकी आठहून अधिक व्यक्ती स्त्रिया असतात, असंही याच अहवालात नमूद केलेलं आहे.

"जिव्हाळ्याच्या साथीदाराकडून होणाऱ्या हिंसाचाराला स्त्रिया अजूनही मोठ्या प्रमाणात बळी पडत आहेत," असं हा अहवाल सांगतो.

सत्तेचाळीस महिला, २१ देश, एक दिवस

संयुक्त राष्ट्रांचा हा अहवाल 2017 सालातील सरकारी स्त्रोतांकडून पुरवण्यात आलेल्या मनुष्यहत्येच्या आकडेवारीचा एक सारांश मांडतो. निकटच्या साथीदाराकडून/नातेवाईकाकडून झालेल्या हत्यांसंबंधीचे निकष वापरून 'महिलांच्या आणि मुलींच्या लिंगभेदातून झालेल्या हत्या' किंवा 'स्त्रीहत्यां'ची (Femicide) आकडेवारी गोळा करण्यात आली आहे.

या आकडेवारीतल्या काही घटनांमध्ये बळी ठरलेल्या काही महिलांविषयी अधिक जाणून घेण्याचा प्रयत्न 'बीबीसी 100 Women' आणि 'बीबीसी मॉनिटरिंग'ने केला.

एखाद्या व्यक्तीकडून हत्या झालेल्या महिलांविषयी 1 ऑक्टोबर 2018 रोजी जगभरात प्रसिद्ध झालेल्या बातम्यांचं आम्ही निरीक्षण केलं. त्या दिवशी 21 भिन्न देशांमधील 47 महिलांची हत्या कथितरीत्या लिंगभेदातून झाल्याचा निष्कर्ष आमच्या त्यात्या भागांमधील तज्ज्ञांनी काढला. यातील बहुतांश हत्यांचा तपास अजूनही सुरू आहे.

यातील पाच महिलांच्या कथा इथे देत आहोत. सुरुवातीला स्थानिक माध्यमांनी यासंबंधीच्या बातम्या दिल्यानंतर 'बीबीसी'ने स्वतंत्रपणे स्थानिक प्रशासनाकडून यासंबंधीची खातरजमा करून घेतली.

ज्युडिथ चेसांग, 22, केनिया

एक ऑक्टोबरच्या सोमवारी ज्युडिथ चेसांग आणि तिची बहीण नॅन्सी या दोघी त्यांच्या शेतातील पीक कापायला गेल्या होत्या. तीन मुलांची आई असलेल्या ज्युडिथ अलीकडेच त्यांच्या पती लबान कामुरेन यांच्यापासून विभक्त झाल्या होत्या, आणि केनियाच्या उत्तरेला असलेल्या आपल्या आईवडिलांच्या गावी परत आली होत्या.

या दोघी बहिणींनी आपलं काम सुरू केल्यानंतर लबान चेसांग कुटुंबाच्या शेतावर आला आणि ज्युडिथवर प्राणघातक हल्ला केला. त्यानंतर गावकऱ्यांनी त्याला ठार केल्याची माहिती स्थानिक पोलिसांनी दिली.

निकटचा साथीदार किंवा कुटुंबातल्या कुणाकडूनच महिलांची हत्या होण्याचा सर्वाधिक धोका आफ्रिकेत आहे, असं संयुक्त राष्ट्रांच्या अहवालात म्हटलं आहे. आफ्रिकेत दर एक लाख लोकांमध्ये इथले 3.1 मृत्यू अशाप्रकारे होतात.

2017 साली जवळच्या किंवा कुटुंबातल्या व्यक्तीने हत्या केलेल्या महिलांची सर्वाधिक संख्या आशियात होती - या खंडात एकूण 20,000 महिलांना अशा प्रकरणात जीव गमवावा लागला होता.

नेहा शरद चौधरी, १८, भारत

नेहा शरद चौधरीची तिच्या अठराव्या वाढदिवशीच ऑनर किलिंग झाल्याचा संशय आहे. आपल्या प्रियकरासोबत वाढदिवस साजरा करण्यासाठी ती घराबाहेर गेली होती. या मित्रासोबतच्या संबंधांना तिच्या आईवडिलांची संमती नव्हती, असे पोलिसांनी बीबीसाला सांगितलं.

त्या दिवशी संध्याकाळी घरातच आईवडिलांनी आणि आणखी एका पुरुष नातेवाईकाने मिळून नेहाची हत्या केल्याचा आरोप आहे. या प्रकरणातील तपास सुरू आहे आणि तीनही आरोपी सुनावणीची वाट पाहत न्यायिक कोठडीमध्ये आहेत.

नेहाच्या पालकांच्या वकिलाने 'बीबीसी'ला सांगितलं की त्यांचा त्यांच्यावरील सर्व आरोप फेटाळण्याचा मानस आहे.

प्रेमात पडल्यामुळे किंवा आपल्या कुटुंबीयांच्या इच्छेविरोधात लग्न केल्यामुळे दर वर्षी शेकडो लोकांचे खून केले जातात. अशा प्रकारच्या गुन्ह्यांची नोंद अनेकदा होत नाही अथवा बातमीही येत नाही. त्यामुळे या तथाकथित 'हॉनर किलिंग'संबंधीची अधिकृत आकडेवारी मिळवणं अवघड आहे.

झैनब सेकाँवान, 24, इराण

आपल्या पतीची हत्या केल्याबद्दल झैनब सेकाँवान या महिलेला इराणी प्रशासनानं मृत्युदंड दिला.

इराणच्या वायव्य प्रांतात एका गरीब कुर्दीश रुढीवादी कुटुंबात झैनबचा जन्म झाला. चांगल्या आयुष्याच्या आशेपोटी किशोरवयीन असतानाच ती लग्न करण्यासाठी घरातून पळून गेली.

तिचा नवरा तिला शिवीगाळ करायचा, तिला घटस्फोट द्यायलाही त्याने नकार दिला होता. पोलिसांनीही तिच्या तक्रारींकडे दुर्लक्ष केलं, असं अम्नेस्टी इंटरनॅशनलने म्हटलं आहे.

आपल्या पतीचा खून केल्याबद्दल सतराव्या वर्षी तिला अटक झाली. पतीची हत्या केल्याची कबुली देण्यासाठी तिच्यावर अत्याचार झाले, पोलिसांनी तिला मारहाण केली आणि तिच्या प्रकरणाची न्याय्य सुनावणीही झाली नाही, असं अम्नेस्टी इंटरनॅशनलसह तिच्या इतर समर्थकांचं म्हणणं आहे.

आपल्या साथीदाराची हत्या करणाऱ्या महिलांनी अनेकदा 'दीर्घ काळ शारीरिक हिंसाचार सहन केलेला असतो' असं UNOCDच्या अहवालात सूचित केलं आहे.

दरम्यान, अशा प्रकरणांतले पुरुष गन्हेगार बहुतेकदा 'स्वामित्व सिद्ध करण्यासाठी, हेवा किंवा सोडून जाण्याची भीती'पोटी ते कृत्य केल्याचं सांगतात, असं या अहवालात म्हटलं आहे.

झैनबला मृत्युदंड झाला त्याच दिवशी ब्राझीलमध्ये मृतावस्थेत सापडलेल्या एका दीर्घकालीन जोडप्याच्या संदर्भात हेच घडल्याचं दिसतं.

सँड्रा लुशिआ हॅमर मौरा, 39, ब्राझील

सँड्रा लुशिआ हॅमर मौराने 16 वर्षांची असताना ऑगस्तो एग्वॉर रिबेरो याच्यासोबत लग्न केलं. पाच महिने एकमेकांपासून वेगळे राहिल्यानंतर ऑगस्तोने तिची हत्या केली.

सँड्राच्या गळ्यावर चाकूने वार करण्यात आल्याचं जर्दिम तक्वारी इथल्या पोलिसांनी 'बीबीसी ब्राझील'ला सांगितलं

या गुन्ह्याची कबुली देणारा व्हिडिओ तिच्या पतीने स्वतःच्या मोबाइलवर रेकॉर्ड करून ठेवल्याचं पोलिसांच्या तपासात समोर आलं. सँड्राचे आधीच दुसऱ्या एका माणसासोबत संबंध होते, त्यामुळे आपल्या विश्वासघात झाल्यासारखं वाटत होतं, असं त्याने या व्हिडिओत म्हटलं आहे.

आपल्याला अटक होऊ शकणार नाही, कारण सँड्रासोबत आपणही 'देवाच्या भेटीला' जात आहोत, असंही तिच्या पतीने व्हिडिओत म्हटलं आहे. त्यानंतर त्याने बेडरूममध्ये स्वतःला गळफास लावून घेतला.

'खून-आत्महत्या' स्वरूपाचं हे प्रकरण होतं. अशा प्रकरणात एखादी व्यक्ती आत्महत्या करण्यापूर्वी एक किंवा अधिक लोकांची हत्या करते.

मेरी-एमिली वाइलात, 36, फ्रान्स

मेरी-एमिली या महिलेची हत्या तिचा पती सेबास्टियन वाइलात याने केली. त्याने चाकूने तिच्यावर प्राणघातक वार केले.

चार वर्षांच्या वैवाहिक आयुष्यानंतर हे जोडपं विभक्त झालं होतं.

खून केल्यानंतर त्याने स्वतःच पोलिसांकडे जाऊन गुन्ह्याची कबुली दिली. काही दिवसांनी तुरुंगात त्याने आत्महत्या केली.

रूह बायचात या ठिकाणी मेरी-एमिली वाइलात अंतःवस्त्रांचं दुकान चालवायची. ती गेली त्यानंतर या दुकानाच्या दाराबाहेर रहिवाशांनी फुलं ठेवली होती आणि तिच्या आठवणीत त्यांनी पदयात्राही काढली होती.

फ्रेंच सरकारने कौटुंबिक अत्याचार रोखण्यासाठी नवीन कार्यक्रम जाहीर केला, त्याच दिवशी मेरी-एमिलीची हत्या झाली.

स्त्रीहत्येची बातमी देताना काय करावं लागतं?

या बातम्या जमवण्याच्या प्रक्रियेत 'बीबीसी मॉनिटरिंग'अंतर्गत पत्रकार आणि संशोधकांच्या आंतरराष्ट्रीय जाळ्याने जगभरातील टीव्ही, रेडिओ, प्रिंट माध्यमं, ऑनलाइन आणि सोशल मीडियावरील बातम्यांचं विश्लेषण केलं.

1ऑक्टोबर २०१८ रोजी कथितरीत्या लिंगभेदामुळे झालेल्या महिलांच्या हत्येच्या बातम्या यातून निवडण्यात आल्या. त्या दिवशी जगभरात महिलांच्या हत्यांविषयी एकूण 47 बातम्या आल्या होत्या. त्यातील केवळ काहीच प्रकरणांची नोंद इथे केली आहे. हत्येमागील हेतू अस्पष्ट असलेली अथवा अपराध्याची ओळख न पटलेली इतरही अनेक प्रकरणं आहेत.

स्त्रियांविरोधातील हिंसाचाराच्या घटनांची 'नोंद प्रशासनाकडून अत्यल्प प्रमाणात घेतली जाते आणि अशा प्रकारचा बहुतांश हिंसाचार छुप्या स्वरूपात असतो,' असं UNOCDच्या या नवीन अहवालात म्हटलं आहे.

'बीबीसी मॉनिटरिंग'च्या वतीने या प्रकल्पाचं नेतृत्व करणाऱ्या रेबेका स्किपेज सांगतात की ही आकडेवारी गोळा करताना लक्षात आलं की "महिलांच्या मृत्यूंबद्दल माध्यमं कशा पद्धतीनं वार्तांकन करतात, यावरून जगभरातील विभिन्न समाजांमध्ये स्त्रियांकडे कसं पाहिलं जातं, याबद्दल बराच उलगडा होतो."

"आम्ही केवळ एका दिवसातील मृत्यूंचा शोध घेत होतो, पण त्या बातम्या शोधण्यासाठी आम्ही संपूर्ण महिनाभर प्रयत्न केला. घटनेपासून बातमी प्रसिद्ध होईपर्यंतचा कालावधी, वार्तांकनाचा सूर आणि माहितीची वानवा, या घटकांद्वारे त्या-त्या प्रदेशातील स्त्रियांच्या स्थानाविषयीची व्यापक कहाणी आमच्या समोर येत गेली," असं त्या सांगतात.

मरयम अझ्वीर 'बीबीसी मॉनिटरिंग'साठी काम करतात आणि या प्रकल्पातील बरीचशी अंतिम आकडेवारी आणि तपशील त्यांनी एकत्र केला. "हा प्रकल्प यामुळे पुढे आलेल्या मृत्यूंच्या प्रकरणांइतकाच अंधारात राहिलेल्या मृत्यूंसाठीही महत्त्वाचा आहे."

"माध्यमांपर्यंत कधीच न पोहोचलेल्या घटना, दखल न घेतल्या गेलेल्या, तपास न झालेल्या किंवा काही कारणास्तव तपास शक्य नसलेल्या घटनाही या व्यापक चित्राचा भाग आहेत. या सगळ्यातून आमच्यासमोर एक मोठा प्रश्न उपस्थित झाला - बातमी देण्याइतकंही महत्त्व स्त्रीहत्येला का मिळत नाही?"

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)